क्रिकेटच्या खेळातील बारकावे नका का समजेनात पण तो खेळ पाहाणे किंवा तो पाहात असताना आपल्याला कोणी पाहाते आहे किंवा नाही यासाठी सतत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर नजर लावून बसणे आणि या खेळावर सतत विशेष टिप्पण्ण्या देत राहणे हीच मुळात एक मोठी फॅशन बनली आहे. विशेषत: आयपीएलचा जमाना सुरु झाल्यापासून आणि ‘चिअर गर्ल्स’ वगैरे प्रकारांनी त्यात प्रवेश केल्यापासून क्रिकेटची फॅशन जरा जास्तीच जोरात आली आहे. त्यामुळेच की काय या फॅशनेबल खेळाशी संबंधित असलेल्यापैकीच कोणाला तरी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलाजी’ (निफ्ट)या केन्द्र सरकारच्या प्रतिष्ठेच्या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांची नियुक्ती करण्यात आली असावी. भारतीय क्रिकेट संघात फलंदाजीसाठी सलामीला येणाऱ्या सुनील गावस्कर यांचे युग भरात असताना त्यांना दुसऱ्या बाजूने टेकू देण्याचे काम ज्या अनेकानी केले त्यातीलच एक नाव चेतन चौहान यांचे. त्यांच्यातील क्रिकेट संपल्यानंतर त्यांनी भाजपाची कास धरली आणि दोनदा लोकसभेवर निवडूनही गेले. तरीही त्यांनी क्रिकेटशी आपली नाळ घट्ट बांधून ठेवली आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात विद्यमान अर्थमंत्री व या असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जेटली यांचे ओशाळे म्हणून वावरु लागले. तेव्हां त्यांची या प्रतिष्ठेच्या संस्थेवर वर्णी कशी लागली याचा उलगडा व्हावा. सुमारे दहा वर्षांपूर्वी संसदेच्या एका कायद्यान्वये निफ्टची स्थापना झाली. या कायद्यानुसार देशाचे राष्ट्रपती तिचे कर्ताधर्ता. तरीही या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाला नेमले जावे याचे स्पष्ट मार्गदर्शन सदर कायद्यातच केले गेले आहे. त्यानुसार एखादा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विषयातील जाणकार किंवा शास्त्रज्ञ तिथे यावा अशी कायद्याचीच अपेक्षा आहे. चेतन चौहान यात कुठेच बसत नसल्याने त्यांची नियुक्तीवर तीव्र प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. अर्थात केन्द्र सरकारवर त्याचा काही परिणाम होईल अशी भाबडी आशा बाळगण्यास वाव नाही. सरकार संवेदनशील असते तर गजेन्द्र नावाचे दुसरे चौहान आणि पहलाज निहलानींसारखे गणंग कधीचेच घरी बसले असते.
आता ‘एनईएफटी’
By admin | Published: June 21, 2016 1:56 AM