राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा सरकारने काढलेला आदेश हा प्रयोग असला, तरी त्यातून संस्थाचालक-क्लासेसच्या युतीला कितपत धक्का बसेल, हा प्रयोग पुढे किती काळ यश मिळवेल, त्यातून काय साधले जाईल हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. सध्या ७५ टक्के हजेरी असल्याखेरीज परीक्षेला बसू न देण्याचा नियम असला, तरी त्याला सोयीस्कर बगल दिली जाते. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी आणि खासगी क्लासेसने स्वत:च्या गरजेनुसार वापरण्यास सुरुवात केलेली कनिष्ठ महाविद्यालयांची व्यवस्था मोकळी व्हावी, हा हेतू या निर्णयामागे आहे. तो स्तुत्य असला तरी या सक्तीच्या नथीतून खासगी क्लासेसना लगाम घालण्याऐवजी महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष दिले, तर ही समस्या सुटण्यासारखी आहे. बारावीच्या निकालापेक्षा अन्य प्रवेश परीक्षांच्या निकालांना अवास्तव महत्त्व आल्यानंतर गेल्या १५ वर्षांत खासगी क्लासचे पेव फुटत गेले. त्यातून अकरावीतच बारावीचा आणि प्रवेश परीक्षांचा टक्का वाढवण्याची घोकंपट्टी सुरू झाली. महाविद्यालयीन हजेरीऐवजी क्लासमधील हजेरी महत्त्वाची बनली. महाविद्यालयीन शिक्षण हे स्पर्धा परीक्षेसाठी पुरेसे नाही; त्याचा दर्जा त्या पातळीचा नाही, हे त्याचे एक कारण आणि पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांना हवा असलेला टक्का मिळवून देण्याची क्लासेस देत असलेली हमी हा त्याचा आणखी एक पैलू. या गुणांच्या चढाओढीचे व्यावसायिक महत्त्व ध्यानी आल्याने कॉलेज-क्लासेसची युती प्रत्यक्षात आली. सोयीच्या वेळा, आकर्षक पैसे आणि प्रसिद्धी यामुळे महाविद्यालयीन शिक्षक क्लासेसकडे वळले. पूर्वी वाणिज्य शाखांच्या मोजक्या तासिकांनाच विद्यार्थी हजेरी लावत असल्याचे वास्तव उघड झाले होते. पण प्रयोगशाळेच्या सुविधा, तेथील हजेरी सक्तीची असल्याने विज्ञान शाखेला ते ग्रहण लागले नव्हते. बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षांचा विचार करता कॉलेजमध्ये व्यवस्थित शिकविले जात नसल्याने आम्ही खासगी क्लासचा आधार घेतो, असे म्हणणे उघडपणे विद्यार्थी आणि पालकांकडून मांडले जात असल्याने केवळ हजेरीची सक्ती करून खासगी क्लासेसचे कॉलेजवरील अतिक्रमण मोडून काढता येईल का, हा प्रश्नच आहे. आताही तंत्रज्ञानाचा वापर करत बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्थाही कॉलेज-क्लासची युती एकत्रितपणे पुरवणार नाहीत कशावरून? त्यामुळे विद्यार्थी, महाविद्यालयीन शिक्षक आणि पालकांच्या मनोवृत्तीत बदल व्हायला हवा; त्याहीपेक्षा पुढील शिक्षणाच्या वाटा ओळखून शिकवण्याच्या पद्धतीत, त्याच्या दर्जात आमूलाग्र बदल करायला हवा. ते जोवर होत नाही, तोवर ही सक्ती; त्यातून काढलेल्या पळवाटा आणि त्या बुजवण्याच्या उपाययोजनांना फारसा अर्थ राहणार नाही.
सक्ती नव्हे, दर्जा महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 5:12 AM