माणुसकी टिकली तरच आपणही टिकून राहू!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:05 AM2020-06-08T02:05:59+5:302020-06-08T02:07:23+5:30
हत्तीण आणि जॉर्जच्या अमानुष हत्येचे क्रौर्य येते तरी कुठून?
विजय दर्डा
भारतात केरळमध्ये फटाके भरलेले अननस खायला देऊन गरोदर हत्तिणीची केली गेलेली हत्या आणि अमेरिकेत मिनियापोलिस शहरात जॉर्ज फ्लॉईड या एका कृष्णवर्णीय नागरिकाची पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने गळा दाबून केलेली हत्या या दोन्ही घटना हृदयद्रावक आहेत. परराज्यांमध्ये ‘लॉकडाऊन’मुळे अडकलेले लाखो स्थलांतरित मजूर घरी परत जाण्याच्या ओढीने रक्तबंबाळ झालेल्या पायांनी शेकडो कि.मी.ची पायपीट करीत निघाल्याची दृश्ये पाहूनही हृदय असेच पिळवटून गेले होते. या घटनांनी मला खूप अस्वस्थ करून सोडले आहे. एवढे क्रौर्य व अमानुषता अखेर कशासाठी, हाच प्रश्न मनात रुंजी घालत राहतो. सर्व प्राणिमात्रांमध्ये माणूस स्वत:ला सर्वांत जास्त सभ्य व विकसित असल्याचे मानतो. तर मग हत्तिणीला स्फोटकांनी भरलेले अननस खायला घालण्याचे वा एखाद्याचा गळा दाबून, प्रत्येक श्वासासाठी तडफडायला लावून ठार मारण्याचे क्रौर्य माणसात येते तरी कुठून? या माणसाच्या नव्हे, तर राक्षसाच्या प्रवृत्ती आहेत!
अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येचा समाजमाध्यमांत व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलेल्या प्रत्येकाचे डोळे नक्कीच पाणावले असणार. अमेरिका एरवी संपूर्ण जगाला मानवाधिकारांचे व त्यांच्या रक्षणाचे डोस पाजत असते; पण त्याच अमेरिकेच्या भूमीवर जॉर्जला एकेका श्वासासाठी तडफडविले गेले. अशा वेळी अमेरिकेला देशातील घृणास्पद वंशवाद व वर्णभेद अजिबात दिसत नाही. कोरोनाचे भीषण संकट असूनही जॉर्जच्या हत्येच्या निषेधार्थ केवळ कृष्णवर्णीच नव्हे, तर गोरे नागरिकही अमेरिकेच्या शेकडो शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने रस्त्यांवर उतरावेत यावरूनच ही समस्या किती गंभीर स्तराला पोहोचली आहे, याची कल्पना येते.
भारतात तर हत्तिणीच्या हत्येने माणुसकी पार धुळीला मिळविली आहे. खरं तर आपली संस्कृती निसर्गाला जपणारी, पुजणारी; पण हल्ली आपणही निसर्गावर सर्रास अत्याचार करू लागलो आहोत. जंगले, नद्या व पर्वत नष्ट करीत आहोत. वाघ, हत्ती वा अन्य वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर माणसाने आक्रमण सुरू केल्यावर या प्राण्यांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळविणे स्वाभाविकच आहे. माणूस खरं तर यामुळेच संकटात सापडलाय. ‘लॉकडाऊन’च्या काळात माणसांचे व्यवहार बंद होते, तर पर्यावरण किती स्वच्छ व साफ झाले होते, ते पाहिलंत ना? स्वत:च्या हावेला मुरड घालून माणसाने माणुसकीचे भान ठेवले तर चांगल्या भविष्याची आशा आपण ठेवू शकू!
‘लॉकडाऊन’च्या काळात स्थलांतरित मजुरांना सोसावे लागलेले हाल हेही माणुसकी हरवल्याचेच लक्षण आहे. हे मजूर उपाशीपोटी सडकून तापलेल्या रस्त्यांवरून, रेल्वेच्या रुळांमधून चालत निघाले होते. त्यांचे पाय सोलवटून रक्तबंबाळ झाले होते. कोणी मुलगा आई-वडिलांना हातगाडीवर बसवून ती शेकडो कि.मी. ढकलत नेणार होता! महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की, माणसामध्येच परमेश्वर वास करीत असतो. गरिबांसाठी ‘दरिद्रीनारायण’ हा शब्दही त्यांचाच; पण गेल्या काही दिवसांत मानवता लयाला गेल्याचे व आपुलकीच्या ठिकºया उडाल्याचे पाहायला मिळाले.
आपल्यापैकी कितीजण त्यांच्या घरी काम करणाºया गडी-मोलकरणींची मनापासून काळजी घेतो? त्यांच्या आजारपणाची फिकीर करतो की, अडीअडचणींची चौकशी करतो? करीत नसाल तर या गोष्टी करून पाहा. त्याने तुमच्या मनाला वेगळीच शांतता लाभेल व आपण माणूस असल्याचा अभिमान वाटेल. काही दिवसांपूर्वी मी नागपूरला आमच्याकडे काम करणाºया झाडूवाला, स्वयंपाकी व ड्रायव्हर अशा सर्व सेवकवर्गासोबत भोजन केले. आमची मनापासून सेवा करीत असल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले व तुम्ही आमच्या कुटुंबातलेच आहात, असे सांगितले. त्याच दिवशी मुंबईत माझा मुलगा देवेंद्र, सून रचना व नातू आर्यमन या सर्वांनी मिळून जेवण तयार केले. मेनूही जोरकस होता. माझा धाकटा नातू शिवान हाही त्यांना मदत करीत होता. आम्ही रोज ज्या डायनिंग टेबलवर बसून सेवकांनी बनविलेले जेवण जेवतो त्याच टेबलावर या मालक मंडळींनी तयार केलेले जेवण सेवकवर्गाला प्रेमाने वाढले गेले. माझ्या नेहमीच्या खुर्चीवर स्वयंपाक करणाºया महाराजांना बसविले गेले, तेव्हा आधी ते बसायलाच तयार झाले नाहीत. शेवटी मोठ्या मुश्किलीने ते त्या खुर्चीवर बसले. माझ्या मुलाने, सुनेने व नातवाने त्या सेवकांचे मनापासून आभार मानून त्यांना प्रेमादराने जेवू घातले. एवढेच नव्हे तर जेवणानंतर सेवकांच्या उष्ट्या प्लेटही त्यांनीच घासल्या. कौटुंबिक संस्कारांमुळेच हे सर्व शक्य झाले. बाबूजी आणि बाईने (आई) आम्हाला नेहमी हेच शिकविले की, माणसांमध्ये लहान-मोठे कोणी नसते. मोठी असते ती फक्त माणुसकी! तुम्ही कितीही मोठे झालात, पण माणुसकी नसेल तर त्या ऐश्वर्याला किंमत काय? आपण कितीही वैज्ञानिक प्रगती केली. चंद्र-ताऱ्यांवर स्वारीचे मनसुबे रचले तरी गरिबांच्या मनातील व्यथा कळणार नाहीत, तोपर्यंत तुम्हालाच तुमचे मोठेपण कळणार नाही! आपण सर्वधर्मसमभाव मानणारे धर्मनिरपेक्ष लोक आहोत. तरीही यात खोडा घालून मानवतेवर घाला घालण्याचे कुटिल प्रयत्न केले जातात. अशा कसोटीच्या वेळीही जेव्हा माणुसकीची उदारहणे दिसतात तेव्हा मनाला खूप समाधान होते.
पंजाबमध्ये लुधियानाजळचे गाव. तेथे अब्दुल साजीदने त्याचा मित्र वीरेंद्र कुमारच्या मुलीचा विवाह पिता म्हणून स्वत: कन्यादान करून हिंदू रीतिरिवाजांनुसार लावून दिले. केरळच्या एका मशिदीत होमहवन करून एका हिंदू दाम्पत्याने लग्नाचे सात फेरे घेतले. मुस्लिम समाजाने वधूसाठी आहेर केला, तर वधू-वराने इमामांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. गुजरातमध्ये एका मुस्लिम कुटुंबाने पांड्याडी नावाच्या त्यांच्या मित्रावर अग्निसंस्कार केले. त्या कुटुंबातील अरमान नावाच्या मुलाने मुंडण करून, धोतर नेसून व गळ्यात जानवे घालून आपल्या आजोबांच्या मित्राची कपालक्रिया केली. माणसाला खरा धर्म जेव्हा कळतो व जेव्हा माणुसकी त्याच्या रोमारोमात भिनलेली असते तेव्हाच असे शक्य होते. ही माणुसकी टिकली तरच आपणही टिकून राहू. ही वेळ सर्वांनी एकजुटीने माणुसकी टिकविण्याची आहे. माणुसकी हीच आपल्या संस्कृतीची सर्वांत थोर देन आहे.
(लेखक लोकमत समुहाच्या एडिटोरियल बोर्डेचे चेअरमन, आहेत)