- सुधीर महाजन
सकाळी आॅफीसमध्ये पोहोचताना फुटपाथवर एक म्हातारी बसलेली. जवळचं बोचकं सांभाळत आशेने येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पहात होती; पण काही मागण्यांसाठी हात पुढं होत नव्हता. आयुष्यभराचा जगण्याचा संघर्ष, वेदना, दु:ख चेहऱ्यांवर सुरकत्या घेऊन उतरल होतं; पण जगण्याचा संघर्ष संपलेला नव्हता. ऐंशीपेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत हेच सुचवण्याऱ्या सुरकत्या. तरी दोन वेळची भ्रांत. आयुष्य कष्टात गेलेलं पण लाचारी नाही म्हणून पैसे मागण्यासाठी हात पुढे धजावत नव्हता. म्हतारीने संघर्षाने स्वाभिमान जपलेला. दोन मुलं, सुना, दोन लेकी, नातवंड, पतवंड तरी ही ऐंशी पार केलेली म्हातारी रस्त्यावर असहाय्य, हतबल. निराधार सगळे असून काहीच नसलेली.
न बोलता हातावर पैसे ठेवताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तसाच आलाबला करत म्हणाली भिक मागायची हिंमत नाही लाज वाटते. आयुष्यभरात जे केलं नाही ते करायची पाळी या नशिबाने आणली. कोणते भोग आहेत, कधी संपणार? सुनांना मी नको आहे, जावायाच्या घरी कशी राहु म्हणून शहरात आले. भरतं पोट कसं तरी... रात्री शरीर कुठेही टाकायचं. तो कधी उचलतो त्याची वाट पहात आहे.असं असतांनाही पोरांविषयी मनात विषाद नाही. त्यांच्या बायकांना मी नको राहिले तर पोरांना त्रास म्हणून आपलं आपण धकवू. आता जगायचं तरी काय, वर बोलवायची वाट पहायची असं म्हणत खुदकन हसली. पाच मिनिट तिच्याशी गप्पा मारल्या त्याचा तिला आनंद. पोरा नजरला पडली तर बोलत जा. तेवढच बरं वाटतं. माणसं ओळखता येत नाही.
फूटपाथवर भेटणारी ही एकमेव म्हतारी नाही. शहरात नाक्यानाक्यांवर, फूटपाथवर, मंदिरांजवळ, सिग्नलजवळ आता असे वृद्ध आढळतात. उन्हात काळेसावळे उन्हात रापलेले आख्खे आयुष्य चेहऱ्यांवर सुरकत्या घेऊन फिरणारे. आपल्या घरातून नाकारलेले. शहरात उपरे झालेले, बावचाळलेले असे चेहरे सगळीकडे दिसतात. यांची स्वप्न काय असतील? आयुष्य मातीत कष्ट करून गेलं. पोर सांभाळतील नातवंड सभोवती असतील... सुना गरम भाकरी, उन उन दूध ताटात टाकतील... गावात पारावर, मंदिरात तंबाकुचा बार भरत समवयस्क सोबत्यांशी गप्पा घाटत आयुष्याची इतिश्री होईल... यांना ना लोकशाही महित ना संत्तासंघर्ष. आयुष्यभर जगण्याचा संघर्ष लोकल्याणाचा गंध नसलेली. आपल्या खेड्याशी, मातीत रुजलेली ही माणसं अचानक एखादे झाड उपटून फेकलेली. त्यांना ना शहराची ओळख ना व्यवहारीपणा कळणारा. त्यामुळे हे दिशाहिन वार्धक्य आपल्याला रत्यांवर ठायीठायी दिसते. रोजच्या रगाड्यात आपले त्यांच्याकडे लक्ष जात नाही; पण हे एक भयानक वास्तव सामाजिक प्रश्न बनून समोर आले आहे.
कुटुंबसंस्थेच्या वृथा अभिमानात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जे रस्त्यावर नाहीत त्यापैकी बहुसंख्य गणागोतात असले तरी आपल्याच घरात ते उपरे झाले आहेत. भले ही ते घर त्यांनी उभं केलं असेल. आपल्याच घरात ते उपेक्षित आहेत, एखाद्या अडगळीप्रमाणे. कुटुंबसंस्थेचे चिरफाळे उडाले पण आपण मान्य करत नाही. म्हणजे सामाजिक दायित्व संपले. सरकारी दायित्व असले तरी ते कागदोपत्री संख्या जुळवत पुरे झालेले दिसते. या वृद्धत्वाची जबाबदारी कोणीही घेतांना दिसत नाही म्हणून ते रस्तोरस्ती दिसते.