रवींद्र राऊळ, वृत्तसंपादक अगदी घरातल्यांपासून डिलिव्हरी बॉय, वर्गणी मागणारे, समाजकंटकांपर्यंत साऱ्यांचे सॉफ्ट टार्गेट ठरणाऱ्या वयोवृद्धांचे होणारे हाल पाहून हेल्पेज इंडियाने मुंबई पोलिसांच्या मदतीने सुरू केलेली हेल्पलाइन आता शेकडो वृद्धांसाठी लाइफलाइन ठरत आहे. या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून राज्यातील इतरही पोलिस दलांनी त्याचं अनुकरण केलं आहे. या हेल्पलाइनवर फोन करून मदत मागणाऱ्या एकाकी वयोवृद्धांना काय हवं असतं? सगळ्या भौतिक सुखाच्या पलीकडे गेलेल्या या वृद्धांना हवी असते ती केवळ आपुलकी. भावनिक ओलाव्याच्या शोधात असणारे वयोवृद्ध त्यांना गरज भासेल तेव्हा या हेल्पलाइनवर फोन करतात. काहीजण तर धड पत्ताही सांगण्याच्या अवस्थेत नसतात. त्यांचे लोकेशन ट्रॅक करण्याची व्यवस्था असल्याने स्थानिक पोलिस अथवा स्वयंसेवक अवघ्या काही मिनिटांतच त्यांच्या दारावरची बेल वाजवतात.
आजच्या गळेकापू स्पर्धेच्या युगातील जगण्याच्या लढाईत वयोवृद्ध सांदीकोपऱ्यात फेकले गेलेत, हे एक कटू वास्तव आहे. कधी कुटुंबीय, नातेवाईक, कधी शेजारीपाजारी यांच्याकडून तुसडेपणाची वागणूक मिळाल्याने हे वयोवृद्ध हवालदिल, हताश होतात, पण पोलिसांची हेल्पलाइन या हतबल वृद्धांच्या आयुष्यात रंग भरायचे काम करतेय. ‘मरनाही मेरी जिंदगी है’, असे म्हणत आपल्या करुण कहाण्या सांगणारे वृद्ध खाकी वर्दीने दिलेल्या भावनिक आधारामुळे ‘अब हम जिना चाहते है’ असे म्हणू लागतात, तेव्हा पोलिसांनाही आपले प्रयत्न सार्थकी लागल्याचा आनंद मिळतो.
चालतेबोलते गुगल एकीला भवन्स कॉलेजमध्ये तिच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींनी आयोजित केलेल्या शोला जायचं होतं. स्वयंसेवकाच्या मदतीने ती त्या शोला गेली. जुन्या सवंगड्यांना भेटली. तिथल्या वातावरणात हरखून गेली. रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांचे भाषांतर करणाऱ्या त्या विदुषीचा आनंद पाहून ‘गंगेत डुबकी मारून काय पुण्य मिळवायचं? खरं पुण्य तर हे आहे’, असंच स्वयंसेवकांना वाटलं.एकाकी वृद्धांना हवा केवळ आपला थोडासा वेळ. प्रत्येक वृद्ध म्हणजे एक वेगळी कहाणी आहे. आपण गुगलवर सगळ्या माहितीच्या शोधात राहतो. पण अनुभवाचा, ज्ञानाचा खजिना असलेल्या वृद्धांकडे पाहायला मात्र कोणी तयार नाही. हे चालतेबोलते गुगल आपल्याला गुगलपेक्षाही बरंच काही देऊ शकतात, हे स्वयंसेवकाचे वाक्य बरेच काही बोलून जाते.
आजच्या गळेकापू स्पर्धेच्या युगातील जगण्याच्या लढाईत वयोवृद्ध सांदीकोपऱ्यात फेकले गेलेत, हे एक कटू वास्तव आहे. कधी कुटुंबीय, नातेवाईक, कधी शेजारीपाजारी यांच्याकडून तुसडेपणाची वागणूक मिळाल्याने हे वयोवृद्ध हवालदिल, हताश होतात, पण पोलिसांची हेल्पलाइन या हतबल वृद्धांच्या आयुष्यात रंग भरायचे काम करतेय. ‘मरनाही मेरी जिंदगी है’, असे म्हणत आपल्या करुण कहाण्या सांगणारे वृद्ध खाकी वर्दीने दिलेल्या भावनिक आधारामुळे ‘अब हम जिना चाहते है’ असे म्हणू लागतात, तेव्हा पोलिसांनाही आपले प्रयत्न सार्थकी लागल्याचा आनंद मिळतो.
त्या वृद्धांच्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकून पोलिसही हेलावून जातात. आपल्या डोळ्यातील पाणी लपवत पोलिस त्यांना हवी ती मदत करतात. अशावेळी पोलिसांची कर्तव्य ठरवून देणाऱ्या पोलिस मॅन्युअलचाही त्यांना विसर पडतो. मग त्या वृद्धांना औषधे आणून दे, त्यांच्यासोबत पत्त्याचा किंवा बुद्धिबळाचा डाव रंगव. त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मार, त्यांनी केलेल्या कविता ऐक, त्यांचे संग्रह पहा यात ते गुंतून जातात. वॉकीटॉकीवर पुढचा इमर्जन्सी कॉल येईपर्यंत ते हे न कंटाळता करत राहतात. त्यावेळी वृद्धांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचा आनंद हा त्यांना एखाद्या मेडलपेक्षा मोठा वाटू लागतो.
दुःख शेअर करण्यासाठीच पोलिसांची हेल्पलाइनबहुतेक कॉलमागे तक्रारी कमी आणि एकाकीपणाने तुटून पडलेल्या आणि सोबतीच्या शोधात असलेल्या वृद्धांचीच संख्या अधिक असते. मालमत्तेच्या वादातून मुलासुनांनी वाळीत टाकलेल्या वृद्धांच्या कहाण्या अस्वस्थ करून जातात. काही वृद्धांना सरकार, महापालिका, पोलिसांकडून मदत मिळत नाही याची टोचणी असते. बाहेरगावी अथवा परदेशात स्थायिक झालेली मुलं आपली विचारपूस करत नाहीत, फोन केला तरी तो उचलत नाहीत याची खंत असते. काहींना घरातील उपाशी ठेवतात तर काहींना मुलं घरात कोंडून कामावर जातात. आयुष्याच्या सायंकाळी हे दुःख शेअर करण्यासाठीच पोलिसांची हेल्पलाइन त्यांना जवळची वाटते.
अब मैं बिलकुल ठीक हूअंधेरी येथे एकाकी राहणाऱ्या वृद्ध महिलेला असाध्य आजारावरील उपचारांसाठी आठवड्यातून दोनदा एका मोठ्या रुग्णालयात जावं लागायचं. पण सोबत करायला कोणीच नाही. मरना ही मेरी जिंदगी है, असं म्हणणाऱ्या त्या वृद्धेला स्वयंसेवकांनी साथ दिली. काही महिने ते दर अपॉइंटमेंटला तिच्यासोबत गेले. उपचाराने आणि विशेष म्हणजे भावनिक आधाराने ती खडखडीत बरी झाली. ‘अब मैं बिलकुल ठीक हू. अब मैं जिना चाहती हू, असा निर्धार व्यक्त करताना तिच्या चेहऱ्यावर निर्व्याज हसू फुललं होतं.