लढाऊ विमानांच्या उत्पादनात जगभर नाव असलेल्या बोईंग व लॉकहीड मार्टिन या कंपन्यांनी आॅगस्ट अखेरीस भारतात आपले कारखाने उभारण्याची तयारी दर्शविली. बोईंगने एफ/ए १८ सुपर हॉर्नेट विमानांचा, तर लॉकहीड मार्टिनने एफ-१६ विमानांचा कारखाना उभारण्यात रस असल्याचे जाहीर केले. त्यानंतर गुरुवारी ट्रम्प प्रशासनानेही या दोन्ही विमानांची भारताला विक्री करण्याचे जोरदार समर्थन केले. भारताला मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानांची गरज आहे; मात्र जी कंपनी भारतात उत्पादन करेल, त्याच कंपनीची विमाने घेण्याची भारत सरकारची भूमिका आहे. जागतिक महासत्ता होण्याची मनिषा बाळगणाºया, चंद्र आणि मंगळावर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी मोहिमा साकारणाºया भारताला अजूनही लढाऊ विमान निर्मितीच्या क्षेत्रात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. या पाशर््वभूमीवर, लढाऊ विमान निर्मितीचे तंत्रज्ञान आत्मसात करता यावे, खासगी भारतीय कंपन्यांना लढाऊ विमान निर्मितीचा अनुभव मिळावा आणि लढाऊ विमाने तुलनात्मकरित्या स्वस्तात मिळावी, या तिहेरी उद्देशाने सरकारने भारतात उत्पादन करण्याची अट घातली आहे. त्यानुसारच बोईंग व लॉकहीड मार्टिनने ही तयारी दर्शविली हे स्पष्ट आहे. प्रारंभीच म्हटल्यानुसार, दोन्ही कंपन्या लढाऊ विमान निर्मिती क्षेत्रातील दादा कंपन्या आहेत आणि एफ/ए १८ व एफ-१६ ही अत्यंत यशस्वी विमाने आहेत. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे प्रस्ताव प्रथमदर्शनी आकर्षक वाटतात; मात्र त्यामध्ये ग्यानबाची मेख ही आहे, की ही दोन्ही विमाने कालबाह्य होऊ लागली आहेत. त्यामुळे ती मोडित काढण्याची प्रक्रिया जगभर सुरू झाली आहे. दोन्ही विमानांच्या कोणत्याही नव्या ‘आॅर्डर' उत्पादकांकडे नाहीत. त्यामुळे एवीतेवी त्यांना अमेरिकेतील त्यांचे कारखाने मोडीत काढावेच लागणार आहेत. तेच कारखाने भारतात स्थलांतरित करण्याचा आणि शेवटची कमाई करून घेण्याचा त्यांचा मानस आहे. भारतीय वायूदल व नौदलाची मागणी पुरविण्यासोबतच आम्ही भारतातून इतर देशांना विमाने निर्यातही करू, असे आमिष उभय उत्पादकांनी दाखविले आहे; पण मागणीच नसेल, तर निर्यात करणार तरी कुणाला? जगभरातील वायूदल आणि नौदलांना आता रडारवर सुगावा न लागणाºया पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांचे वेध लागले आहेत. स्वत: भारतही त्यासाठी रशियाच्या सोबतीने व संपूर्ण स्वदेशी असे दोन प्रकल्प राबवित आहे. परिणामी भारतातून एफ/ए १८ व एफ-१६ विमानांची निर्यात हे गाजरच ठरू शकते. त्यामुळे भारतीय वायूदल व नौदलाची ‘आॅर्डर' पूर्ण झाल्यावर भारतातील कारखानेही मोडीतच निघतील. त्या स्थितीत विमानांच्या उर्वरित आयुष्यात सुट्या भागांची पूर्तता कुठून होणार? सुटे भाग मिळाले नाहीत, तर विमाने कार्यरत तरी कशी ठेवणार? थोडक्यात काय तर एफ/ए १८ व एफ-१६ या दोन्ही विमानांचे अध्याय संपुष्टात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नादी न लागणेच श्रेयस्कर होईल!
ग्यानबाची मेख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:21 AM