पदांनी आणि अनुभवांनी माणसे मोठी वा प्रगल्भ होतातच असे नाही. काहीजणांचे गणंगपण केवढ्याही मोठ्या पदावर गेले तरी कायमच राहते. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली, राहुल गांधींना उद्देशून ‘क्लोन्ड हिंदू’ म्हणाले. मात्र सभ्यतेचे पांघरुण घेतलेल्या त्यांच्या पक्षाने त्याविषयी त्यांना खडसावले नाही. उलट त्या हीन उद्गारांनी त्यांचे भगत प्रसन्नच झाल्याचे दिसले. तोच कित्ता आता काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी गिरविला आहे. गुजरातच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींना ‘नीच’ म्हटले. काँग्रेस पक्षाने त्यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करून त्यांना त्यांच्या सर्व पदांसह पक्षातूनही बाहेर काढले. संस्कृतीचा नुसताच बडिवार मिरविणारे लोक आणि तिचा फारसा गजर न करता ती जपणारे लोक यांच्यातील फरक या दोन घटनांमुळे उघडही झाला. मणिशंकर अय्यर हे तसेही कमालीचे तोंडाळ गृहस्थ आहेत. ते कधी काळी परराष्टÑ मंत्रालयात अधिकारी होते. भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी पाकिस्तानसह अनेक देशात कामही केले. या खात्यात काम करणाºया माणसांवर जपून बोलण्याचा, संयमाने वागण्याचा आणि सभ्यता जपण्याचा संस्कार आपोआपच होत असतो. मणिशंकर अय्यर हे त्या संस्कारापासून दूर राहिलेले वाचाळ गृहस्थ आहेत. राहुल गांधी यांनी स्वत:च याच संदर्भात एक स्पष्ट लक्ष्मणरेषा साºयांसाठी आखून दिली आहे. सरकारच्या धोरणांवर वा पंतप्रधानांच्या भूमिकांवर टीका अवश्य करा, पण त्यांच्या पदाचा वा व्यक्तिमत्त्वाचा अपमान होईल असे काही लिहू वा बोलू नका. राहुल गांधींचा हा उपदेश मणिशंकर अय्यरांच्या कानापर्यंत पोहचला नसावा. त्याचमुळे त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून ते हीन उद्गार काढले आहेत. लोकशाही हा वादावादीचा, मतभेदांचा, टीकेचा व तिला दिलेल्या प्रत्युत्तरांचा कारभार आहे. मात्र त्यातील चर्चा धोरण, भूमिका, कार्यक्रम आणि पवित्रे याविषयीची असणे गरजेचे आहे ती व्यक्तिगत वा निंद्य पातळीवर घसरली की ती लोकशाहीला नुसती बदनामच करीत नाही, ती लोकशाही धोक्यातच आणत असते. दुर्दैवाने आपल्या लोकशाहीतील अनेक पक्षांनी व पुढाºयांनी ही जाणीव आता ठेवली नाही. ‘पंतप्रधानांवर टीका कराल तर हात छाटू, जीभ कापू, पाकिस्तानात पाठवू’ अशा धमक्या येथे सर्रास दिल्या जातात. एखाद्या दिग्दर्शकाचा शिरच्छेद करणाºयाला काही कोटींचे बक्षीस जाहीररीत्या सांगितले जाते. ममता बॅनर्जींसारख्या मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या महिलेचे नाक कापून आणणाºयाला पारितोषिक देण्याची घोषणा केली जाते. त्याहूनही हीन म्हणावा असा प्रकार हा की देशाच्या अनेक दिवंगत व थोर नेत्यांविषयी कमालीचा गलिच्छ व ओंगळ मजकूर फेसबुक व सोशल मीडियावर सध्या दिसतो. त्यातून गांधी सुटत नाहीत, नेहरू बचावत नाहीत आणि स्वातंत्र्यलढ्यात मोठा त्याग केलेली माणसेही सुटत नाहीत. अल्पसंख्य व दलितांविषयीचे लिखाणच नव्हे तर त्यांना दिली जाणारी अमानुष वागणूकही आपल्या लोकशाहीला काळिमा फासणारी असते. लव्ह जिहादचा घोषा, गोवंशाच्या मांसाच्या नुसत्या संशयावरून केले जाणारे खून व मारहाण ही देखील अशाच लोकविरोधी व संस्कारशून्य भूमिकेच्या परिस्थितीतून येत असते. त्यामुळे एकट्या मणिशंकर अय्यरविरुद्ध काँग्रेसने कारवाई करून या लोकशाहीचे शुद्धीकरण होणार नाही. त्यासाठी जेटलींवरही त्यांच्या पक्षाने कारवाई करणे गरजेचे आहे. आदित्यनाथ, स्मृती इराणी, प्राची आणि अनेक केंद्रीय मंत्री व खासदार आजवर हिंसाचाराची व बेकायदा कृत्यांची भाषा बोलले आहेत. त्यांनाही वेसण घालणे गरजेचे आहे.
केवळ मणिशंकरच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 5:11 AM