गुजरातच्या समुद्र किना-यावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा अडीचशे फूट उंचीचा भव्य पुतळा उभा करण्याचे मोदींनी ठरविल्यानंतर आता अयोध्येत प्रभू रामचंद्राचा तेवढाच मोठा पुतळा उभा करण्याची तयारी त्या राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी चालविली आहे. पुतळे उभारण्याचे एक प्रयोजन त्या महापुरुषांविषयीची पूज्यबुद्धी व श्रद्धा जागविणे हे असले तरी त्याचे दुसरे व आताचे प्रयोजन राजकारण हे आहे. पटेल काय किंवा प्रभू रामचंद्र काय, त्यांची नावे व स्मृती साºया जनमानसाच्या मनावर कोरली आहेत. पण त्यांचे पुतळे लावण्याखेरीज पुढाºयांचे समाधान आताशा होत नाही. ते उभे करण्याखेरीज त्यांच्याकडे पुढारकीचे दुसरे मार्गही फारसे नसतात. त्याचमुळे नरेंद्र मोदींनी सरदारांचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला व त्या राष्ट्रीय महापुरुषाचा तो विशालकाय पुतळा बनविण्याचे काम चीन या देशाला देऊन टाकले. योगी आदित्यनाथ लावणार असलेला रामचंद्राचा पुतळा आता भारतात होतो की रावणाच्या लंकेत ते आपण पहायचे आहे. जनसामान्यांचे लक्ष त्यांच्या दैनंदिन प्रश्नांवरून आणि राजकारणाच्या अपयशावरून दूर करण्यासाठी कधी युद्धे केली जातात तर कधी असे पुतळ््यांचे व उत्सवांचे आयोजन केले जाते. पुतळे वा उत्सव हे जोवर श्रद्धेचे भाग असतात तोवर त्यांचे पावित्र्य व शुचिता टिकत असते. जेव्हा ते राजकीय लाभासाठी वा सुडासाठी उभे केले जातात तेव्हा त्यातले पावित्र्यच नव्हे तर सौंदर्यही ओसरले असते. अलेक्झांडरने अथेन्स जिंकले तेव्हा त्या शहराच्या मध्यभागी आपल्या गुरूचा, अॅरिस्टॉटलचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. अॅरिस्टॉटलचे विद्यापीठ अथेन्समध्येच असल्याने त्या नगरातील लोकांना स्वाभाविकच तो त्यांचा अपमान वाटला. परिणामी तेव्हा हयात असलेले अॅरिस्टॉटलचा त्यांनी जो छळ केला त्याला कंटाळून त्याने हेमलॉक हे विष पिऊन वयाच्या ६० व्या वर्षी आत्महत्या केली. आदित्यनाथांचा राम असाच त्यांच्या पक्षाच्या विजयाची खूण म्हणून आणि समाजवादी पक्ष व त्याचे मुस्लीम मतदार यांच्या पराजयाचे चिन्ह म्हणून उभा होईल. हा प्रभू रामचंद्राविषयीची श्रद्धा जागविण्याचा प्रकार नसून अल्पसंख्यकांच्या श्रद्धा डिवचण्याचा प्रकार आहे. त्यातच या योग्याने परवा राज्याच्या पर्यटनस्थळाच्या यादीतून जगप्रसिद्ध ताजमहालचे नाव गाळण्याचा आचरटपणाही केला आहे. मोदींचे सरदारप्रेमही असेच. त्यांच्यावर गांधीजींनी न केलेला अन्याय, केलाच कसा होता हे दाखविण्यासाठी त्यांचा पुतळा आता ते उभा करीत आहेत. देशाच्या फाळणीसाठी गांधीजींना जबाबदार धरणाºया बेजबाबदार मनोवृत्तीच्या संघटनेचे ते प्रतिनिधित्व करतात. गांधी-नेहरू हे फाळणीला जबाबदार आणि सरदार तिला विरोध करणारे असे त्यांचे खोटे मानसचित्र असते. वास्तव हे की पटेल आणि नेहरू हे अखेरच्या क्षणी नाईलाज म्हणून फाळणीला राजी झाले आणि गांधी त्यांच्या त्या निर्णयापासून दूर राहिले होते. मात्र नव्या पिढ्यांना हा इतिहास ठाऊक नसल्याच्या वास्तवाचा फायदा घेऊ इच्छिणाºयांना त्या पिढ्यांच्या मनावर खोटा इतिहास बिंबवता येणे जमणारे आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती मृत्यूची एवढ्या वर्षांनंतर पुन्हा चौकशी करण्याचा केंद्र सरकारचा खटाटोपही अशाच प्रयत्नात बसणारा आहे. मोदी आणि योगी यांच्या या प्रयत्नांकडे अशा दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. त्यांच्या पुतळ््यांविषयीच्या भावनेत श्रद्धा कमी आणि सूड अधिक आहे. देशकारण कमी आणि राजकारण अधिक आहे. शिवाय त्यात सर्वधर्मसमभावाहून परधर्मद्वेषाची तीव्रताही अधिक आहे. समाजाचे दुहीकरण करण्याच्या या प्रयत्नांबाबत देश व जनतेने जास्तीची सावधानता व डोळसपण स्वीकारणे गरजेचे आहे.
ही श्रद्धा नव्हे, हा द्वेषच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:04 AM