शंभर वर्षांपूर्वी, पहिले महायुद्ध संपता संपता जगभर पसरलेल्या इन्फ्ल्यूएंझा किंवा स्पॅनिश फ्लूच्या महामारीने भारतात पावणेदोन कोटींच्या आसपास बळी घेतले होते. जवळपास ५ टक्के लोकसंख्येचा घास तापाने घेतला होता. ब्रिटिश इंडियातील मृत्यूचे हे प्रमाण जगात सर्वाधिक होते. सार्वजनिक आरोग्य सुविधा जणू नावालादेखील नव्हती. आता शंभर वर्षांनंतर कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या साथीने त्या आठवणी जाग्या केल्या असल्या तरी लागण, मृत्यू अशा अनेक बाबतीत देश खूप सुधारला, असे म्हणावे लागेल. विज्ञानाची प्रगती लाखो लोकांचे जीव वाचविण्यासाठी सहाय्यभूत ठरली. परवा शनिवारी भारतातील कोविड-१९ रुग्णसंख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला. १ लाख ४५ हजार जणांचे जीव गेल्या साडेदहा महिन्यात गेले आहेत, तर तब्बल ९५ लाख लोकांनी या जीवघेण्या विषाणूचा यशस्वी सामना केला, ते बरे होऊन घरी परतले.कोरोना प्रतिबंधक लसीच्या कुपी केवळ भारतच नव्हे तर जगाच्याच दरवाजावर टकटक करीत असताना या फैलावाचा सामना भारताने कसा केला, याचे सिंहावलोकन गरजेचे ठरते. एकतर हा अज्ञात शत्रू कसा, कुठून हल्ला करील याची अजिबात कल्पना नसल्याने सुरुवातीला सगळेच गोंधळलेले दिसले. एक दिवस जनता कर्फ्यू किंवा तीन आठवड्यांचे लॉकडाऊन पुरेसे ठरेल, असे मानणारे खूप होते. जिथून हा विषाणू जगभर गेला, त्या चीनमधील वुहान शहराने याच मार्गाने त्यावर नियंत्रण मिळवल्याने तसे वाटणे साहजिक होते. पण देशादेशांमधील माणसांचा आहार, आरोग्याची स्थिती आणि रोगप्रतिकारकशक्ती, सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचा दर्जा, वैयक्तिक व सार्वजनिक शिस्त अशा अनेक बाबतीत वेगळेपणामुळे देशादेशांमधील प्रादुर्भावामध्ये फरक पडलेला दिसला. अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात जगातील सर्वाधिक पावणेदोन कोटींहून अधिक रुग्ण व तीन लाखांवर बळी नोंदविले गेले. भारताप्रमाणेच टाळ्या-थाळ्या व दिव्यांसारखे चित्रविचित्र प्रकार करणाऱ्या ब्राझीलमध्ये भयंकर उद्रेक अनुभवायला मिळाला. महामारीच्या पहिल्या टप्प्यात जगाचा थरकाप उडविणाऱ्या इटलीमध्ये जवळपास पाच महिने मृत्युदर चौदा टक्क्यांहून अधिक राहिला. अमेरिका, युरोपमध्ये आधुनिकतेसोबतच जंकफूड व अन्य कारणांनी रोगप्रतिकारकशक्ती प्रचंड खालावल्याचे उघड झाले. परिणामी जगाची रुग्णसंख्या साडेसात कोटींच्या पुढे गेली. या उलट भारतात कष्टकऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या काटक शरीरांनी विषाणूला जुमानलेच नाही. आपल्याकडील बहुतेक मृत्यू चाळिशी- पन्नाशीच्या पुढच्या वयोगटातील आहेत, हे येथे महत्त्वाचे. लॉकडाऊनमुळे पोटापाण्याचा गाडा थांबला तेव्हा महाभयंकर पायपीट व उपासमार आणि ‘विषाणू परवडला; पण स्थलांतरित मजूर म्हणून या हालअपेष्टा नकोत’, असे म्हणायची वेळ कष्टकरी वर्गावर आली. रुग्णसंख्येबाबत बंगळुरू, पुणे, मुंबई, ठाणे व चेन्नई ही शहरे देशात पहिल्या पाच क्रमांकावर आहेत. दिल्लीने तीन लाटांचा सामना केला आहे. या पार्श्वभूमीवर, एक कोटी रुग्ण संख्येचा टप्पा ओलांडतानाच देशातील कोविड-१९ प्रादुर्भावाची स्थिती झपाट्याने सुधारत असणे खूप दिलासादायक आहे. पहिल्या दहा लाख रुग्णांची नोंद १६८ दिवसांमध्ये झाली होती, तर शेवटच्या ९० लाखांवरून एक कोटीसाठी २९ दिवस लागले. ८० ते ९० लाख हा टप्पा २२ दिवसात गाठला गेला. या उलट सप्टेंबरमध्ये रोज ९० हजारांहून अधिक रुग्ण बाधित होत होते तेव्हा अवघ्या ११ दिवसात ४० ते ५० लाख हा टप्पा गाठला गेला. अर्थात स्थिती सुधारत असली तरी गाफील राहता येणार नाही. प्रत्येकापर्यंत लस पोहोचण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. अन्य देशांच्या तुलनेत महामारीचा सामना आपण बऱ्याच यशस्वीपणे केला असला तरी, सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची स्थिती काही अपवाद वगळता चांगली नाही. रुग्णसंख्या अधिक असली तरी महाराष्ट्र, केरळ आदी प्रगत राज्ये आणि अन्य गरीब राज्ये यांच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी तफावत आहे. दसरा-दिवाळीच्या काळातील लाटेसारखी नवी मोठी लाट येण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञ सांगत असले तरी प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या ११ महिन्यांमध्ये व्यवस्थेतील ज्या त्रुटी, दोष उघडे पडले त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य व केंद्र सरकारनेही कामाला लागायला हवे. ही समज व विज्ञान हातात हात घालून पुढे जात राहिले तरच शंभर वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता जो विषाणूवर विजय मिळविला आहे, त्याला अर्थ राहील. भविष्यातील अशा संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रशक्ती निर्माण होईल.
शंभर वर्षांपूर्वी व आता ...; भविष्यात जीवघेण्या विषाणूचा सामना करण्यासाठी राष्ट्रशक्ती निर्माण होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 6:36 AM