दिनेश कार्तिकने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पाडव्याची गोडी दुप्पट केली. अवघ्या आठ चेंडूंवर दोन चौकार आणि तीन षटकारांसह २९ धावांचा झंझावात हा केवळ आणि केवळ चित्तथरारक असाच होता. प्रतिभा असलेला, पण संधीअभावी देदीप्यमान कामगिरीत अपयशी ठरलेल्या दिनेश कार्तिकने संधी मिळताच तिचे सोने केले. दिग्गजांना हेवा वाटेल अशी कामगिरी केली. शेवटच्या दोन षटकांमध्ये ३४ धावा हव्या होत्या. १९ चेंडू टोलवित १७ धावा करणाऱ्या विजय शंकरला मोठे फटके मारण्यात अपयश येत असल्याचे दिसताच भारताने सामना गमावला असे अनेकांचे मत बनले होते. पण दिनेश कार्तिकने बांगलादेशच्या तोंडातून विजयाचा घास अक्षरश: हिसकावून घेतला. सामना संपताच प्रसारमाध्यमांनी दिनेश कार्तिकला डोक्यावर घेतले. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या करिश्म्यात झाकोळला गेलेला खेळाडू असेच दिनेश कार्तिकचे वर्णन केले गेले, तेही या विजयाच्या पार्श्वभूमीवर योग्य वाटते. कार्तिक तसा नशीबवान म्हणावा लागेल. आयपीएलमुळे त्याची प्रतिभा नजरेपुढे येत राहिली. धोनी निवृत्त झाल्यावर तरी किमान आपल्या प्रतिभेला मोठा वाव मिळू शकतो असा आशावाद बाळगून कार्तिक मैदानात आहे. दिनेश कार्तिक यापुढेही खेळत राहील. नवे विक्रम रचेल, परंतु बांगलादेशविरोधात निदाहास ट्रॉफीच्या निर्णायक सामन्यात अखेरच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारा क्षण कार्तिकची ओळख ठरेल यात शंका नाही. हा क्षण त्याला आणि तमाम क्रिकेटप्रेमींना आयुष्यभर सुखद साथ देणारा असेल. न डगमगता जिगरबाज फटकेबाजी करणाºया कार्तिकने देशाला विजय मिळवून दिला नसता तर अंतिम फेरीपर्यंतचा भारताचा प्रवास हा व्यर्थच ठरला असता. सौम्या सरकारच्या चेंडूवर क्रिकेटच्या भाषेत ‘पॅरलल’ षटकार खेचून कार्तिकने बांगलादेश संघाच्या उन्मादाला ठोस उत्तर दिले. त्याआधीचे काही क्षण कर्णधार रोहित शर्मासाठी निराशादायी होते. अखेरच्या चेंडूवर पाच धावा निघणार की नाही म्हणून त्याने कार्तिकचा हा थरारक फटका पाहिलाच नाही. कार्तिकने मात्र अशक्य ते शक्य करून दाखविले. त्यामुळेच हा निर्णायक षटकार पुढील अनेक वर्षे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात राहील. फलंदाजी, यष्टिरक्षण आणि क्षेत्ररक्षणात तरबेज असलेल्या कार्तिकला आता नियमित खेळाडू या नात्याने संघात स्थान मिळावे, अशी चर्चा रंगणार आहे. नियमितपणे स्थान मिळण्यासारखे त्याचे कर्तृत्वदेखील आहेच. पण भारतीय क्रिकेटमध्ये नियमितपणे स्थान मिळविणे हे मोठे अवघड आव्हान. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण काय चीज आहोत, हे दाखवून देण्याची कला कार्तिककडून शिकावी, हा आदर्शपाठ कालच्या त्याच्या कामगिरीतून घडला, असेच म्हणावे लागेल.
केवळ चित्तथरारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:15 AM