यावेळचा प्रजासत्ताकदिन खरोखरच ऐतिहासिक असणार आहे. केंद्रातले सरकार बदलले आहे. मोदींच्या सरकारचा हा पहिला प्रजासत्ताकदिन आहे. पण यावेळी प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येणे ही मुळातच मोठी घटना. त्यात प्रजासत्ताकदिनाच्या परेडला ते उपस्थित असणे ही गोष्ट साधीसुधी नाही. या घटनेचे पडसाद जगभर उमटणे अपरिहार्य आहे. तसे ते उमटलेले आहेतच. काही जणांनी या घटनेचा वरवर विचार केलेला दिसतो आहे. इंग्लंडमधल्या डेलीमेलने ओबामांसाठी अमेरिकेने कोणत्या व्यवस्था केलेल्या आहेत, याच्या तपशिलाची चर्चा केली आहे. दिल्लीला जणू एखाद्या कडेकोट बंदिस्त किल्ल्यासारखे स्वरूप आलेले आहे, असे सांगून मेल पुढे ओबामा भेटीचा मोठा रंजक तपशील देतो आहे. चाळीस विमाने, सहा चिलखती गाड्या, तीन दिवसांच्या ओबामांच्या भारतभेटीसाठी अमेरिकेतून आणण्यात आल्या आहेत. ओबामा पत्नी व मुलींसह भारतात येत आहेत. ओबामांच्या कारची मोठी रंजक माहिती मेलने दिली आहे. त्यात या गाडीत संदेशवहनासाठी कोणत्या सोयी आहेत, रासायनिक किंवा बॉम्बहल्ल्याला तोंड देण्यासाठी या गाडीत कोणत्या सोयी आहेत याची माहिती त्यांनी दिलेली आहे.वॉशिंग्टन पोस्टने ओबामांच्या उपसुरक्षा सल्लागार असणाऱ्या बेन होडस यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, ही भेट भारतीय जनतेसाठी खूपच महत्त्वाची ठरणारी आहे. भारताने त्यांना दिलेले आमंत्रण अमेरिका आणि संपूर्ण जगासाठीसुद्धा महत्त्वाचे ठरणारे आहे, असे नमूद करून पोस्टने पुढे ओबामांच्या भारत भेटीचा संक्षिप्त कार्यक्र म दिलेला आहे. ओबामांच्या सोबत अमेरिकेच्या इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबरच तिथले उद्योग आणि व्यापार क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्ती तसेच तिथल्या प्रतिनिधी सभेतल्या अल्पसंख्य पक्षाच्या (विरोधी पक्षाच्या) नेत्या नॅन्सी पॅलोसी येत आहेत. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये व्यापार, उद्योगातली गुंतवणूक, हवामान बदल, अफगाणिस्तान, दहशतवाद अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याचा आडाखाही पोस्टने दिला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते भारत व अमेरिका यांच्यातले संरक्षणविषयक सहकार्य, भारताला अमेरिकेकडून होणारा शस्त्रपुरवठा, या दोन देशांमधील नागरी अणू सहकार्याच्या कराराची अंमलबजावणी, ऊर्जाविषयक सहकार्य, भारताच्या बाजारपेठेत अमेरिकेतून होणारी मोठ्या प्रमाणावरची गुंतवणूक, बौद्धिक संपदाविषयक कायदे, हवामान बदलांविषयी दोन्ही देशांमधले सहकार्य, जागतिक स्तरावर दहशतवादाच्या विरोधात होत असलेली कारवाई, अफगाणिस्तान असे अनेक विषय दोन्ही देशांच्या चर्चेत येऊ शकतात.वॉलस्ट्रीट जर्नलने ओबामांच्या भेटीच्या संदर्भात त्यांनी अमेरिकेच्या संसदेत केलेल्या स्टेट आॅफ युनियन अॅॅड्रेसचा आढावा घेतला आहे. त्या भाषणात ओबामांनी त्यांच्या सरकारच्या यापुढच्या काळातल्या धोरणांचा आराखडा मांडला आहे. त्यात भारताबरोबरच्या संबंधांचा फारसा तपशीलवार उल्लेख केलेला नाही. भाषणात भारताचा फारसा उलेख न करण्याचा ओबामांचा निर्णय शहाणपणाचा आहे, असे जर्नलने म्हटले आहे. एका बाजूने आपल्या देशातल्या रोजगाराच्या संधी बाहेरच्या देशांच्या हाती जाऊ नयेत असा त्यांचा प्रयत्न आहे. ‘ब्रिंग जॉब्ज होम’ यासारखे नारे ते देत आहेत, तर दुसऱ्या बाजूने त्यांना भारतासारख्या देशाशी असणाऱ्या संबंधांमध्ये सुधारणा व्हायला हवी आहे. भारतासारख्या देशातून कमी खर्चात मिळणारे कुशल तंत्रज्ञ अमेरिकन व्यावसायिक संस्थांच्या हिताचेच आहेत, तसेच ‘ब्रिंग जॉब्ज होम’ सारख्या घोषणांचे भारतामध्ये होणारे परिणामही अमेरिकेच्या हिताच्या विरोधात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच ते भारताबरोबरच्या संबंधांचा फारसा तपशीलवार ऊहापोह न करता दहशतवादाविरोधी असणाऱ्या लढाईचा उल्लेख करतात, असे जर्नल म्हणते आहे.ओबामांच्या भारत भेटीकडे जगातल्या इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानही खूप उत्सुकतेने पाहते आहे. ओबामा भेटीच्या काळात कोणतीही दहशतवादी कारवाई होणार नाही याची पाकिस्तानने खबरदारी घ्यावी, अशी तंबी अमेरिकेने पाकिस्तानला दिल्याची बातमी मध्यंतरी आली होती. म्हणजे ओबामा भेट वगळता इतरवेळी पाकिस्तानने काहीही केले तरी काहीही बिघडत नाही. यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया डॉनने दिली आहे. पाकिस्तानचे अमेरिकेतले राजदूत जलील अब्बास यांची प्रतिक्रिया डॉनने दिली आहे. अशी कोणतीही तंबी अमेरिकेने दिलेली नाही, हा भारताचा कांगावा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. रॉयटरच्या विश्लेषणानुसार चीनच्या विस्तारवादी धोरणाला वेसण घालणे हा भारताच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणाचा उद्देश आहे. श्रीलंकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राजपाक्षे यांच्या झालेल्या पराभवाच्या मागे भारत असल्याची चर्चा होते आहे. राजपाक्षे यांचे चीनला प्राधान्य देण्याचे धोरण भारताला पसंत नव्हते. त्यामुळे तिथे भारताच्या दृष्टीने सोयीचे ठरू शकणारे सिरीसेना आले आहेत. पूर्वेकडच्या देशांना प्राधान्य देण्याच्या मोदींच्या धोरणाचा परिणाम म्हणजे अमेरिकेच्या चीनबद्दलच्या धोरणात आता भारताला महत्त्वाची भूमिका राहणार आहे. त्या दृष्टीने ओबामांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे, असे रॉयटरने म्हटले आहे. एकूणच ओबामांच्या भारतभेटीने जगात खूपच कुतूहल निर्माण केलेले आहे हे नक्की. जागतिक पातळीवरच्या मीडियात त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते आहे. - प्रा़ दिलीप फडके
ओबामांची भारत भेट...
By admin | Published: January 24, 2015 12:30 AM