‘मी’ एकटा नव्हे, काँग्रेसमध्ये ‘आम्ही’ सगळेच जिंकू !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 09:58 AM2022-10-19T09:58:03+5:302022-10-19T09:59:00+5:30
काँग्रेस अध्यक्षपदाच्या मतदानापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत
शरद गुप्ता,
वरिष्ठ संपादक, लोकमत
तुमच्याकडे ‘अधिकृत उमेदवार’ म्हणून पाहिले जाते?
पक्षाचे कार्यकर्ते, हितचिंतक, ज्येष्ठ नेते यांचा मी उमेदवार आहे, यापेक्षा जास्त काय बोलू? माझ्यासह लक्षावधी काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधींनी पक्षाचे नेतृत्व करावे, असे वाटत होते; परंतु त्यांनी नकार दिला. नंतर पक्षातले ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, पाठीराखे यांच्या विनंतीवरून मी उमेदवारी अर्ज भरला.
तुमच्या ‘कार्यक्रम पत्रिके’त जास्त करून उदयपूर ठरावाचे प्रतिबिंब का दिसते?
उदयपूर अधिवेशनातील पक्षाचा जाहीरनामा बदलाचे ऐलान करतो. अर्थकारण, राजकारण, संघटना, परराष्ट्र व्यवहार, सामाजिक न्याय, युवक, महिला, कृषी, शेतकरी अशा अनेकविध विषयांवरच्या मंथनातून तो तयार झाला. हा जाहीरनामा पूर्णत्वाने राबवणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.
‘जैसे थे वादी’ म्हटल्याने तुम्ही अस्वस्थ होता?
मला नाही तसे वाटत. सुधारणा, बदल आणू पाहणारा जाहीरनामा ‘जैसे थे वादी’ कसा असेल? ‘मी’ या शब्दाच्या जागी मला ‘आपण’ हा शब्द ठेवायचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून हा जाहीरनामा राबवला पाहिजे.
काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास अग्रक्रम काय असतील?
उदयपूर जाहीरनामा हा सर्वोच्च अग्रक्रम! या जाहीरनाम्यात ‘पन्नास वर्षांखालील पन्नास’ हे सूत्र अवलंबण्यात आले आहे. पक्ष संघटनेतील पन्नास टक्के पदे पन्नासहून कमी वय असलेल्यांना द्यावीत, अशी सूचना त्यात आहे. ज्या पदाधिकाऱ्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, त्याने त्याच पदावर पुन्हा राहू नये. पक्षाची यंत्रणा बळकट करण्यावरही आम्ही भर देऊ. सर्व प्रलंबित नियुक्ती तत्काळ केल्या जातील. महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. महत्त्वाची पदे देताना निष्ठावंतांना विचारात घेतले जाईल. प्रदेश तसेच जिल्हा काँग्रेस समित्यांच्या द्वैवार्षिक निवडणुकांचे कॅलेंडर तयार केले जाईल. या समित्या आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांवर चर्चा करतील. पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेतले जातील.
तरुण आणि महिला वर्गात आपण लोकप्रिय आहात असे आपल्याला वाटते का?
का नाही? पन्नासच्या आत वय असलेल्यांना पन्नास टक्के पदे देण्याला मी जर प्राधान्य देणार असेन तर का नाही? पन्नास वर्षांच्या कालखंडात पक्ष संघटना आणि सरकारमध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करण्याची संधी मला मिळाली. या अनुभवाने मला पुष्कळ गोष्टी मुळापासून समजून घेता आल्या. कार्यकर्त्यांच्या चिंता मला कळतात. त्यांच्याबरोबर राहून पक्षासाठी काम करायला मी बांधील आहे.
काँग्रेस पक्षात सत्तेचे विकेंद्रीकरणाची गरज आहे काय?
आमच्याकडे प्रदेश, जिल्हा, गटनिहाय पक्ष समित्या आहेत. काँग्रेस कार्यकारी समिती आहे. संसदीय मंडळ आहे. हे विकेंद्रीकरण नव्हे का? मी विकेंद्रीकरणाचा खंदा पुरस्कर्ता आहे. कारण मी हे करतो, मी हे केले, असे मी कधीही म्हणालेलो नाही. आपण सगळे मिळून हे करूया, अशी माझी भाषा असते. ही निवडणूक ‘माझी’ नाही ‘आपली’ आहे. हे सांघिक काम आहे. एकटा ‘मी’ नव्हे, आपण एकत्र येऊन जिंकू, यावर माझा विश्वास आहे.
‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी झाली?
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाने भारत जोडो यात्रा काढून सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पुन्हा एकवार केला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासारख्या जातीयवादी, फुटीरतावादी शक्तींचा सामना आम्हाला करायचा आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. लोकांनीही स्वतःहून यात्रेमध्ये भाग घेतला. बेकारीने तरुण वर्ग हवालदिल झालेला आहे. भाववाढीने सामान्य लोक हैराण आहेत. रुपयाची घसरण होते आहे. अशा परिस्थितीत ही यात्रा निघाली. लोकांना काँग्रेस पक्षाची प्रेरणादायी, सर्वांना बरोबर घेणारी धोरणे हवी आहेत, हे या यात्रेला मिळालेल्या ऐतिहासिक यशावरून दिसले.
पक्ष संघटनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी आपली योजना काय?
भाजप आणि संघ परिवार लोकशाही उद्ध्वस्त करीत आहे. संघराज्य, सलोखा, समता आणि आपल्या स्वतंत्र संस्था खिळखिळ्या केल्या जात आहेत. याविषयी आपण लोकांना जागे केले पाहिजे, साट्या-लोट्याची भांडवलशाही चालवणाऱ्या मूठभर लोकांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था देऊ पाहणाऱ्यांना हटवण्यासाठी आपण एक झाले पाहिजे. ही निवडणूक ‘माझी’ नाही ‘आपली’ आहे. सर्व राज्यातील, जिल्ह्यातील, गटनिहाय पातळीवर पक्ष संघटना एक होईल आणि आपण जिंकू.