भारतासह जगभरात कोरोनाची तिसरी लाट येते आहे का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते. डिसेंबर २०१९मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा संसर्ग सर्वप्रथम झाला की, हा संसर्ग तयार करण्यात आला यावर वाद आहे; पण पाहता पाहता केवळ शंभर दिवसांत जगातील सर्वच देशांमध्ये तो पसरला. अमेरिका, युरोप खंड आणि भारतात झपाट्याने पसरला. असंख्य लोक संसर्गाने बाधित झाले. काही शहरे, प्रांत किंवा अखंड देशात लॉकडाऊन लागू करावा लागला. प्रचंड जीवितहानी झाली. आर्थिक नुकसानही अतोनात झाले. मानवी जीवनाचा फेराच थांबला.
त्यानंतर गतवर्षीच्या प्रारंभी दुसरी लाट आली. तिचाही फटकाही मोठ्या प्रमाणात बसला. दरम्यानच्या काळात प्रतिबंधात्मक लस आली. सरकारने लोकसहभागातून लसीकरणाचा वेग वाढवला. तसा लोकांनाही धीर मिळाला. पहिल्या लाटेसारखी भीती राहिली नाही, तसा बेदरकारपणाही वाढीस लागला. तिसरी किंवा चौथी लाट येणार नाही, असे मानणारे गट पडले. एक मात्र निश्चित आहे की, कोरोनाच्या जंतूचे पूर्ण उच्चाटन झालेले नाही. त्याचा संसर्ग खाली खाली येत असल्याचे दिसत असतानाच भारतात दिल्ली आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी संसर्ग वाढतो आहे, असे गेल्या दोन-चार दिवसांतील आकडेवारीवरून दिसते.
चीनमध्ये त्याची उत्पत्ती (किंवा निर्मिती) झाली, असे आपण मानतो आहोत. त्या देशाच्या नेतृत्वाने आर्थिक हव्यासापोटी अनेक गाेष्टींकडे दुर्लक्ष करून सर्व व्यवहार लवकर सुरू केले. आजची स्थिती अशी आहे की, चीनची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या शांघाय शहरात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. शिवाय सुमारे चाळीस लहान-मोठ्या शहरांत चीनला लॉकडाऊन जाहीर करावे लागले आहे. कोरोनाच्या संसर्गाची सुरूवात झाल्यावर केवळ शंभर दिवसांत त्याने संपूर्ण जग व्यापले, तशी ही तिसरी लाट जगाला व्यापू शकते. व्यापार आणि आर्थिक लाभापोटी जगाचे जागतिकीकरण लाभदायक कसे आहे, हे आपण सांगत आलो आणि साऱ्या जगाने ते स्वीकारले तरी त्याबरोबर मानवी व्यवहार किंवा संपर्कही आवश्यक झाला. तसा कोरोनासारखा संसर्गही प्रचंड गतीने पसरू लागला आहे. संसर्गजन्य रोगांचा असा सारखाच अनुभव येतो आहे.
आता ही तिसरी लाट येणे परवडणारे नाही. चीनसारख्या देशाने विकसित केलेल्या प्रतिबंधात्मक लसीविषयीही वैज्ञानिक शंका व्यक्त करत आहेत. याउलट भारतासह आशिया खंडातील पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळसारख्या छोट्या देशांनीही संसर्गावर यशस्वी मात केली आहे. आता येऊ घातलेली किंवा येण्याची शक्यता असलेल्या लाटेला रोखण्यासाठी आपण सतर्कतेने सामना करणे महत्त्वाचे आहे. रोग झाल्यावर करायच्या उपायांपेक्षा तो होऊच नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.
पहिल्या लाटेत सर्वजण अननुभवी होते. दुसऱ्या लाटेत काही उपाययोजना करता आल्या होत्या. आता हा सर्व अनुभव पाठीशी असताना तिसरी लाट आलीच तर काळजी घेण्याची गरज आहे. दिल्ली किंवा मुंबईसारख्या महानगरांत रुग्ण वाढताना दिसत आहे. तो पुन्हा आला तर लॉकडाऊनसारख्या उपाययोजना करणे परवडणारे नाही. गेल्या दोन वर्षांत लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झाले आहेत. केवळ उत्तम हवामान, पुरेसा पाऊस आणि ग्रामीण भागात दूरवर राहणाऱ्या लोकांमुळे आपण वाचलो आहोत. शैक्षणिक नुकसान खूप झाले. असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. तिसरी लाट येण्यापूर्वी शंभर टक्के लसीकरण झालेले नाही, याचीही जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
काही वैज्ञानिकांच्या मतानुसार, वर्ष-दीड वर्षांपूर्वी लसीकरण झाले. त्याचा प्रभाव आता कितपत राहिला आहे, यावर भिन्न-भिन्न मते मांडली जात आहेत. ते खरे असेल तर त्यावर संशोधन करून पुढील उपाययोजना काय करता येतील, याचाही विचार करायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना संसर्गासंबंधीच्या साध्या-सोप्या दक्षतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कोरोनाचा संसर्ग किती वेगाने पसरतो आहे, याचा पहिल्याच लाटेत अनुभव आला आहे. आज पुन्हा एकदा चीन रडारवर आहे. शांघायसारखे महासत्तेचे आर्थिक राजधानीचे शहर पूर्णत: बंद करून जनतेला कोंडून ठेवावे लागले आहे. सर्वप्रकारच्या सरकारी मदतीवर त्या शहरातील जनता कशीबशी जगते आहे. भारतात मुंबई किंवा दिल्लीसह मोठ्या शहरांत संसर्ग वाढला तर तो इतरत्र पसरायला वेळ लागणार नाही. तो पुन्हा आलाच तर आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, याची दक्षता घेणे हेच पहिले कर्तव्य असले पाहिजे.