राजकारण म्हटले की, पक्षा-पक्षांतील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकांतील जीवघेणी चुरस. ग्रामपंचायत असो की लोकसभा, त्यांच्या निवडणुकांत शासकीय, प्रशासकीय आणि व्यक्तिगत पातळीवर पैशाची प्रचंड उधळपट्टी केली जाते. काहीही करून निवडणूक जिंकण्यासाठी जवळपास सर्वच पक्ष साम, दाम, दंड, भेद या प्रकारांचा सर्रास वापर करतात. निवडणूक झाल्यानंतरही हे प्रकार थांबत नाहीत. सत्ता स्थापण्यासाठी निवडून आलेल्या काही उमेदवारांचा घोडाबाजार भरतो. या बाजारात मग कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊन पैशाच्या जोरावर सत्ता स्थापण्याचे सोपस्कार पूर्ण होतात. यालाच आपण लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे म्हणत असतो. या सर्व पार्श्वभूमीवर निमकुंड या गावचा कारभार म्हणजे राजकारण्यांचा दृष्टीने ‘वेडाचार’च म्हटला पाहिजे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पायथ्याशी वसलेल्या आणि जेमतेम दोन हजाराच्या आत लोकसंख्या असलेल्या या गावात म्हणे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंंचायत निवडणुकाच झाल्या नाहीत. पंचायत राज आल्यावर देशातील ग्रामपंचायतींना अतिशय महत्त्व आले. सरकारकडून बक्कळ पैसा मिळू लागला. मोठे अधिकार हाती आले. साहजिकच हे वैभव पाहून ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांत चढाओढ निर्माण झाली. आता राजकीय पक्ष आले म्हणजे राजकारण आलेच. पाहता, पाहता या ग्रामपंचायत निवडणुकांनाही विधानसभा निवडणुकांसारखे स्वरूप आले आणि मोठ्या निवडणुकांत होतात ते सर्व गैरप्रकार येथेही दिसू लागले. निमकुंड मात्र या गैरप्रकारांपासून दूरच राहिले. यासाठी तेथील गावकºयांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. १९९४ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला तेव्हापासून तेथे पाचदा निवडणुका लागल्या पण या सर्व बिनविरोध करण्याचा समंजसपणा तेथील नागरिकांनी दाखविला. वाद, मतभेद सगळीकडेच असतात, हे गावही त्याला अपवाद नाही. पण निवडणुका आल्या की, सर्वजण मतभेद बाजूला सारून एक होतात. सर्वानुमते उमेदवांची निवड करतात. एकमताने हे होत असल्यामुळे मग गावच्या विकासकामातही राजकारण येत नाही. आडकाठी येत नाही. आज या गावात सर्व सोईसुविधा आहेत. वीज, रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य या आघाड्यांवर गावाने मोठा विकास केला. पण दुर्दैव हे की, या कामाची शासन दरबारी कोणतीही दखल घेण्यात आली नाही. प्रोत्साहन म्हणून भरीव निधीचे तर सोडा, साधे प्रशस्तीपत्र देण्याचे सौजन्यही शासनाने कधी दाखविले नाही. सत्ताधाºयांना राजकारण करण्यात रस असतो, विकासकामांत नव्हे, हेच यातून सिद्ध होत नाही का?
एक असेही वेडे गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 3:12 AM