- गजानन जानभोरनव्या पिढीला रामभाऊ तुपे ठाऊक नाहीत. ज्या विधिमंडळात त्यांनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले त्या पुणेकरांच्याही स्मरणात आता ते नाहीत. म्हणूनच त्यांच्या निधनाच्या तीन वर्षानंतर महाराष्ट्र विधिमंडळाला त्यांची आठवण झाली आणि नंतर श्रद्धांजलीचा संसदीय सोपस्कार पार पडला. प्रशासकीय निर्लज्जपणाचा हा कळस अक्षम्य आहे.आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून घेतलेल्या सेवाभावी माणसांचे विस्मरण ही समाजाने त्या माणसाबद्दल दाखवलेली कृतघ्नता असते. ‘मी गेल्यानंतर माझी आठवण ठेवा, जयंती-पुण्यतिथी करा, पुतळे उभारा’ असे ही माणसे कधीच सांगत नाहीत. ती मुळातच सत्शील आणि विरक्त वृत्तीची असल्याने तशी सोयदेखील करून ठेवीत नाहीत. त्यांच्या पश्चात समाजालाच त्यांची कृतज्ञ आठवण ठेवावी लागते. ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि पुण्याचे दिवंगत आमदार रामभाऊ तुपे धनवंत नव्हते. त्यांनी उद्योगपती, बिल्डरांच्या भ्रष्टहिताचे राजकारण कधी केले नाही. समाजवादाविषयीची निष्ठा आणि साने गुरुजींनी शिकवलेली कर्तव्यबुद्धी या ज्येष्ठ कार्यकर्त्याने आयुष्यभर जपली. लोकाग्रहास्तव ते पुण्यातून विधानसभा निवडणुकीत एकदा उभे राहिले व निवडून आले. नव्या पिढीला रामभाऊ तुपे ठाऊक नाहीत. ज्या विधिमंडळात त्यांनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले त्या पुणेकरांच्याही स्मरणात आता ते नाहीत. म्हणूनच त्यांच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर महाराष्ट्र विधिमंडळाला त्यांची आठवण झाली आणि नंतर श्रद्धांजलीचा संसदीय सोपस्कार पार पडला. सरकारला रामभाऊंच्या निधनाची माहिती कळायला तब्बल तीन वर्षे लागतात, हा प्रशासकीय निर्लज्जपणाचा कळस आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली खरी. पण, त्यात या अक्षम्य अपराधाबद्दलच्या प्रायश्चिताची भावना दिसली नाही. रामभाऊ स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि गोवामुक्ती आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते होते. आमदार म्हणून त्यांनी पैसे खाल्ले असते, गडगंज संपत्ती, शिक्षण संस्था उभारल्या असत्या, जमिनी हडपल्या असत्या तर ते नक्कीच विधिमंडळाला लक्षात राहिले असते. पण, जिथे अशा निर्मोही माणसाचे जगणेच समाज दुर्लक्षित करतो तिथे राज्यकर्त्यांना त्यांच्या मृत्यूचे विस्मरण होणे स्वाभाविक आहे. या ज्येष्ठ आमदाराने सभागृहात राजदंड पळवला नाही, ते चप्पल घेऊन सभागृहात कुणाच्या अंगावर धावून गेले नाहीत आणि अध्यक्षांच्या आसनाकडे कधी पेपरवेटही भिरकावला नाही. त्यामुळे असेल कदाचित विधिमंडळाच्या कामकाजाच्या इतिहासात त्यांच्या कार्याची नोंद झाली नाही.रामभाऊ हे ए. बी. बर्धन, सुदामकाका देशमुख, भाई मंगळे या निष्काम लोकसेवकांच्या परंपरेतील. सुदामकाका निवडणूक हरले तेव्हा अचलपुरातील गरिबांच्या घरात त्या दिवशी चूल पेटली नव्हती. हातात ठिगळं लावलेली पिशवी घेऊन उभे असलेले आमदार भाई मंगळे तिवस्याच्या बसस्टँडवर नेहमी दिसायचे. ग. प्र. प्रधान या भल्या माणसाने तर आपले राहते घर साधना साप्ताहिकाला देऊन टाकले. पत्नीच्या निधनानंतर प्रधान सर सदाशिव पेठेतील घरात एकटेच राहायचे. मात्र गतकाळातील आठवणी दाटून येऊ लागल्याने त्यांनी घर सोडले व ते आपल्या जीवलग मित्राच्या घरी राहायला आले. तो मित्र म्हणजे, रामभाऊ तुपे. प्रधान सर असोत किंवा रामभाऊ ही माणसे नि:स्पृहतेने जगली आणि निर्मोही मनाने त्यांनी देह ठेवला. प्रधान सरांनी ‘मृत्यूनंतर माझे कोणतेही स्मारक उभारू नका. माझ्याबद्दल प्रेम वाटणाºयांनी एक झाड लावावे आणि ते जगवावे’ एवढेच लिहून ठेवले. ही भली माणसे जिवंतपणी स्वत:हून स्वत:च्या विरक्तीची अशी परीक्षा घेत असतात म्हणून या जगाचा निरोप घेताना ती कृतार्थ असतात. आपण मरतो तेव्हा आपल्या घरचे लोकं तेरवी करतात आणि वर्षश्राद्धानंतर विसरूनही जातात. प्रधान सर, सुदामकाका, रामभाऊंसारखे निष्कांचन कार्यकर्ते त्या अर्थाने अमर ठरतात. विधिमंडळातील श्रंद्धाजलीच्या सोेपस्कारातून त्यांचे मोेठेपण कधीच ठरत नसते.आता इथे शेवटी प्रश्न उरतो, समाजाच्या कृतघ्न विस्मरणाचा. अलीकडे अशा घटनाही अस्वस्थ करीत नाहीत इतके कोडगेपण आपल्यात आले आहे. परवा ते विधिमंडळातही दिसले. रामभाऊ तुपेंसारख्या देवमाणसाला स्मरणात ठेवले की आपल्यातील दानवीपण ठसठशीतपणे जाणवते व मग उगाच अपराधीपण छळायला लागते. त्यामुळे अशा माणसांना आपण सोईस्कर मन:पटलावरून पुसून टाकतो. रामभाऊंच्या विस्मरणातही कदाचित तोच अर्थ दडलेला असावा...
हे विस्मरण क्षम्य नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 2:44 AM