माउंट एव्हरेस्ट हे जगातलं एक अद्भुत आश्चर्य. निसर्गसौंदर्याचा अप्रतिम नजराणा. जगभरातल्या गिर्यारोहकांसाठी माउंट एव्हरेस्ट हे कायम आत्यंतिक आकर्षणाचं ठिकाण ठरलं आहे. त्यामुळे जगभरातून पर्यटक आणि गिर्यारोहकांची रीघ माउंट एव्हरेस्टकडे लागलेली असते. पण जगातलं हे सर्वात मोठं आश्चर्य सध्या अनेक कारणांनी धोक्यात आहे. गिर्यारोहकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे एव्हरेस्टवर हजारो टन कचरा साचला आहे. त्याच्याशी नेपाळ सरकार झुंजतं आहे. गेल्या वर्षी तर इतक्या गिर्यारोहकांना नेपाळ सरकारनं परवानगी दिली होती की, शिखरावर अक्षरश: चेंगराचेंगरी झाली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि शारीरिक थकव्यामुळे अनेक गिर्यारोहकांना आपले प्राण गमवावे लागले. यंदा माउंट एव्हरेस्ट नव्याच संकटात सापडला आहे. माउंट एव्हरेस्ट कोरोनाच्या विळख्यात अडकतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. अर्थात, त्याला कारण आहे नेपाळ सरकार. कोरोनामुळे नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्टवरील चढाई सर्वांसाठी बंद ठेवली होती, पण हाच माउंट एव्हरेस्ट नेपाळला पर्यटनाच्या माध्यमातून सर्वाधिक पैसाही मिळवून देतो. कोरोनामुळे आधीच नेपाळची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. त्यात लॉकडाऊन आणि माउंट एव्हरेस्टवरील चढाईच बंद केल्यामुळे मोठीच पंचाईत होऊन बसली. कुठल्याही मार्गाने का होईना, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, यासाठी नेपाळ सरकार अक्षरश: कासावीस झालं आहे. त्यामुळेच माउंट एव्हरेस्टपासून मिळणारा पैसा सुखासुखी सोडण्यास नेपाळ सरकार तयार नाही. गेल्या वर्षी कोरोनामुळे बंद करण्यात आलेला माउंट एव्हरेस्ट यंदा नेपाळ सरकारनं नुकताच खुला केला आहे. मार्च ते मे हा तीन महिन्यांचा काळ माउंट एव्हरेस्टचा मुख्य सिझन असतो. जगातल्या या सर्वोच्च शिखरावर चढाई करणंही या तीन महिन्यांतल्या काळात तुलनेनं बऱ्यापैकी सोपं असतं. इतर वेळी गारठा आणि वादळी वारे, यामुळे मृत्यूची दाट छाया असते. मुळातच सिझनचा सुरुवातीचा काळ वाया गेल्याने, आता राहिलेल्या काळातून तरी ‘पैसा वसूल करावा’ या निर्णयाप्रत नेपाळ सरकार आलं आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत तीनशे गिर्यारोहकांना माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी परवानगी दिली आहे. येत्या काळात त्यात आणखी वाढ होईल. अर्थातच, एव्हरेस्टवर कोरोनाला अटकाव करण्यासाठी नेपाळ सरकारनं काही नियम केले आहेत. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह टेस्ट आणि त्या संदर्भाचं प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. मास्क गरजेचा आहे. सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य आहे. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. यदाकदाचित कोणाला कोरोनाचा संसर्ग झालाच, तर त्यावर ही मेडिकल टीम देखरेख ठेवेल. कोरोना झालेल्या व्यक्तींना पुन्हा सुरक्षितपणे खाली आणण्याची सोयही नेपाळ सरकारने केली आहे. लोकांना एव्हरेस्टवर घेऊन जाणाऱ्या संस्थांसाठीचे नियमही कडक करण्यात आले आहेत, पण तरीही एवढी खबरदारी पुरेशी नाही. जगातल्या या नितांत सुंदर ठिकाणाला कोरोनापासून वाचविण्यासाठी तो बंदच ठेवला पाहिजे, असं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं आहे. नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असलं, तरीही २६,२०० फुटांपेक्षाही जास्त उंची असलेली आणखी सहा शिखरं नेपाळमध्ये आहेत. पैशांसाठी ही सारी शिखरं नेपाळनं आता खुली केली आहेत. माउंट एव्हरेस्टला ‘डेथ माउंटन’ म्हणून ओळखलं जातं. कोरोनाचा शिरकाव तिथे झाला, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आणखीच वाढेल. नेपाळनं काेरोनाच्या काळात बरंच काही गमावलं आहे. नेपाळची नुसती अर्थव्यवस्थाच नाही, तर लाखो लोकांना जगण्याचा उदरनिर्वाहही माउंट एव्हरेस्ट त्यांना मिळवून देतो. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या सिझनवरच अनेकांचा संपूर्ण वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. नेपाळ सरकारच्या आकडेवारीनुसार तीन कोटी लोकांपैकी १५ लाख लोकांचा रोजगार कोरोनानं हिरावून घेतला. माउंट एव्हरेस्टवर येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या आधाराने चालणारे इथले अनेक लहान-मोठे उद्योगही बंद पडले आणि त्यांचं मोठं नुकसान झालं. कामगार देशोधडीला लागले. त्यामुळे मोठा धोका पत्करून नेपाळ सरकारनं माउंट एव्हरेस्ट पर्यटकांसाठी पुन्हा खुला केला आहे, पण आधीच जीवघेणा असलेला माउंट एव्हरेस्ट आता कोरोनामुळे अधिक जीवघेणा झाला आहे.
शेरपांवर आली बटाटे विकायची वेळ!एव्हरेस्ट चढाईसाठी आलेल्या पट्टीच्या गिर्यारोहकांपैकी अनेकांचं म्हणणं आहे, घरात बसून आम्हाला डिप्रेशन आलं आहे. पुन्हा जर एव्हरेस्ट, गिर्यारोहणाकडे वळलो नाही, तर त्या नैराश्यानेच आम्हाला मृत्यू येईल. दुसरीकडे कोरोनामुळे माउंट एव्हरेस्ट परिसरातील अनेक शेरपा आणि कामगारांना आपापल्या गावी परतावं लागलं आहे. शेती करून आणि भाजीपाला, बटाटे विकून हे लोक कशीबशी गुजराण करत आहेत.