कर्जमाफीविषयी कोणताही राजकीय पक्ष काहीही दावा करीत असला तरी राज्य शासनाने हा निर्णय शेतकऱ्यांची एकजूट आणि आंदोलनाच्या दबावामुळे घेतला हे उघड सत्य आहे. या निर्णयाचे श्रेय आता प्रत्येक पक्षाने घेणे ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे. परंतु शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या विषयावरून सुरू असलेले रणकंदन ‘नुरा कुस्ती’ असल्याचा संशय वाटण्याजोगी स्थिती आहे. खान्देशात या दोन्ही पक्षांचे नेते नुकतेच येऊन गेले. कर्जमाफीचा लाभ, दहा हजार रुपयांची उचल यासंबंधी सरकारला धारेवर धरण्यापेक्षा या पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य केले. उध्दव ठाकरे आधी आले. शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ असल्याची अजित पवार यांची टीका ठाकरेंना चांगलीच झोंबलेली होती. अजित पवार यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा असल्याने ते सरकारविरुध्द बोलत नसल्याची मर्मभेदी टीका ठाकरे यांनी केली. दुसऱ्याच दिवशी अजित पवार आले. त्यांनी गांडुळाचा अधिक विस्तार करीत शिवसेनेच्या ‘ढोल वाजवा’ आंदोलनाची टर उडवली. सरकारमध्ये राहायचं आणि सरकारला विरोधही करायचा अशी डबल ढोलकी शिवसेना वाजवित असल्याची टीका पवारांनी केली. त्यांनी शिवसेनेचे पुरते वस्त्रहरण करणारी उदाहरणे देत सभा जिंकल्या. जिल्हा बँकेत कर्जमाफीच्या याद्या कसल्या तपासता, मातोश्रीजवळ मंत्रालय आहे, तेथून याद्या घ्या आणि तपासा, मुंबई महापालिकेकडे कोट्यवधींच्या ठेवी आहेत, त्या कर्जमाफीसाठी सरकारला द्या तसेच सातबारा कोरा झाल्याशिवाय मंत्रिमंडळाची बैठक होऊ देऊ नका असे शाब्दिक हल्ले करीत सेनेला पुरते घायाळ केले. राजकारण म्हणून दौरे, राजकीय सभा घेतल्या गेल्या. त्या चांगल्या म्हणून नेते आनंदले आणि दौरा जोमात झाला, म्हणून आयोजक स्थानिक नेते खूश झाले. पण शेतकऱ्याच्या हाती काय पडले? हा कळीचा मुद्दा आहे. खान्देशचा विचार केला तर जळगाव जिल्हा बँक सर्वपक्षीय पॅनलच्या तर धुळे-नंदुरबार जिल्हा बँक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा बँकांच्या मदतीने शेतकऱ्यांना काहीही दिलासा दिलेला नाही. आमची आर्थिक स्थिती खराब आहे, आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकत नाही, असे या जिल्हा बँकांनी घोषित करून काखा वर केल्या आहेत. गंमत म्हणजे जळगाव बॅँकेचे उपाध्यक्ष हे शिवसेनेचे आमदार आहेत. स्वत:च्या बँकेसमोर पक्षादेश म्हणून त्यांनी ढोल वाजविला. उपाध्यक्षाच्या खुर्चीत बसून बँकेची बाजू आणि बँकेबाहेर ढोल वाजवून बँकेच्या नावाने शंखनाद करणे, याविषयी ना उध्दव ठाकरे बोलले ना अजित पवार. कर्जमाफीचे श्रेय भाजपाला जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी-शिवसेनेची ही ‘नुरा कुस्ती’ सुरू आहे, असेच म्हणावे लागेल.
नुरा कुस्ती
By admin | Published: July 14, 2017 11:59 PM