लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अपेक्षाभंग केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनात बदल होईल का आणि होणार असेल तो काय असेल, हा प्रश्न ४ जूनच्या निकालापासून देशभर चर्चेत आहे. या प्रश्नाचे थेट उत्तर नव्हे, परंतु संकेत आता मिळू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे वैचारिक अधिष्ठान असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांच्या अलीकडच्या विधानांमधून पक्षाची नवी दिशा लक्षात येऊ शकते. हिंदुराष्ट्र हा शब्द पुन्हा उच्चरवाने ऐकू येऊ लागला आहे.
जातीच्या आधारे हिंदूंचे विभाजन टाळायला हवे आणि त्यासाठी अधिक कडव्या हिंदुत्वाच्याच वाटेने जायला हवे, असा हा दृष्टिकान दिसतो. ‘बटेंगे तो कटेंगे’, असे योगी म्हणताहेत. ‘बटेंगे तो बांटनेवाले महफिल सजाएंगे’, असे पंतप्रधानांना वाटते. तर हिंदूंनी विभाजित होऊ नये, असा सरसंघचालकांचा आग्रह आहे. युद्धात एक तत्त्व पाळण्याचा प्रयत्न नेहमी होतो- प्रतिपक्षाला नेहमी आपल्या रणांगणावर लढायला बाध्य करावे. जेणेकरून आपली शक्तिस्थळे प्रभावी पद्धतीने वापरता येतात, कमकुवत बाजूंची दुरुस्ती करता येते. हिंदुत्व हे भाजपचे स्वत:चे रणांगण आहे. मतांची लढाई याच ‘बॅटलफिल्ड’वर लढली जावी, असा प्रयत्न आहे. ‘सबका साथ, सबका विश्वास’ वगैरे कविता ऐकू येत नाहीत. या स्थितीत विरोधकांसाठी लढाई अवघड बनते. २०१४ ते २०१९ या कालावधीत साैम्य हिंदुत्वाचा मार्ग धरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटींपासून ते २०१८ मधील कैलास मानसरोवराच्या यात्रेपर्यंत प्रयोग केले. तथापि, त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत आधीच्या अपयशाचीच पुनरावृत्ती झाली.
मतदारांनी प्रतिसाद दिला नाही. हिंदुत्वासाठीच मत द्यायचे असेल तर साैम्य हिंदुत्वाऐवजी ते थेट कडव्या हिंदुत्वालाच मत देतील, असा निष्कर्ष त्यातून निघाला. तेव्हा त्यांनी तो मार्ग सोडून दिला. साॅफ्ट हिंदुत्वाचा पर्याय सोडून काँग्रेसने राहुल गांधी यांच्या दोन्ही भारत जोडो यात्रांमधून अधिक सहिष्णू, परस्पर प्रेमभावाचा मार्ग स्वीकारला. निवडणुकीत राज्यघटनेचा मुद्दा हाती लागला. बिहारमधील प्रयोगानंतर जातगणनेची मागणी देशभर नेण्यात आली. या जातगणनेच्या मुद्द्याने भाजपचे अधिक नुकसान केले. जातीची चर्चा वाढली की धर्माची चर्चा कमी होते. धार्मिक ध्रुवीकरण अवघड बनते. हे ओळखूनच सरसंघचालकांनी जाती, भाषा व प्रादेशिकतेच्या आधारे विभाजन टाळून हिंदू म्हणून एकत्र येण्याचे आवाहन समाजाला केले आहे. डाॅ. मोहन भागवत नेहमी हिंदुत्वाचा व्यापक अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतात.
मागे ते ‘सगळेच भारतीय हिंदू आहेत, सर्वांचा डीएनए एक आहे’ असे म्हणाले होते. आताही त्यांनी हिंदू हा शब्द नंतर प्रचलित झाला असला तरी मुळात आपण सगळे हजारो वर्षे, प्राचीन काळापासून एकत्र राहात आलो आहोत, असे सांगून हिंदू समाजाच्या उभारणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत जातगणना व त्यामुळे जातीच्या आधारे मतदानाचा सर्वाधिक फटका भाजपला उत्तर प्रदेशात बसला. पीडीए म्हणजे पिछडा, दलित व अल्पसंख्याक यांची एकत्रित मोट विरोधकांना मोठे यश देऊन गेली. आता त्याच उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयागराज येथील पुढच्या वर्षीच्या कुंभमेळ्याचे निमित्त साधून हिंदुत्वाचा धागा बळकट करू पाहात आहेत. प्रयागराज, नाशिक, हरिद्वार व उज्जैन येथे दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा हा हिंदूंचा मोठा उत्सव असतो.
प्रयागराजच्या कुंभमेळ्यात गैरहिंदूंना प्रवेश देऊ नये, कुंभग्राम उभारणीतील कामगार ते स्वयंपाकघरापर्यंत केवळ हिंदूच असावेत, बंदोबस्त व अन्य व्यवस्थांमध्ये अधिकारी-कर्मचारीदेखील हिंदूच राहावेत, जेणेकरून कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकून राहील, असे निर्णय अखिल भारतीय आखाडा परिषदेसोबतच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी घेतले आहेत. त्यासोबतच शाहीस्नान व पेशवाई हे शब्द गुलामीचे प्रतीक असल्याचे सांगत ते बदलण्याची तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप कडव्या हिंदुत्वाच्या अधिक जवळ जात असला तरी खरी अडचण मित्रपक्षांची आहे.
या प्रादेशिक मित्रपक्षांना आपापल्या राज्यांत विशिष्ट जातसमूह सांभाळायचे आहेत आणि त्यामुळेच जातगणनेच्या मागणीला ते विरोध करू शकत नाहीत. त्या दबावामुळे भाजपचेही राज्याराज्यांमधील बहुतेक सगळे नेतेदेखील जातगणनेचे समर्थन करतात. खरा राजकीय पेच यात आहे. भाजप तो कसा सोडवणार, हे पाहावे लागेल.