- विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह)अंधारावर प्रकाशाने मात करण्याच्या दीपावली सणाची सुरुवात आपण धनत्रयोदशीने करतो. धनत्रयोदशी का साजरी केली जाते व त्यामागचा नेमका हेतू काय, असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. पौराणिक ग्रंथ चाळले, तर धनत्रयोशीसंबंधी अनेक किस्से आढळतील, परंतु त्यातील सर्वात महत्त्वाचा आहे, समुद्रमंथनातून निघालेल्या १४ रत्नांपैकी धन्वंतरीचा. हाती अमृतकलश घेतलेले धन्वंतरी समुद्रमंथनातून बाहेर आले. ‘धन्वंतरी’ हा भगवान विष्णूंचा अवतार आहे व ते देवतांचे वैद्य आहेत, असे मानले जाते. आयुर्वेदाची सुरुवात त्यांनीच केली. म्हणूनच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंतीही साजरी केली जाते.याचा सरळ अर्थ असा की, आपण सर्वांनी आपले आरोग्य चांगले ठेवावे, आपला परिसर आरोग्यसंपन्न ठेवावा, हा धनत्रयोदशीचा महत्त्वाचा संदेश आहे. वडीलधारी मंडळी पूर्वापार सांगत आली आहेत, ‘पहला सुख निरोगी काया, दुजा सुख घर में माया!’ म्हणजे तुम्ही निरोगी असाल, तरच खरे सुखी व्हाल. माया म्हणजे पैसा-संपत्तीचे महत्त्व सुआरोग्यानंतरचे आहे, पण सध्या काय स्थिती आहे, हे वेगळे सांगायला नको. माया पहिल्या क्रमांकावर आली आहे व आरोग्याला सर्वात शेवटचे स्थान मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मी आरोग्यविषयक एक अहवाल वाचत होतो. वाचून खूप चिंतित झालो. सांगितले तर तुम्हीही हैराण व्हाल की, भारतातील ५० टक्क्यांहून अधिक तरुण महिला पूर्णपणे निरोगी नाहीत. त्यांच्यात रक्ताची कमतरता आहे. जन्म देणारी स्त्रीच जर निरोगी नसेल, तर भावी पिढी निरोगी निपजण्याची कल्पना तरी कशी करता येईल? अहवालात लिहिले होते की, हल्ली तरुण पिढीमध्ये धूम्रपान व नशापाणी करणे ही फॅशन बनत आहे. याने तरुणाई पोखरली जातेय. बाहेरचे अरबट-चरबट खाण्याने समाजाचा एक मोठा वर्ग लठ्ठपणाच्या विळख्यात जखडला जात आहे. व्यायाम तर जवळजवळ बंदच झाला आहे. पूर्वी गल्लीबोळांत व्यायामशाळा असायच्या. आता तशा व्यायामशाळा अभावाने पाहायला मिळतात. खेळांची मैदानेही शिल्लक राहिलेली नाहीत. मुलांसाठी हल्ली कॉम्यूटर गेम्स हेच खेळ झाले आहेत. सांगायचे तात्पर्य असे की, युवापिढीच्या आरोग्याकडे देशाचे लक्ष नाही. युवकच आरोग्यसंपन्न नसतील, तर देश तरी निरोगी कसा होणार? विकासाच्या वाटेवर देशाला घोडदौड करायची असेल, तर नागरिकांचे सुआरोग्य अत्यंत गरजेचे आहे. निरोगी असाल, तरच धन आणि वैभव मिळविण्यासाठी मेहनत करू शकाल. आरोग्यालाच घातक ठरेल, अशी स्पर्धा व धावपळ काय कामाची? तेव्हा या धनत्रयोदशीला संकल्प करू या की, प्रत्येक जण आपले आरोग्य उत्तम ठेवेल व भावी पिढीलाही त्यासाठी प्रेरित करेल.आपल्या संस्कृतीमध्ये संस्कार, उत्तम शिक्षण, औदार्य व परोपकार ही वैभवशाली व्यक्तीची प्रमुख लक्षणे मानली गेली आहेत. अशा व्यक्ती समाजाकडून सन्मानित होतात, म्हणजेच हे सर्व गुण आपल्यासाठी धनसंपत्ती आहेत. चांगल्या शिक्षणाने आपण सर्व भौतिक साधने प्राप्त करू शकतो. औदार्य आणि परोपकाराने समाजातील जास्तीतजास्त लोक आपल्याशी जोडले जातात. तुमच्या संगतीत सद््वर्तनी लोकांचा समूह असेल, तर आपले ते फार मोठे धन आहे. याच्या सुखद परिणामांनी जीवन अधिक सुंदर होते. याहून मोठी गोष्ट आहे संतोष, समाधान! दुर्दैवाने हल्ली संतोष हा गुण दुर्लभ होत चालला आहे. प्रत्येक जण दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाण्याच्या शर्यतीत धावत आहे. स्पर्धा वाईट, असे मला म्हणायचे नाही. ईर्ष्येने स्पर्धा करण्याचा गुणही आवश्यक आहे, परंतु ही स्पर्धा आंधळेपणाची व अनिर्बंध असता कामा नये. स्पर्धेतही संतोष असायला हवा.मनात संतोष असेल, तर सुखी आयुष्य जगायला त्याची मदत होईल. काही दिवसांपूर्वी मी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’चा ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०१८’ वाचत होतो. तुम्हाला माहिती आहे की, सुखी-आनंदी जीवनाच्या बाबतीत भारत १५६ देशांमध्ये १३३ क्रमांकावर आहे? गेल्या म्हणजे सन २०१७ च्या अहवालाच्या तुलनेत भारताचे स्थान ११ क्रमांकांंनी खाली घसरले आहे. आश्चर्य म्हणजे, पाकिस्तान, चीन आणि श्रीलंका आपल्याहून पुढे असून, त्यांची खुशाली वाढली आहे. मुद्दाम नमूद करायला हवे की, पूर्वी नॉर्वे हा जगातील सर्वात आनंदी, सुखी देश मानला जायचा व त्याचा क्रमांकही पहिला असायचा, पण आता ती जागा फिनलँड या छोट्याशा देशाने घेतली आहे. या सुखी-समाधानी खुशालीसाठी आपल्यालाही पूर्ण शक्तिनिशी प्रयत्न करायला हवेत. विकासाच्या गतीला चालना मिळेल, पण त्यात माणुसकीलाही जागा असेल, असे वातावरण आपल्या आजूबाजूला निर्माण करण्याचा प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाने करायला हवा. आपण जेव्हा उत्तम माणूस बनू, तेव्हाच अंधाराशी लढून प्रकाश पसरवू शकू.
केवळ भौतिक श्रीमंती हे वैभव नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 5:00 AM