हल्ली सर्वच क्षेत्रांत नवनव्या संकल्पनांचा आविष्कार व्हावा, त्यांची जोमाने अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकार, कंपन्या, संस्था यांचा कारभार तरुणांकडे सोपवावा, अशी मागणी होत असते. वृद्ध लोक जुनाट विचारसरणीचे, काहीसे आग्रही किवा हेकट असल्यामुळे त्यांना सरकार, कंपन्यांतून सक्तीने बाजूला करावे, अशीही मागणी होत असते. पण, नवनव्या कल्पनांचा व कार्यक्षमतेचा तारुण्याशी संबंध असतो, हा अभावानेच सिद्ध होणारा नियम आहे, हे गेल्या काही काळात राजकारणातील तरुण मंडळी जो काही गोंधळ घालीत आहेत, त्यावरून सिद्ध होत आहे. ताजा गोंधळ घातला आहे, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचे तरणेबांड अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी. त्यांनी अलीकडेच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना काश्मीरचा इंच न इंच भारताकडून मिळवून दाखवेन, अशी भीष्मप्रतिज्ञा केली आहे. बिलावल यांनी अचानकपणे आणि तेही काश्मीरबाबत असे काही विधान करावे हे धक्कादायक होतेच; पण ते त्यांच्यासारख्या २0-२२ वर्षांच्या तरुण राजकारण्याने करावे, हे अधिक धक्कादायक होते. पाकिस्तानातील राजकारण्यांचे आणि लष्कराचे अस्तित्व काश्मीर प्रश्नावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणी असे बोलले असते, तर त्याची कदाचित कुणी दखलही घेतली नसती; पण बिलावल भुट्टो असे बोलल्यामुळे काश्मीर प्रश्नाची नाही, पण त्यांच्या तरुण व तथाकथित जोम असलेल्या राजकारणाची दखल घेणे भाग आहे. काश्मीर भारताकडून हिसकावून घेण्याची भाषा करून बिलावल यांनी एक दाखवून दिले, की त्यांचे शारीरिक वय विशीतले असले, तरी मानसिक वय ६७ वर्षांचे आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्याचा नवा मार्ग शोधला पाहिजे असे ते म्हणाले असते, तर एक वेळ ते असे समजून घेता आले असते. पण, त्यांनी चक्क ते हिसकावून घेण्याची भाषा केली. आता काश्मीर हिसकावून घ्यायचे, तर लष्करी बळाचा वापर अपरिहार्य आहे. याचा अर्थ बिलावल हे इतिहासापासूनही काहीच शिकणारे नाहीत, असा होतो. एवढेच नाही, तर पाकिस्तानातील तरुण पिढी किती वैचारिक वेठबिगारीत अडकली आहे, हेही त्यावरून स्पष्ट होते. पाकिस्तानची भारतविरोधातली एकही लष्करी मोहीम यशस्वी झालेली तर नाहीच, पण त्यातून पाकिस्तानने काही मिळविण्याऐवजी बरेच काही गमावलेच आहे. अशा अवस्थेत बिलावल लष्करी मोहीम आखून आणखी काय गमवायची तयारी करीत आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. खरे तर बिलावल यांच्यापुढे पाकिस्तानचा गेल्या ६७ वर्षांचा इतिहास आहे. त्यांचे आजोबा व आईची हत्या कशी व कोणत्या परिस्थितीत झाली व ती कुणी केली, याची त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे या परिस्थितीतून पाकिस्तानला कसे वाचवायचे, याचा विचार करण्याऐवजी ते काश्मीर हिसकावून घेण्याची भाषा करीत आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडे राज्यकारभाराच्या नव्या कल्पनांची आणि दूरदृष्टीची वानवा आहे. पाकमध्ये गेल्या काही वर्षांपासून लोकशाही सरकारे असली, तरी त्यांची तारेवरील कसरत चालू आहे. लष्कराचे राजकारणातील महत्त्व अजून शाबूत आहे. शिवाय, देशातील जनतेचे आर्थिक प्रश्न आ वासून उभे आहेत. या सर्व प्रश्नांचा ऊहापोह करून ते सोडविण्याची भाषा करण्याऐवजी थेट काश्मीर प्रश्नाला हात घालून बिलावल यांनी आपण राजकारणात रुळलेल्या वाटेनेच वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. थोडक्यात पाकिस्तानकडून भविष्यकाळात काही नवी धोरणे आखली जाण्याच्या आशेवर बिलावल यांनी पाणी टाकले आहे. सत्तेवर येण्याचा सोपा मार्ग म्हणजे भारतविरोधी भावना भडकवणे आणि आम जनतेच्या धार्मिक भावनांना आवाहन करणे हा आहे. पाकिस्तानी राजकारण्यांचा सत्ता हस्तगत करण्याचा जो धोपट मार्ग आहे, तोच बिलावलसारखे तरुण अवलंबणार असतील, तर पाकिस्तानचे १९४७मध्ये सटवाईने जे विधिलिखित लिहिले आहे, ते खरे ठरणार, यात काही शंका नाही. पाकिस्तानात सध्या जी गोंधळाची परिस्थिती आहे, त्यातून बिलावलसारख्या तरुण राजकारण्याने काही नवा मार्ग दाखवावा, अशी तेथील जनतेची अपेक्षा असताना बिलावल यांनी त्यावर काही तोडगा सुचविण्याऐवजी तो विषय टाळून काश्मीरचे गुऱ्हाळ लावल्याने पाकिस्तानी जनतेवर मात्र कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली आहे. अशा तरुणांमुळे पाकिस्तानचे भविष्य आणखीनच खडतर होणार आहे, यात काही शंका नाही.
म्हातारा तरुण
By admin | Published: September 23, 2014 1:01 AM