दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात सुमारे दोन आठवड्यांपासून भडकलेल्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न काश्मीरातील हुरियतच्या नेत्यांनी केला असून या संघटनेने जेएनयु प्रकरणी येत्या शनिवारी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात बंद पाळण्याचे तर शुक्रवारच्या नमाज पठणानंतर निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. हुरियतचे नेते सैय्यद अलि शाह गिलानी यांनी जेएनयु प्रकरण तापण्याच्या आधीच या विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर कारवाई न करण्याचे आव्हान भारत सरकारला दिले होते, हे विशेष. हुरियतचे सरचिटणीस शब्बीर शाह यांनी शुक्रवार आणि शनिवारचे आवाहन करताना केन्द्र सरकारवर ब्राह्मणवादाचे, दमनशाहीचे, दहशतवादाचे जे आरोप केले आहेत ते करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनाच त्यांना देते, जरी ते भारत सरकार आणि भारताच्या राज्यघटनेला कवडीचीही किंमत देत नसले तरी! संसदेवरील अतिरेकी हल्ला प्रकरणी ज्यांच्यावर आरोप होता पण ज्यांची निर्दोष मुक्तता केली गेली होती त्या प्रा.एसएआर गिलानी यांच्यावर आता ठेवण्यात आलेल्या आरोपाबद्दल हुरियतने गळे काढणेही योग्यच म्हणायचे. पण ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला आहे त्या कन्हैयाकुमारविषयी सहानुभूती व्यक्त करताना शब्बीर शाह यांनी त्याला अडचणीत आणण्याचेच काम केले आहे. आपण ज्या घोषणा दिल्या त्यात काश्मीरचा कोणताही उल्लेख नव्हता असा दावा कन्हैयाकुमारने केला आहे व ते सिद्ध करणारे काही पुरावेही उपलब्ध झाले आहेत. असे असताना ‘जेएनयुमधील बुद्धिमान विद्यार्थ्यांना सत्य आणि वास्तवाचे भान आहे व म्हणून त्यांनी काश्मीर प्रश्नाशी एकनिष्ठता व्यक्त केली आहे’ असे जे विधान शब्बीर शाह यांनी केले आहे त्याचा नेमका अर्थ काय होतो?
आगीमध्ये तेल
By admin | Published: February 24, 2016 3:54 AM