प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक -तब्बल २७ वर्षांपूर्वी दामदुप्पट योजनेच्या नावाखाली गुंतविलेली रक्कम अवघ्या ३० दिवसांत दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविणारा बेस्टचा कर्मचारी अशोक शेरेगर अजूनही लोकांच्या स्मरणात असेल; मात्र तब्बल ९२ हजार गुंतवणूकदारांना १०० कोटींहून अधिक रकमेला गंडा घालणाऱ्या शेरेगर प्रकरणापासून धडा शिकण्याचे शहाणपण अजूनही येत असल्याचे दिसत नाही. कारण तीन दशकांनंतर आजही राज्यात कुठे ना कुठे गुंतवणूकदार दामदुप्पट योजनेला बळी पडत असल्याचे दिसतच असते. आजवर अशा योजनांमध्ये बुडालेल्या शेकडो गुंतवणूकदार आणि एजंटांवर आत्महत्येची पाळी आली. त्यामुळे अशा रॅकेटपासून गुंतवणूकदारांनी स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक आहे.
दामदुप्पट घोटाळ्यांची सर्वसाधारण पद्धत अशी असते की, एखादी अपरिचित व्यक्ती मोक्याच्या ठिकाणी जागा भाड्याने घेते आणि जाहिरात करते की, तुम्ही जेवढी रक्कम त्याच्या योजनेत गुंतवाल तेवढ्या रकमेवर बँकेत ठेवलेल्या मुदतीच्या ठेवींच्या दरापेक्षा जवळजवळ दुप्पट दर असेल. त्याशिवाय तुम्हाला घरगुती वापराची महागडी उपकरणे नगण्य किमतीत घरपोच मिळतील. सुरुवातीला दोन-तीन महिने ही व्यक्ती सांगितल्याप्रमाणे व्याज देते. तुमचा विश्वास संपादन केल्यावर तुमच्यामार्फत अन्य व्यक्तींनाही गुंतवणूक करण्याचे आवाहन करते. जेवढ्या अधिक व्यक्तींकडून तुम्ही रक्कम आणाल त्यातील काही टक्के तुम्हाला बक्षीस म्हणून दिले जातात.
काही व्यक्तींना मिक्सर, मायक्रोवेव्ह, घरगुती वापराचे डबे असे साहित्यही दिले जाते. आठ ते नऊ महिन्यांनंतर दरमहा मिळणारे व्याज मिळेनासे होते. तक्रार केल्यास ठेवी स्वीकारणारी व्यक्ती भेटायला टाळाटाळ करते. फोन स्वीकारत नाही. वर्षभरात ही व्यक्ती अचानक गायब होते. त्याने भाड्याने घेतलेली जागा अर्थातच रिकामी झालेली असते. आर्थिक फसवणूक करणारी व्यक्ती तोपर्यंत परदेशात गेलेली असते. अनेकांनी ठेवलेल्या मोठमोठ्या रकमा गायब झालेल्या असतात. त्यानंतर आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात आले की, असे लोक पोलिसांत तक्रार करतात. तोवर बराच काळ गेलेला असतो. पोलिसांच्या प्रयत्नांनी ती व्यक्ती पकडली गेलीच तरीही, लोकांनी ठेवलेल्या रकमा परत मिळणे दुरापास्त होऊन बसते.
निवृत्त व्यक्ती टार्गेट - - हे फसवणुकीचे प्रकार विशेषत: निवृत्त व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर बळी घेतात. कमी वेळात रक्कम दुप्पट होईल, या आशेने विशेष विचारपूस न करता अशा व्यक्ती आयुष्यभराची ठेव त्या माणसाच्या स्वाधीन करतात.
- जेवढे आर्थिक मागासपण जास्त तेवढे तेथील व्यक्तींना फसविण्यात या व्यक्ती तरबेज असतात. अनेक जिल्ह्यांत, अनेक राज्यांत असे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वारंवार उघडकीस येत असतात.
- अपराधी व्यक्ती पकडल्यानंतर त्याच्याकडील रकमेतून त्याने काही स्थावर मालमत्ता विकत घेतली असल्यास ती जप्त करून येणाऱ्या रकमेतून पीडित व्यक्तींना परत देण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या व्यक्तीची नेमणूक केली जाते.
- सुरक्षित ठिकाणीच गुंतवणूक करा - शासनातर्फे संबंधित व्यवस्था राबविलेली असली तरीही कष्टाने मिळविलेले पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाने किंवा अन्य कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्यापासून दूर राहणे हेच हिताचे आहे.
- भारत सरकारतर्फे व रिझर्व्ह बँकेनेही अशा अपराधी व्यक्तींविरुद्ध कडक तरतुदी केल्या आहेत; परंतु तरीही अशाप्रकारे फसविणारे आणि अल्पावधीत आपली गुंतवणूक दामदुप्पट व्हावी, या लालसेपोटी त्यांच्या भूलथापांना बळी पडणारे लोक ठिकठिकाणी नजरेस येतच असतात.
- आर्थिक सुशिक्षितता, सावधानता बाळगून सुरक्षित ठिकाणीच गुंतवणूक करणे योग्य आहे. अथवा पैसे गेल्याचे दुःख करण्यापलीकडे हातात काही उरत नाही.