- वसंत भोसलेसातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते. इथल्या ‘शिव घराण्या’बद्दल प्रत्येक मराठी मनाला नक्कीच अभिमान. इथल्या वारसदारांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्राची नवी पिढी अनुकरणात रमलेली; मात्र गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेचा धक्का बहुतांश मंडळींना बसलाय. एका किरकोळ टोल नाक्यावरून दोन दिग्गज राजे एकमेकांना भिडावेत. कैक गाड्या फोडल्या जाव्यात. हवेत गोळीबार व्हावा.. यावर राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वासच बसेनासा झालाय. विशेष म्हणजे, या धुमश्चक्रीत एक पोलीस अधिकारीही सापडावा. तोही जखमी व्हावा, हे किती दुर्दैवी?खरे तर, लोकांच्या दृष्टीने ‘टोल नाका’ ही अत्यंत साधी गोष्ट असली तरी राजकीय नेत्यांच्या दृष्टीने कोट्यवधी रुपयांची अंडी देणारी चक्क कोंबडीच. बिचाºया जनतेच्या टोलवर गोळा होणारा पैसा म्हणजे राजकारणात कार्यकर्ते पोसण्यासाठी जणू परवलीचा शब्द बनलाय. आपली बाजू घेऊन राजकीय नेत्यांनी हे ‘आधुनिक लुटारू नाके’ बंद करायला हवेत, या भ्रामक स्वप्नात बिचारी जनता रंगलेली. मात्र याच पार्श्वभूमीवर दोन बडे लोकप्रतिनिधी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात, तेव्हा जनतेचे उघडतात खाडऽऽकन डोळे. साताºयात तर हे दोन बडे नेते केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर तरुण पिढीच्या मनावर राज्य करणारे ‘राजे’. त्यामुळेच गुरुवारच्या घटनेतून सातारकर अद्याप सावरले नसल्याचे स्पष्टपणे जाणवू लागलेय.सातारा जिल्ह्यात काहीही घडले तरी त्याचा ताण तत्काळ प्रशासनावर येतो. रात्री उदयनराजे आनेवाडी टोलनाक्यावर तळ ठोकून होते, तेव्हा साताºयातून शिवेंद्रसिंहराजे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नाक्याकडेच निघाले. या ठिकाणी दोन्ही राजे आपल्या समर्थकांसह आमनेसामने आले असते तर कदाचित अनुचित प्रकार घडू शकला असता, हे ओळखून खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातून शिवेंद्रसिंहराजे यांना नाक्याकडे जाण्यासाठी परावृत्त केले गेले. शेकडो पोलिसांचा फौजफाटा असतानाही एका साध्या टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलले जाऊ शकत नाही, म्हणून दुसºया लोकप्रतिनिधीने आपल्या समर्थकांची ताकद त्या ठिकाणी लावावी... ही घटना कदाचित इतरांच्या दृष्टीने ‘बिहार’सारखी असावी.साता-यात अधूनमधून घडणा-या विचित्र प्रसंगांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाहेरची मंडळी स्पष्टपणे विचारतात की, ‘हा सातारा आहे की बिहार?’ अशा वेळी इथल्या जाज्वल्य इतिहासाचे अन् नयनरम्य निसर्गाचे कौतुक करण्यासाठी सातारकर मंडळी पुढे सरसावतात. मात्र गुरुवारच्या घटनेमुळे परजिल्ह्यातील नागरिकांच्या खोचक प्रश्नाला आपसूकच बळ मिळालेय.असो. ‘सातारा हा सातारा आहे, बिहार नाही !’ हे सिद्ध करण्याची नैतिक जबाबदारी आता पोलीस खात्यावर येऊन पडलीय. ‘खादीची दहशत’ कितीही मोठी असली तरी लोकशाहीत ‘खाकीचा दरारा’ही कसा महत्त्वाचा असतो, हे जगाला दाखवून देण्याची वेळ पुन्हा एकदा प्रशासनावर आलीय. दोन्ही राजेंवर ३०७ कलम लावून पोलिसांनीही आपल्या कणखर भूमिकेची चुणूक दाखविलीय. कारण ही खादी ‘स्टंटबाज’ आहे की ‘कर्तव्यतत्पर’ हे दाखविण्याची हीच योग्य वेळ होती.
बिहार नव्हे... साताराच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:26 AM