- किरण अग्रवाल
श्रीलंकेत अचानक वाढलेल्या महागाईने तेथील सामान्यांचे कंबरडे मोडले आहे, हातावर पोट असणाऱ्यांचे तर खूपच हाल होत आहेत, त्यामुळे या महागाईला व तेथील भ्रष्टाचाराला कारणीभूत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी घरी जावे म्हणून आंदोलने सुरू आहेत; पण पर्यटनावर भिस्त असणाऱ्या या देशातील आंदोलनांचा पर्यटनावर कसलाही परिणाम होत नसून, उलट अशा स्थितीत पर्यटनामुळेच तेथील आर्थिक चलनवलन सुरू असल्याची जाणीव बाळगत बाहेर देशातून येणाऱ्या पर्यटकांना अधिक सन्मानाची वागणूक मिळत आहे. अर्थात, भारतीय माणूस ऐतिहासिक व पौराणिक संदर्भातून श्रीलंकेकडे सोन्याची लंका म्हणून बघत असला तरी आता तेथे महागाईचा धूर निघत असल्याने भारतीयांना हळहळ वाटणे स्वाभाविक आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील स्थिती बिघडली आहे. भगवान गौतम बुद्धांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी असणाऱ्या या देशात महागाईने कळस गाठला असून आंदोलने सुरू झाली असली तरी अजूनही ती अहिंसकपणे म्हणजे शांततेच्या मार्गानेच सुरू आहेत. त्याचा पर्यटकांना कसलाही त्रास होताना दिसत नाही. यासंदर्भात टीव्हीवर बघावयास मिळणाऱ्या बातम्यांनी तेथे जाऊ पाहणाऱ्या पर्यटकांना भीती वाटणे स्वाभाविक आहे, मात्र प्रत्यक्षात तेथे गेलेल्या पर्यटकांना या आंदोलनांचा कसलाही त्रास होताना दिसत नाही. कोलंबोतील प्रख्यात ‘इंडिपेंडन्स स्क्वेअर’ या पर्यटन स्थळावर देखील काही आंदोलक हातात बॅनर घेऊन ‘गोटा गो’च्या घोषणा देत आहेत, पण पर्यटकांना त्यांचा कसलाही त्रास नाही. उलट पर्यटकांना त्यांचे फोटो काढून देण्यासाठी ते मदतीला येतात. कँडीमधील प्रख्यात ‘कँडी लेक’च्या किनारीही आंदोलन सुरू आहे, पण त्यामुळे रहदारी खोळंबत नाही. महागाईचे म्हटले तर, स्थानिकांना त्याचा फटका जरूर बसतो आहे. गॅस सिलिंडर दोन हजारांवरून चार हजारांचे झाले आहे, पण श्रीलंकेतील चलन हे भारतीय चलनापेक्षा जवळपास अडीच ते तीन पटीने स्वस्त असल्याने भारतीय पर्यटकांसाठी तोही मुद्दा तितकासा परिणामकारक ठरत नाही. आगाऊ बुकिंग करून गेलेल्या पर्यटकांना तर त्यांच्या पूर्व नियोजनानुसार पूर्वीच्या दरानेच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विजेची टंचाई आहे खरी, पण ती स्थानिक नागरिकांना अधिक भेडसावते. पर्यटक ज्या हॉटेल्समध्ये उतरतात तेथे जनरेटरची व्यवस्था असल्याने तीदेखील अडचण जाणवत नाही.
श्रीलंकेतील या गडबडीच्या पार्श्वभूमीवरच आमचा कोलंबो, कँडी, सीगरिया, गाले फोर्ट, बेंटोटा आदी परिसरात दौरा झाला. ‘यू आर फ्रॉम इंडिया? यू आर अवर बिग ब्रदर, वेलकम...’ असे म्हणत भारतीय पर्यटकांचे स्वागत केले जात आहे. चायनाच्या नादी लागून आम्ही महागाई ओढवून घेतली, पण भारत आमच्या मदतीला आला; अशी भावना या दौऱ्यात अनेकांनी बोलून दाखवली. रासायनिक खतांचा वापर थांबवून तेथील राज्यकर्त्यांनी सेंद्रिय शेतीचे धोरण स्वीकारले. त्यामुळे उत्पादन घटून महागाई वाढली. भ्रष्टाचार बोकाळल्याने अनेक सरकारी उद्योग धोक्यात आले, विजेची टंचाईही निर्माण झाली. यापूर्वी रात्रीच्या विमानाने श्रीलंकेत गेल्यावर कोलंबोत उतरताना विद्युत रोषणाईने झगमगणारी कोलंबो नगरी डोळ्यांचे पारणे फेडी, पण आता इतका झगमगाट दिसत नाही. श्रीलंकेत आता पाऊस पडतो आहे, या पावसाने तेथील सर्वात मोठी नदी महाव्हॅली भरून वाहू लागली की पाॅवर जनरेशनचे टरबाइन सुरू होतील व विजेची टंचाई दूर होईल, असे जाणकार सांगतात.
विशेष म्हणजे महागाई वाढली असली तरी कुठेही लूटमार दिसत नाही. उदरनिर्वाह जिकिरीचा झालेली एक ८० वर्षांची वृद्ध महिला एका पर्यटन स्थळावर भेटली, चोरी करण्याऐवजी व भीक्षा मागण्याऐवजी मी खेळणी विकते, कृपया ही खेळणी घेऊन मला मदत करा, अशी विनवणी तिने केली आणि सर्व पर्यटक तिच्या या प्रामाणिकपणाला दाद देत तिच्याकडून खेळणी विकत घेताना दिसले. एकीकडे महागाई वाढली आहे, पण पर्यटक घटल्याने आहेत त्यांच्याकडून अधिक न घेता, नेहमीपेक्षा कमी दरात तेथील गाईड पर्यटकांना माहितीची सेवा पुरवीत आहेत. बॅनटोटा येथे त्यामुळेच कमी दरात मोटार बोटने समुद्र सफर घडवली जाताना दिसते. आश्चर्य म्हणजे, कोलंबोतील ‘मूव्ह एन पीक’सारख्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये कमी पॅकेजची रूम बुकिंग असताना आम्हाला त्याच दरात अधिक दराच्या रिकाम्या पडून असलेल्या डीलक्स रूम उपलब्ध करून सुखद धक्का दिला गेला. भारतीय पर्यटकांची अशी खातरदारी पाहता तेथील स्थानिक राजकीय आंदोलनांची भीती अजिबात उरत नाही. सोन्याच्या लंकेत आता महागाईचा धूर उठला आहे खरा, परंतु त्यात अजून तरी परदेशी पर्यटकांची दमछाक होताना दिसत नाही, हे नक्की.