दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४०मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा रद्द केल्या गेल्या, त्यावेळी जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन केले होते. जगभर युद्धज्वर तीव्र झाल्याने ही स्पर्धा रद्द केली गेली. तत्पूर्वी, पहिल्या महायुद्धामुळे १९१६मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा रद्द केल्या होत्या. त्यावेळी स्पर्धांचे यजमानपद जर्मनीकडे होते. बर्लिन येथे ३० हजार आसनांचे स्टेडियम उभारले गेले; परंतु १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले आणि ऑलिम्पिक स्पर्धांवर बोळा फिरला.
२०२० मध्ये कोविड-१९ने डोके वर काढल्यामुळे ऑलिम्पिकमधील उन्हाळी क्रीडा स्पर्धा अगोदर पुढे ढकलल्या गेल्या व आता तर ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी जपानमध्ये जोर धरत आहे. योगायोगाचा भाग पाहा : एकीकडे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी जपानमधील विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत, तेथील काही वृत्तपत्रांनी केलेल्या सर्वेक्षणात ६० टक्के नागरिकांनी स्पर्धा रद्द करण्याचाच कौल दिलेला आहे आणि हे चालू असतानाच कोरोना विषाणूचा जैविक अस्त्र म्हणून वापर करण्याच्या हालचाली चीनमध्ये २०१५ साली चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी सुरू केल्या होत्या, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून उघड झाले आहे. याचा अर्थ जगभरातील क्रीडापटू जेव्हा ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवण्याकरिता कसून सराव करीत होते तेव्हा तिकडे चीनमध्ये लष्करी वैज्ञानिक कोरोना विषाणूचा फैलाव करून अमेरिका, ब्रिटनपासून भारतापर्यंत सर्व देशांची नाकेबंदी करण्याचा कुटिल डाव आखत होते. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाली, तर तो चीनने सुुरू केलेल्या जैविक महायुद्धाचा परिपाक असल्याची नोंद इतिहासात होणार आहे. अर्थात, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळला आहे. मात्र, जगभरातील वेगवेगळ्या देशांची कोरोनामुळे झालेली हानी आणि त्या तुलनेत ज्या चीनमध्ये कोरोनाने सर्वप्रथम डोके वर काढले त्या देशाची झालेली हानी याची तुलना केली, तर चीनमधील स्थिती बरीच आलबेल आहे. एकेका माणसाच्या जिवाचे मोल असलेल्या अमेरिका, युरोपातील देशांमधील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या व चीनमधील मृत्यू यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. मध्यंतरी आयपीएल स्पर्धा सुरू असल्याने लॉकडाऊनमध्ये घराघरांत कोंडलेल्यांच्या चार घटका मनोरंजनाची सोय झाली होती. मात्र, क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएलला गाशा गुंडाळावा लागला.
ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्याकरिता आफ्रिका, भारत, ब्रिटन, अशा देशांतून येणारे खेळाडू कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन घेऊन टोकियोला येतील व त्यामुळे जपानी लोकांच्या जिवाला धोका वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याकरिता येणाऱ्या क्रीडापटूंचा कमीतकमी लोकांशी संपर्क येईल यादृष्टीने काय खबरदारी घेता येईल, असा विचार आयोजक करीत आहेत. मात्र, सांघिक क्रीडा प्रकारात सोशल डिस्टन्सिंग व अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर बंधने असल्याने ऑलिम्पिक आयोजकांपुढेही पेच आहे. प्रेक्षकांना बंदी केली तरी त्यांचा जर आयोजनालाच विरोध असेल, तर ज्यांच्या रंजनाकरिता हा उपद्व्याप करायचा त्यांचाच रोष ओढवून घेण्यासारखे आहे. त्यामुळे आयपीएलपाठोपाठ ऑलिम्पिकच्या आनंदालाही मुकावे लागणार आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील सरकारने वेगवेगळ्या वाहिन्यांवरील मालिकांच्या चित्रीकरणाला बंदी घातली. त्यामुळे अनेक वाहिन्यांनी शेजारील गुजरातमध्ये, तसेच गोव्यात मालिकांचे शूटिंग सुरू केले होते. मात्र, गोव्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने मालिकांना तेथील गाशा गुंडाळावा लागला.
आता गुजरात किंवा हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटी येथेच शूटिंग सुरू राहू शकते. त्यामुळे निदान छोट्या पडद्यावरील करमणूक तरी सुरू आहे. कोरोना, आयपीएल व त्यात महाराष्ट्रात चित्रीकरणबंदी या काळात मालिकांचे चित्रीकरण थांबविण्याचा विचार केला गेला होता. मात्र, आयपीएलमुळे एकदा मालिकेपासून दुरावलेला दर्शक पुन्हा जोडणे किती जिकिरीचे होते, याचा अनुभव गतवर्षी लॉकडाऊनमध्ये निर्मात्यांनी घेतला होता. मनोरंजन क्षेत्रातील लक्षावधी लोकांचे पोट हातावर आहे. क्रीडापटूंकरिता सराव, फिटनेस हेच सर्वस्व आहे. मात्र, कलाकार असो की, क्रीडापटू साऱ्यांनाच जखडून ठेवणारे युद्ध कोरोनामुळे जगावर लादले गेले आहे. नदीच्या पात्रात तरंगणारी प्रेते, कोरोना मृतांच्या नातलगांचा टाहो आणि आर्थिक चणचणीचे चटके, हेच जगाचे प्राक्तन ठरले आहे.