शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

केवळ अद्वितीय... भारतीय सैन्याला सलाम!

By विजय दर्डा | Published: October 07, 2024 7:17 AM

आपल्या देशात किमान एक जागा अशी आहे, जिथे प्रत्येक माणूस नतमस्तक होतो. आपली सेना ही ती जागा. प्रत्येक क्षेत्रात ते आपली कमाल दाखवतात.

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, , लोकमत समूह

अलीकडेच सेवानिवृत्त झालेले पायदळाचे अध्यक्ष आणि नागपूरचे सुपुत्र मनोज पांडे यांची अचानक भेट झाली. ते आपल्या पत्नीला सांगत होते, हे 'लोकमत' वाले विजय दर्डा आहेत. यांनी कारगिलमध्ये जवानांसाठी खूप काम केले आहे. त्यांच्यासाठी उबदार घरे त्यांनी तयार केली. मी नम्रतेने हात जोडले. आपल्या देशात किमान एक जागा अशी आहे की, जिथे प्रत्येक माणूस नतमस्तक होतो. आपली सेना अर्थातच पायदळ, नौदल आणि वायुसेना ही ती जागा आहे.

ज्या प्रसंगाच्या निमित्ताने आज लष्करी दलाविषयी मी हा स्तंभ लिहित आहे, ती गोष्ट पायदळाची आहे. ७ फेब्रुवारी १९६८ रोजी वायुसेनेचे मालवाहू विमान चंदीगडहून लेहला जात असताना रोहतांग भागात दुर्घटनाग्रस्त झाले. दुर्गम आणि बर्फाच्छादित डोंगराळ असा हा प्रदेश असल्याने ना दुर्घटनाग्रस्त विमान सापडले, ना सैनिकांचे मृतदेह मिळाले; परंतु सेनेने हार मानली नाही. थांबून थांबून शोधपथके या भागात जात राहिली. २००३ ते २०१९ या दरम्यान काही मृतदेह मिळाले. विमानाचे अवशेषही सापडले. गेल्या महिन्यात शोधपथकाने ढाका हिमनदीजवळ १६००० फूट उंचीवर वर्षात दबलेल्या चार सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेतले होते. थॉमस चेरियन, मलखान सिंह, नारायण सिंह आणि मुन्शीराम या चौघांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचवले गेले.

सैनिकांचा मृत्यू झालेला आहे, असे मानले गेले होते; परंतु सैन्याने त्यांच्या कुटुंबीयांना कायम असेच सांगितले की, शोध सुरू आहे. सैन्याचे एक सूत्रवाक्य आहे. कोणत्याही सहकाऱ्याला मागे सोडून द्यायचे नाही. भले तो जखमी असो किंवा त्याला वीरगती प्राप्त झालेली असो. मी असेही प्रसंग वाचले आणि ऐकले आहेत, ज्यात आपल्या जखमी किंवा मृत सैनिकाला खांद्यावर वाहून नेताना वजन कमी करण्यासाठी सैनिकांनी त्यांच्याकडचे रेशन फेकून दिले. आपला सहकारी शत्रूच्या हाती लागू नये हाच हेतू त्यामागे असायचा. जगातल्या कुठल्या दुसऱ्या देशाच्या बाबतीत कर्तव्याप्रति अशी आस्था दिसणार नाही. 

पाकिस्तानने कारगिल युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांचे मृतदेह घ्यायलाही इन्कार केला होता, हे आपणास आठवत असेल, भारतीय सैन्याचा मोठेपणा हा की, पाकिस्तानी सैनिकांचे अंतिम संस्कार त्यांच्या धर्म, रीतीरिवाजानुसार आपल्या सैनिकांनी केले. लडाख प्रदेशात चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी ठार मारले, तर कित्येक वर्षे आपले सैनिक मारले गेलेत, हे चीनने मान्यच केले नाही. जगात युद्धाच्या अशा शेकडो कहाण्या आहेत, जेथे सैनिक आपल्या मृत सहकाऱ्यांना मागे सोडून एकतर पुढे गेले किंवा मागे सरले. परंतु, भारतीय सेना असे कधीच करत नाही. आपल्या सैन्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, आपले तरुण सैन्य अधिकारी जवानांच्याही पुढे चालतात. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानचे ९७ हजार सैनिक आपल्या कैदेत होते, तेव्हा लष्करप्रमुख सॅम माणेकशा त्यांची विचारपूस करत. पाकिस्तानी सैनिकांनी तेव्हा त्यांना सांगितले होते की, आपले सौजन्य आणि तरुण सैन्य अधिकाऱ्यांचे अदम्य साहस असलेले नेतृत्व आपल्या विजयाचे कारण आहे.

खरोखरच भारतीय सेनेतील आस्था आणि सौजन्य लाजवाब आहे. सैन्यात अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तेथे एक अशी म्हण आहे की, 'आपण आम्हाला एक तरुण देता. आम्ही देशाला एक संपूर्ण व्यक्ती बहाल करतो.' सैन्यदलांमध्ये जाऊन त्यांना समजून घेण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. हिमालयापासून कच्छच्या रणापर्यंत सीमावर्ती भागात मी गेलो आहे. आस्था आणि समर्पण यासह ते कसे सज्ज असतात, हे मी पाहिले आहे. मी काश्मीरमध्ये गेलो होतो, तेव्हा परिस्थिती अत्यंत वाईट होती. काश्मीर जळत होते. माझ्या गाडीच्या मागे-पुढे शस्त्रास्त्रांनी भरलेली वाहने होती. माझ्या बरोबरचे वरिष्ठ सेना अधिकारी रवी थोडगे मला सांगत होते की, सैन्यदले कशा प्रकारे आपल्या सीमेचे रक्षण करतात. दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करतात. सैन्य गावातल्या लोकांवर वैद्यकीय उपचार तर करतेच शिवाय मुलांचे शिक्षण आणि त्यांना खेळण्यास प्रवृत्त करण्याची महत्त्वाची भूमिकाही निभावते.

जगातले कुठलेच सैन्यदल इतक्या समर्पण वृत्तीने सेवा करत असेल, असे मला वाटत नाही. 'स्वतःच्या आधी सेवा' हे लष्कराचे अत्यंत महत्त्वाचे घोषवाक्य आहे. गोळ्या चालवणारे हात गरज पडल्यावर तत्काळ मदतीसाठी एकत्र येतात. २००३ साली उत्तराखंडात सैन्यदलांनी केलेले मदतकार्य जगातले सर्वात मोठे काम होते. २० हजार लोकांना सैन्याने वाचवले आणि सुमारे ४ लाख किलो खाद्यसामग्री लोकांपर्यंत पोहचवली.

राजस्थान सीमेवर तनोट माता मंदिर या ठिकाणी मी गेलो होतो. तेथे पाकिस्तानने बॉम्बवर्षाव केला होता, परंतु ते बॉम्ब फुटले नव्हते, म्हणून जसेच्या तसे तिथे ठेवण्यात आले होते. सैनिक भले कुठल्या धर्माचा, पंथाचा असो त्याच्यात श्रद्धाभाव भरलेला होता, हे मी पाहिले. तेथे जाती, पंथ आणि धर्माची वाटणी झालेली नव्हती. त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धर्म तिरंगा असतो. मी ईशान्येकडील राज्यात सीमा प्रदेशात गेलो आहे. प्रत्येक काम श्रेष्ठ हीच भावना सैन्यामध्ये मला दिसली. जंगल असेल, तर तेथे मंगल परिस्थिती ते निर्माण करतात. जमीन उजाड असेल, तरी साफसफाई करून घेतात. रस्त्यावरून जाणाऱ्या त्यांच्या गाड्या पाहा. टायरमध्ये चिखलाचा कणही दिसणार नाही. स्वयंपाक करतात तो इतका चविष्ट की, बोटे चाटत राहाल. शौर्य आणि सेवेपासून स्वादापर्यंतची अशी कमाल भारतीय सेना दाखवू शकते. सेनेकडून आपण शिकावे, असे खूप काही आहे. तिरंग्याची शान राखण्यासाठी जगणाऱ्या आपल्या सैन्याचा आपल्याला अभिमान आहे. तिरंगा ऊंचा रहे हमारा ! जय हिंद.

vijaydarda@lokmat.com

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान