बेबंद कारभार, बेकायदा बांधकामे यामुळे सतत चर्चेत असलेल्या उल्हासनगर महापालिकेत नगरसेवकच फाईल चोरत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जशी भाजपाची अब्रू गेली, तशीच पालिका प्रशासनाचीही. कोणीही यावे आणि पालिकेतून काहीही उचलून न्यावे एवढी भोंगळ व्यवस्था जर तेथे अस्तित्वात असेल तर त्यातून काय घडू शकते, याचा हा पुरावा आहे. अर्थात उल्हासनगर पालिकेपुरता विचार केला, तर फाईलचोरी तेथे नवी नाही. एखाद्या प्रकरणाची फाईल म्हणजेच नस्ती तयारी झाली, की टेबलानुसार साधारणत: तिचा प्रवास ठरलेला असतो. त्यामुळेच या ‘नस्ती उठाठेव’ प्रकरणाचे रंगतदार किस्से सरकारी कार्यालयात सांगितले जातात. पण उल्हासनगरमध्ये मात्र अधिकारी, नगरसेवक स्वत:च फायली उचलून कोठूनही कोठे फिरताना दिसतात. फाईल तयार झाल्यावर त्यावर आवक-जावक क्रमांकही टाकला जात नाही. त्यातले एखादे प्रकरण वादग्रस्त ठरले, त्याच्या कागदपत्रांच्या चौकशीची मागणी झाली किंवा ज्या आधारे प्रकल्प उभा आहे तो आधारच कमकुवत निघाला, की तेथे फाईल गायब होते. तोवर बऱ्याचदा संबंधित बांधकाम पूर्ण झालेले असते. त्यामुळे त्या बांधकामावरील कारवाईपेक्षा फाईल शोधण्याचेच आदेश दिले जातात. ती सापडत नाही आणि प्रकरण थंड बस्त्यात जाते. अनेक वर्षे असे प्रकार घडूनही नगरविकास खात्याने या महापालिकेचा कारभार सुधारावा, अशा प्रकरणांत जबाबदारी निश्चित व्हावी, प्रसंगी कागदी फाईलपेक्षा सर्व व्यवहार आॅनलाइन होतील, अशी व्यवस्था तयार व्हावी यासाठी हालचाली न केल्याने प्रकरणे फाईलबंद करून नंतर ती गायब करणाºयाचे फावत गेले. आताही भाजपा नगरसेवक फाईल शर्टात लपवताना सीसीटीव्हीत कैद झाला, म्हणून याची चर्चा झाली. एरव्ही अनेक गैरव्यवहारांच्या तपासासाठी वारंवार सीसीटीव्ही फूटेज मागवूनही ते न देणाºया या महापालिकेतून एकाच प्रकरणाची क्लिप कशी काय व्हायरल झाली? याचेही कोडे उमगलेले नाही. या महापालिकेत अधिकाºयांची ७० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार प्रभारी या नात्याने वर्षानुवर्षे कनिष्ठांच्या हाती सोपवलेला आहे. त्यातील अनेक जण आर्थिक लोभाच्या आमिषाला बळी पडत लोकप्रतिनिधी, ठेकेदार, बिल्डर यांना साथ देतात. पालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघू लागले, की आयुक्त बदलण्याचा सोपस्कार पार पाडून सरकार मोकळे होते; पण केवळ वरिष्ठ अधिकाºयाच्या बदलीने प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी व्यवस्थेतही बदल करण्याची गरज असते. त्याचीच इच्छाशक्ती दाखवली जात नसल्याचे हे परिणाम आहेत.
फाईलची नव्हे, अब्रूचीच चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:37 AM