- दिलीप तिखिलेपुढची सार्वत्रिक निवडणूक भाजपा नक्कीच ‘शौचालया’च्या मुद्यावर लढवील असे दिसते. कुणी म्हणेल हा काय निवडणुकीचा मुद्दा झाला! पण आपल्या पीएमसाहेबांची भाषणे आणि त्यांनी केलेल्या घोषणांंवर बारीक नजर टाकली तर या मुद्यात दम आहे हे लक्षात येईल. अलीकडचीच घोषणा बघा...‘आधी शौचालय मगच देवालय’. ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणणारे जेव्हा शौचालयाचा नारा देतात तेव्हा सुजाणांनी काय ते समजून घेतले पाहिजे. तसेही देवालयाच्या मुद्यावर निवडणूक जिंकता येत नाही हे काय भाजपाला ठाऊक नाही.सत्तेवर आल्यापासून मोदींनी जितक्या काही घोषणा दिल्या त्यापैकी बहुतांश शौचालयाशीच संबंधित असल्याचे लक्षात येईल. मोदी साहेबांचा घोषणा करण्याचा अंदाजही निराला आहे. मित्रहो... म्हटल्यानंतर ते बºयापैकी पॉज घेतात. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय? अटलजीही पॉज घ्यायचे, कितीतरी मोठा घ्यायचे. पण या दोन पॉजमध्ये मोठा फरक आहे राव. अटलजी पॉज घ्यायचे तो श्वास घेण्यासाठी, मोकळा करण्यासाठी, पण मोदीजी मित्रहो...म्हटल्यानंतर पॉज घेतात तेव्हा समोर बसलेल्या मित्रांचा ‘आता कोणती घोषणा कानावर येणार’ या धास्तीने श्वास कोंडला जातो बघा.असो! मोदीजींची सुरुवातीची घोषणा आहे, ‘स्वच्छ भारत’. आता स्वच्छतेचा संबंध शौचालयाशी नाही का? साधं पोट स्वच्छ करायचे म्हटले तर शौचालय लागते, आपल्याला तर संपूर्ण देशच स्वच्छ करायचा आहे.आणखी एक घोषणा. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’. येथे तर खाण्याचा संबंध थेट शौचालयाशीच आहे. काहीजण म्हणतीलही, ‘खानेही नही देते, फिर शौचालय क्यू बनवाते’. म्हणोत बिचारे.‘नोटाबंदी’चेही तेच. तुम्ही म्हणाल नोटाबंदी आणि शौचालय याचा अर्थाअर्थी तरी संबंध आहे का? पण मोदींच्या मते आहे. ते म्हणतात, काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत पैसा खाण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही. इतके वर्षे खाऊन, खाऊन त्यांचा हाजमा खराब झाला. हा पैसा बाहेर काढायचा ना! म्हणून नोटाबंदीचा हा हाजमोला. तर चला, लागा निवडणुकीच्या तयारीला. मुद्दा माहीत आहे ना!
आता ठप्पा मारा शौचालयावर, पुढची सार्वत्रिक निवडणूक भाजपा नक्कीच ‘शौचालया’च्या मुद्यावर लढवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:43 AM