- सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)गुजरातमध्ये अंतिम टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पडले. प्रचार-अपप्रचाराच्या कर्कश तोफा मंगळवारीच थंडावल्या. निकालाकडे सा-या देशाचे लक्ष आहे. १८ तारखेला तो जाहीर होईलच. तथापि गुजरातच्या प्रचारात पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि मर्यादांचे भान न ठेवता, मोदींनी आपल्या भाषणांमधे जी खालची पातळी गाठली ती त्यांच्या असहाय अगतिकतेचे दर्शन घडवणारी होती. शांततेत संपन्न होणाºया भारतातील निवडणुकांचे दाखले सा-या जगात दिले जातात. आजवर जपलेला हा लौकिक, पंतप्रधानांच्या भाषणांमुळे पार खाली आला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पाकिस्तानचा मुद्दा अधोरेखित करण्याचा अतिउत्साह मोदींनी सवयीनुसार दाखवला. माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांवर त्यात यथेच्छ चिखलफेक करीत, बेजबाबदार विधाने केली, त्यामुळे पराभवाच्या भीतीने मोदींचा तोल सुटत चालला आहे, याचीच जगभर चर्चा झाली. मनमोहनसिंगांचे व्यक्तिगत चारित्र्य, देशप्रेम याबद्दल त्यांचे शत्रूही शंका घेत नाहीत. पाकिस्तानी उच्चायुक्ताच्या अधिका-यांबरोबर गुप्त खलबते करून भारताच्या हिताला धक्का देणाºया कारस्थानी चर्चेत ते सहभागी होतील, हा विकृत कल्पनाविलास, रेटून खोटे बोलण्याची सवय असलेले भाजपचे नेते अथवा मोदीच करू शकतात. अशा कर्कश प्रचारावर देशातील सुजाण मतदारांचा किंचितही विश्वास नाही. मग पंतप्रधानांचा अशा प्रचारामागचा उद्देश काय? याचे एकमात्र उत्तर मतदारांना धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने वळवणे, इतकाच असू शकतो.देशाचे एकूण आकारमान लक्षात घेतले तर अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरात तसे छोटे राज्य. तथापि पंतप्रधान मोदींच्या राजकीय कर्तृत्वाची सारी प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलीय. वाट्टेल ते झाले तरी कोणत्याही स्थितीत विजय खेचून आणायचाच, या इराद्याने मोदींनी झपाटल्यागत प्रचार करीत अनेक सभा संबोधित केल्या. अखेरच्या काही सभांमध्ये घसा बसला. तोंडातून शब्द फुटेनात तरी बोलायचा अट्टाहास मोदींंनी सोडला नाही. त्यातच त्यांच्या प्रचाराची पातळीही खाली आली. गुजरातचा निकाल काहीही लागो, एका गोष्टीबाबत सर्वांचे एकमत आहे की, राहुल गांधींनी मोदींच्या गृहराज्यात त्यांची पुरती दमछाक केली. त्यांना इतके दमवले की अक्षरश: तोंडाला फेस आला.गुजरातबाबत मोदींना गैरवाजवी आत्मविश्वास, त्यामुळे भाजपचा प्रचार मूळ मुद्यांपासून दूर भरकटलेलाच होता. हार्दिक पटेलांच्या सेक्स सीडीचा प्रचार घडवण्यात सारे नेते इतके गुंतले की भाजपचा निवडणूक जाहीरनामाच तयार करायला विसरले. अखेर मतदानाच्या आदल्या दिवशी जेटलींच्या उपस्थितीत घाईगर्दीत तो उपचार उरकण्यात आला. राम मंदिराच्या खटल्यात कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आणि बेलगाम विधाने करण्याबद्दल, कुख्यात मणिशंकराच्या आक्षेपार्ह भाषेबद्दल भाजपने बराच हल्लाबोल केला. तथापि राहुल गांधींनी अय्यरांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे सर्वांचीच बोलती बंद झाली. याच सुमारास पंतप्रधान आणि भाजप कसे शेतकरीविरोधी आहेत, याचा पर्दाफाश करीत, महाराष्ट्रातले भाजप खासदार नाना पटोलेंनी थेट लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हा या तमाम नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. अयोध्येच्या मंदिर-मशीद वादात सिब्बल यांनी जो प्रस्ताव न्यायालयासमोर मांडला, त्यावर जाहीर सभांमधून पंतप्रधानांनी बरीच आगपाखड केली मात्र मोदी सरकारच्या राजवटीत मुस्लीम समुदाय भीती आणि दहशतीच्या छायेखाली का वावरतो आहे?विकासाचे तथाकथित गुजरात मॉडेल आणि सरकारची आर्थिक धोरणे याबाबतही पंतप्रधान आणि भाजपचा प्रचार बॅकफूटवरच होता. मोठे उद्योगपती विरुद्ध छोटे व्यावसायिक आणि शेतकरी, अशी विभाजनाची रेष राहुल गांधींनी प्रचारामध्ये आखली. भाजपची त्यात दाणादाण उडाली. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर देशाच्या अर्थकारणात उद्भवलेल्या संकटांमुळे, व्यापार उद्योगांचा प्रभाव असलेल्या गुजरात राज्यात अनेक उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले. गुजरातच्या व्यापाºयांनी आपल्या खरेदी विक्रीच्या पावत्यांवर ‘एकही भूल कमल का फूल’सारखे घोषवाक्य छापण्याचे धाडस दाखवले. हे सारे का घडते आहे? राज्याच्या प्रगतीचा आलेख खाली का आला? याची उत्तरे अर्थातच पंतप्रधानांकडे नव्हती. मग पंतप्रधान बचावात्मक पवित्र्यात बोलले की, ‘देशाच्या करपध्दतीत आमूलाग्र बदल घडवणारा वस्तू व सेवा कर लागू करण्याचे मूळ स्वप्न काँग्रेसचेच होते. फक्त अंमलबजावणीच्या पध्दतीबाबत भाजपचा त्याला विरोध होता.’ वस्तू व सेवा कराचे केवळ विधेयक मंजूर करण्यासाठी नव्हे तर त्याचे सारे श्रेय फक्त आपल्या पदरात पडावे, यासाठी मोदी सरकारने संसदेचे मध्यरात्रीचे अधिवेशन योजले. गुजरातच्या निवडणुकीत अर्थकारणातल्या या घोडचुकांचे विषय केंद्रस्थानी आले तर फजिती होईल, या भीतीने मतदारांचे लक्ष सतत अन्य विषयांकडे वळवण्याचा आटापिटा पंतप्रधान करीत होते. केंद्राच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीतला जनतेला आकर्षित करणारा एकही नवा मुद्दा ते सांगू शकले नाहीत. पंतप्रधानांच्या प्रचारमोहिमेचा प्रवास अखेर राम मंदिराच्या दिशेने सुरू झाला कारण मंदिर मार्ग हाच भाजपच्या आजवरच्या विजयाची गुरुकिल्ली ठरला आहे.‘अयोध्येतले राम मंदिर आमच्या आस्थेचा विषय आहे’, हे घोषवाक्य प्रत्येक भाजपचा नेता सतत ध्रुवपदासारखे बोलत असतो. प्रत्यक्षात खरोखर हा भाजपच्या आस्थेचा विषय आहे काय? अडवाणींच्या रथयात्रेनंतरच्या लोकसभा निवडणुकीत संसदेत भाजपच्या जागा अचानक वाढल्या तेव्हा सातत्याने हिंदुत्वाच्या देखाव्यासाठी व मतदारांचे धार्मिक ध्रुवीकरण घडवण्यासाठी, या विषयाचा वापर भाजप करीत आला आहे.
राज्य करून दमले आता सत्तेसाठी उरला फक्त मंदिर मार्ग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 2:52 AM