महाराष्ट्राच्या नावातच महानता असल्याने की काय, नियतीने कितीही प्रहार केले तरी, महाराष्ट्र प्रत्येक वेळी झळाळून उठला आहे. संघर्षातून जन्माला आलेल्या आधुनिक महाराष्ट्राने आधुनिक भारताच्या जडणघडणीत सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी वर्षास आजपासून प्रारंभ होत आहे. हीरकमहोत्सव हा खरे म्हणजे अत्यंत आनंददायी मैलाचा दगड! हर्षोल्हासात साजरा करण्याचा क्षण!... पण दुर्दैवाने महाराष्ट्राच्या पदरी ना सहजासहजी कधी काही पडले ना कधी यशाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळाली! जवळपास अर्धे सहस्रक परकियांची गुलामगिरी सोसलेल्या भारताला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची पहाट दाखवली; पण महाराष्ट्राला आपल्या लाडक्या राजाच्या राज्याभिषेकाचा पुरता आनंदही साजरा न करू देताच नियतीने त्यांना आमच्यापासून हिरावले! त्यानंतर स्वराज्याचा घोट घेण्याच्या उद्देशाने जातीने दख्खनमध्ये उतरलेल्या आलमगिराला आमच्या शंभूराजांनी सळो की पळो करून सोडले असताना, नियतीने त्यांनाही हिरावून घेतले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हाही समस्त मराठी भाषिकांचे एकच राज्य अस्तित्वात यावे आणि आमचा नैसर्गिक हक्क असलेले राजधानीचे मुंबई शहर आम्हाला मिळावे, यासाठी १०५ हुतात्म्यांना देह धारातीर्थी ठेवावे लागले. प्रखर लढ्यानंतर समस्त मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले खरे; पण बेळगाव-कारवार-निपाणीची सल साठ वर्षांनंतरही मराठी माणसाच्या हृदयात ठसठसतच आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात पानोपानी नियतीच्या अशा क्रूर खेळाची उदाहरणे सापडतात. ‘राकट देशा, कणखर देशा’ असे या राज्याचे वर्णन मराठीचा शेक्सपियर म्हटले जाणाऱ्या राम गणेश गडकरी यांनी करून ठेवले आहे. या भूभागाच्या राकटपणाची, कणखरपणाची सतत परीक्षा घेण्याचा चंगच नियतीने जणू काही बांधला असावा! आज आमचे हे सुंदर, संपन्न राज्य हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असतानाही नियतीने पाठ सोडलेली नाही. महाराष्ट्र सध्या साठ वर्षांच्या इतिहासातील सर्वांत भीषण अशा संकटास तोंड देत आहे. संपूर्ण राज्य ठप्प झाले आहे. अटकपासून कटकपर्यंत आणि तंजावूरपासून पेशावरपर्यंत भीमथडी तट्टांना दौडवित समशेरी तळपवलेला मराठी माणूस आज स्वत:च्या घरातून बाहेरही पडू शकत नाही; पण इतिहास साक्षी आहे की, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राची पाठ भिंतीला टेकली, तेव्हा तेव्हा त्याने उसळी घेतली आणि तीदेखील अशी की, जगाने अचंब्याने तोंडात बोटे घातली! याच लौकिकास जागत महाराष्ट्र लवकरच कोविड-१९ आपत्तीवरही मात करेल आणि प्रगतीच्या महामार्गावर पूर्वीच्याच जोमाने धावू लागेल, हे नि:संशय! महाराष्ट्राच्या नावातच महानता असल्याने की काय, नियतीने कितीही प्रहार केले, तरी महाराष्ट्र प्रत्येक वेळी झळाळून उठला आहे. संघर्षातून जन्माला आलेल्या आधुनिक महाराष्ट्राने आधुनिक भारताच्या जडणघडणीत सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे. आर्थिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, वैज्ञानिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने आपला अमीट ठसा सातत्याने उमटवला आहे. साठ वर्षांच्या वाटचालीत अनेकदा महाराष्ट्राच्या वाट्याला अन्याय, उपेक्षाही आली; परंतु देशासाठी महाराष्ट्राने त्याची कधीच पर्वा केली नाही. जेव्हा जेव्हा गरज भासली, तेव्हा तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला, हा इतिहास आहे! आज प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. वस्तुत: देशातील अनेक राज्ये नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्राच्या तुलनेत समृद्ध आहेत. मात्र, कणखर नेतृत्व आणि कष्टकरी जनतेच्या बळावर महाराष्ट्र सातत्याने देशातील सर्वांत समृद्ध राज्य म्हणून दिमाखाने मिरवित आला आहे. साठ वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राने बरेच काही साध्य केले खरे; परंतु छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकारण्यासाठी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. हीरकमहोत्सव जल्लोषात साजरा करण्याची संधी तर नियतीने आमच्यापासून हिरावली आहे; परंतु त्यानिमित्ताने सिंहावलोकन करतानाच पुढील वाटचालीसंदर्भात विचारमंथन आम्ही नक्कीच करू शकतो. गत साठ वर्षांत महाराष्ट्राने बºयापैकी भौतिक समृद्धी साधली; पण त्या समृद्धीची फळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली का? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळते. आज एका बाजूला विविध क्षेत्रांमध्ये सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेली उत्तुंग उंचीची मराठी माणसे दिसतात आणि दुसरीकडे सर्वसामान्य मराठी माणूस आजही मूलभूत प्रश्नांच्या जंजाळातच अडकून पडलेला दिसतो. आजही राज्यातील अनेक लोकांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडते. अनेकांच्या डोक्यावर छप्पर नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही आणि दररोज शेतकरी आत्महत्या करीतच आहेत! खोट्या प्रतिष्ठेपायी स्वत:च्या वा दुसºयाच्या पोटच्या गोळ्याची हत्या, दलितांवरील अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार, कुपोषणाचे बळी, आदिवासी मुलांचे मृत्यू, अशा महाराष्ट्राच्या पुरोगामी वारशाला बट्टा लावणाºया एक ना अनेक गोष्टी सुरूच आहेत. महाराष्ट्रात भारनियमन नसल्याचे मोठ्या अभिमानाने सांगत असताना, आजही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात राबावे लागते, या सत्याकडे आम्ही पाठ फिरवतो.राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या मिरवताना, हजारो पदवीधर अभियंते चतुर्थश्रेणी पदांसाठी अर्ज करतात, या वस्तुस्थितीकडे आम्ही सोयिस्कर डोळेझाक करतो. केवळ चारपदरी, सहापदरी महामार्गांचे जाळे निर्माण होणे, शहरांमध्ये उड्डाणपूल बांधत सुटणे, रात्री दिवसासारखा झगझगीत प्रकाश देणाºया एलईडी दिव्यांची आरास उभारणे, रेस्टॉरंट, मॉल, चित्रपटगृहे चोवीस तास उघडे ठेवण्याची परवानगी देणे म्हणजे प्रगती नव्हे! त्याला अंत्योदयाची जोड देणेही तेवढेच गरजेचे आहे. दुर्दैवाने गत काही काळात याकडे कळत नकळत आमचे दुर्लक्ष होत गेले, ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. केवळ भौतिक समृद्धी म्हणजे सर्वकाही नव्हे, याचे भान आपल्याला राखावेच लागेल. जोपर्यंत फुले, शाहू, आंबेडकरांनी शिकविलेली समता, बंधुता ही मूल्ये खºया अर्थाने प्रस्थापित होणार नाहीत, तोपर्यंत कितीही भौतिक समृद्धी साधून उपयोग नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचा केवळ उठता-बसता गजर केल्याने काही होणार नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणावे लागतील. दुर्दैवाने गत काही काळातील घटना-घडामोडी बघता, या महापुरुषांनी दाखविलेल्या मार्गावरून महाराष्ट्र ढळायला तर लागला नाही, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहात नाही. ही आशंका निराधार ठरविणे, ही समाजाला दिशा देण्याची ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने अशा प्रत्येक व्यक्तीने विचारप्रवृत्त होण्याची गरज आहे. महाराष्ट्र आणि मराठी भाषेचे मोठेपण जपण्यासाठी नेमके काय करायला हवे, याचा शोध घेण्याची प्रक्रिया हीरकमहोत्सवी वर्षात सुरू व्हायला हवी; परंतु मराठी अस्मिता जपतानाच वैश्विकीकरणाच्या आजच्या युगात आम्हाला संकुचित ठरविले जाणार नाही, याचेही भान आपल्याला राखावे लागेल. आजच्या दिवशी खरेच कुणाची उणीव भासत असेल, तर ती महाराष्ट्राचा मंगलकलश आणणाºया स्व. यशवंतराव चव्हाण यांची! आज महाराष्ट्राला त्यांच्या द्रष्टेपणाची, प्रगल्भतेची कधी नव्हे एवढी निकड आहे. केवळ चर्चासत्रे आयोजित करून, भाषणे देऊन, लेख लिहून, शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविता येणार नाही, तर त्यासाठी कृतिशील व्हावे लागेल. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यात आम्ही निश्चितपणे कमी पडलो आहोत, हे मान्य करून आजच्या हीरकमहोत्सवी महाराष्ट्रदिनी आपण सर्वजण महापुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध होण्याची शपथ घेऊया! या मंगलदिनी आमचे कोट्यवधी वाचक आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा!
Maharashtra Day: ...तरच शाहू, फुले, आंबेडकर अन् यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 3:18 AM