उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने स्वत:च्या वाढदिवसाची भेट म्हणून जगाला हैड्रोजन बॉम्बची भेट दिल्याचा दावा तेथील सरकारने केला असला तरी ज्या बॉम्बची तिथे बुधवारी चाचणी केली गेली तो हैड्रोजन बॉम्बच असल्याबद्दल जगभरातील अनेक राष्ट्रांना आणि तज्ज्ञांना रास्त शंका आहे. हैड्रोजन बॉम्ब अणु बॉम्बच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक संहारक मानला जातो. अर्थात दोन्ही बॉम्ब अंतत: मानवतेच्या विध्वंसालाच कारणीभूत ठरत असल्याने उत्तर कोरियाने केलेली चाचणी भले हैड्रोजन बॉम्बच्या ऐवजी अणुबॉम्बची केली गेली असली तरी त्या राष्ट्राने केलेली आजवरची अशी ही चौथी चाचणी आहे. चीन आणि रशियाची या राष्ट्राशी दोस्ती तर जपान व दक्षिण कोरियाशी दुष्मनी आहे. तसे असले तरी चीन, रशियासकट साऱ्या राष्ट्रांनी आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने किम जोंग उन यांच्या नाठाळ खोडसाळपणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करुन निषेधही केला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी केलेल्या तिसऱ्या अणु चाचणीनंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने त्या राष्ट्रावर काही निर्बन्ध लागू केले होते. पण त्यांचा फारसा काही प्रभाव पडला नाही, हेच या चौथ्या चाचणीतून समोर आले आहे. मध्यंतरी इराणने आपला अणु कार्यक्रम पुढ रेटण्याचा प्रयत्न केला तेव्हां त्याच्यावर असंख्य निर्बन्ध लागू करुन त्याला चर्चेसाठी समोरासमोर येण्यास बाध्य केले गेले तसाच प्रयोग उत्तर कोरियाबाबत करावा असा काही जागतिक नेत्यांचा सूर असला तरी आजच्या घडीला त्याबाबत एकमत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेने आर्थिक निर्बन्ध लागू केल्यास चीन त्याचा लाभ उठवेल आणि आपले नुकसान होईल अशी अमेरिकेला धास्ती वाटते. म्हणजे व्यापार महत्वाचा ठरतो. अण्वस्त्रांबाबत साऱ्या जगालाच चिंता वाटत असली तरी ही चिंता लोकशाही मानणारी राष्ट्रे, पक्षीय हुकुमशाहीची राष्ट्रे आणि उत्तर कोरियासारखी एकाधिकारशाही असलेली राष्ट्रे यांच्या बाबतीत चढत्या भांजणीतील असते. उत्तर कोरियाच्या बुधवारच्या चाचणीवर भारताची प्रतिक्रिया अन्य राष्ट्रांच्या तुलनेत जरा अधिकच कठोर आणि चिंतेची असण्याचे प्रमुख कारण म्हणजे अण्वस्त्रांबाबत उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घ काळापासून असलेले सहचर्य. पाकिस्तानला उत्तर कोरियानेच चोरुन अणुविज्ञान दिले आहे आणि त्याच्याच आधारे पाकिस्तानने अण्वस्त्रांची निर्मिती केली आहे. आज जगात सर्वत्रच अत्यंत असुरक्षिततेचे आणि दहशतवादाचे वातावरण निर्माण झाले असून दहशतवादी संघटनांचे नवनवे अवतार उदयास येत आहेत. उद्या त्यांच्या हाती अशी संहारक अस्त्रे पडली तर संपूर्ण विश्वाचा संहार होण्यास वेळ लागणार नाही.
नाठाळ व खोडसाळ
By admin | Published: January 07, 2016 11:27 PM