आज भगवान महावीर जयंतीचा प्रसंग आहे. आजच्या दिवशी एका अशा महापुरुषाने जन्म घेतला की, ज्याने संपूर्ण जगाला ‘जगा आणि जगू द्या’चा संदेश दिला. कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थाच्या घरी माता त्रिशलादेवीच्या पोटी जन्मलेला बालक वर्धमानाचा महावीर बनला. आज ज्यावेळी संपूर्ण विश्व हिंंसा, आतंक आणि युद्धाच्या सावटामध्ये वावरत आहे, अशावेळी महावीरांच्या अहिंंसेचे दर्शन जीवनात व संपूर्ण जगाला अनिवार्य आहे.
भयभीत अशा जगाला केवळ अहिंंसाच वाचवू शकते. जगाचे भविष्य केवळ अहिंंसा आहे आणि अहिंंसा ही जैन धर्माची खरी ओळख आहे. आदर्श जगाच्या निर्मितीकरिता महावीरांची अहिंंसा, अनेकान्त आणि अपरिग्रह यासारखे सिद्धांत आजसुद्धा उपयोगी आहेत. आज परिस्थितीने आम्हा सर्वांना एका अशा वळणावर आणून ठेवले आहे की, जेथून दोन वेगवेगळे मार्ग जातात. एकतर आपण महावीरांचा विचार स्वीकारावा किंंवा मग आपल्या महाविनाशासाठी तयार राहावे. मनुष्य ज्वलंत अशा ज्वालामुखीवर उभा राहून विनाशाकडे जात आहे. हिंंसा व दहशतमय जगात सुख, शांती निर्माण करण्याकरिता भगवान महावीरांचाच मार्ग एकमात्र पर्याय आहे. महावीर केवळ इतिहासातील भव्य स्मारक नसून, वर्तमानकाळाचे मार्गदर्शक तथा भविष्याचे प्रकाशस्तंभसुद्धा आहेत; तसेच ते अमृत पुरुष आहेत. त्यांनी जीवनभर समाजाला अमृत पाजले. भगवान महावीर हे काही आकाशातून अवतरित झाले नव्हते, ते तीर्थंकर होते. तीर्थंकरांच्या क्रमात त्यांचा क्रम चोविसावा होता.
तीर्थंकर हे मनुष्यामध्ये ईश्वराचाच शोध घेतात आणि त्यास त्याप्रमाणे घडवितात. स्वत: ईश्वरपणाच्या आत्मभावनेला जन्म देणे, ही तीर्थंकर महावीरांची मौलिक साधना आहे. माझ्या मते, आज संपूर्ण जगाला एक अशा महावीराची अत्यंत गरज की जे हिंंसा, हत्या, बर्बरता, भ्रष्टाचार व कत्तल यांच्या अंधकारात अहिंंसा, करुणा, सत्य साधनेचे द्वीप प्रज्वलित करू शकतील. अहिंंसेचे संपूर्ण वैभव व तेज परतवू शकेल. भगवान महावीरांच्या मंदिरात प्रत्येकाला पोहोचता यावे, ही आज काळाची गरज आहे. तेथील प्रवेशाला कोणाचा विरोध नसावा. कारण मंदिराचे निर्माण हे केवळ मानव कल्याणासाठी आहे. पापीपेक्षाही पापी, अधमापेक्षाही अधम मनुष्यालासुद्धा महावीरांपर्यंत पोहोचण्याचा अधिकार द्यावा लागेल. त्याचवेळी जैन धर्म हा विश्वधर्म होऊ शकेल. नाही तर मग महावीरांना स्वत:च प्रत्येकाजवळ जावे लागेल. भगवान महावीरांना मंदिरामधून काढून चौकात आणावे लागेल की, ज्यामुळे त्यांचा जीवन संदेश व चर्येचे सर्वांना ज्ञान होऊ शकेल. भगवान महावीरांना आज सर्वांनी मंदिरामध्ये बसविले आहे; परंतु खरे तर त्यांचा आचारविचार व्यापार आणि आचरणामध्ये आणायला पाहिजे. भगवान महावीर काही एका व्यक्तीचे नाव नाही, तर ते आचरणाचे नाव आहे. सदाचरण आणि सहिष्णुतेच्या मार्गावर मार्गक्रमण करूनच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो.
महावीर आजसुद्धा प्रासंगिक आहेत. त्यांनी ज्या शाश्वत जीवन मूल्यांची स्थापना केली होती, ते आजसुद्धा आदर्श विश्वनिर्मितीमध्ये सहयोगी आहेत. भगवान महावीर स्वामींचे उपदेश आध्यात्मिक दृष्टीने तर असाधारण आहेतच, राजनीतिक दृष्टीनेसुद्धा त्यांच्या उपयोगितेला नाकारले जाऊ शकत नाही. मीपणाचा मृत्यू (शेवट)च महावीरांचे जीवन आहे.महावीरांचा विश्वास लेखणीवर नव्हता, आचरणावर होता. त्यांच्याजवळ केवळ भाषा/वाणीचे सुख नव्हते, जीवनाचे रहस्यसुद्धा होते. त्यांची आस्था/श्रद्धा जातीगत भेदभावापासून सर्वथा मुक्त होती. भगवान महावीर जन्मापेक्षा कर्मावर जास्त जोर देत असत, त्यांच्या मते, व्यक्ती जन्माने महान बनत नसून कर्माने महान बनते. उच्च कुळात जन्म घेणे केवळ संयोग मात्र आहे; परंतु कुलीन व्यक्तीच्या रूपात मरणे वस्तुत: मानव जीवनाची सर्वोत्कृष्ट उपलब्धी आहे. महावीरांचे सत्य, अहिंंसा, अचौर्य, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे व्रत एक आदर्श नागरिक होण्याची आचारसंहिता आहे. प्रेम, शांती आणि सद्भावनेने परिपूर्ण जीवन पाहिजे असेल तर जगाला महावीरांच्या मार्गपथावर चालावे लागेल. आज आवश्यकता आहे की, आम्ही केवळ महावीरांना न मानता, त्यांच्या संदेशाला मानावे. हीच ती किल्ली आहे, जी आजच्या ज्वलंत समस्यांचे कुलूप उघडते. या, आपण सर्व यावर्षी महावीर जयंती महावीरांच्या संदेशाचे महत्त्व ऐकून व जाणून साजरी करू या व महावीरमय होऊ या.