भाजपा आणि संघ परिवारातील बेतालांच्या मुसक्या आवळणारे आता कोणी शिल्लक नाही, हेच आता देशातील लोकानी नीट समजून घेण्याची गरज आहे. मुळात ही मंडळी जात्याच बोलभांड आणि सरकार त्यांचे असल्याने ते अंमळ अधिकच चेकाळलेले. आजवर साक्षी महाराज, अमुक साध्वी, तमुक साधू यांच्या यादीत नव्याने जोडले गेलेले नाव म्हणजे कर्नाटकातील भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे. केन्द्रातील मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी अलीकडेच काढलेल्या अत्यंत द्वेषमूलक उद्गारांचा निषेध करण्यासाठी संसदेच्या आवारातील बापूंच्या पुतळ्याला साक्षी ठेऊन विरोधी पक्ष गुरुवारी निषेध व्यक्त करीत होते आणि त्याच दिवशी या अनंतकुमारांचे उद्गार उजेडात आले. उत्तर कन्नड मतदारसंघातून पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले हे खासदार नवखे तर नाहीतच पण त्यांना अपरिपक्वदेखील म्हणता येणार नाही. परंतु त्यांनी जाहीरपणे असे उद्गार काढले की, जोवर जगाच्या पाठीवरुन इस्लामचा नायनाट होत नाही तोवर दहशतवादाचाही नायनाट होऊ शकत नाही. सिरसी येथील स्वत:च्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रस्तुत उद्गार काढले आणि वरतून दूरचित्रवाणीच्या पत्रकारांना असेही बजावले की, माझे वक्तव्य जसेच्या तसे प्रक्षेपित करा. कोणी कितीही दबाव आणला तरी आपण ते मागे घेणार नाही! विशेष म्हणजे उत्तर कन्नडच्या पोलिसांनी आपणहून अनंतकुमार यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल करुन घेतला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या वतीने या वक्तव्यास दुर्दैवी संबोधून त्याचा निषेध केला गेला तर एका मुस्लीम संघटनेने अनंतकुमार यांच्याविरुद्ध भाजपाने कारवाई करावी अशी जाहीर मागणी केली. यात खरी पंचाईत कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते जगदीश शेट्टर यांची झाली. अनंतकुमार यांच्या वक्तव्यांशी आपण सहमत नाही इतकीच प्रतिक्रिया देऊन पुढे बोलणे त्यांनी टाळले. इतके दिवस भाजपा आणि संघ परिवारातील उत्तरेकडचे लोकच अशी आगखाऊ आणि जाती-धर्मात तेढ उत्पन्न करणारी वक्तव्ये करीत होते. आता हे लोण दक्षिणेकडेही पसरु लागलेले दिसते. खुद्द पंतप्रधान नरेन्द्र मोदी जाहीरपणे धर्मा-धर्मातील सलोखा वाढविण्याची बात करीत असतात, पण वास्तवात मात्र तसे दिसत नाही. खरे पाहाता वेळीच खुद्द मोदींनी अशांना लगाम घातला असता तर अनंतकुमारांची अशी हिंमत झालीच नसती.
आता अनंतकुमार
By admin | Published: March 03, 2016 11:57 PM