नारायण राण्यांना दिल्लीत नेऊन भाजपवाल्यांनी त्यांचे जे केले त्याला रामशास्त्र्यांच्या भाषेत अखेरच्या प्रायश्चित्ताखेरीज दुसरी शिक्षा नाही. पक्षाचा मोठा मेळावा भरला असताना व त्यात पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांसह भाजपचे सारे मुख्यमंत्री, मंत्री, पुढारी व नवे आशाळभूत हजर असताना तो पक्ष आपल्याला स्वानंद प्रवेश देईल या आशेने राणे दिल्लीत आले होते. हॉटेलातला मुक्काम टाकून ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या त्यांना बºयाच ज्युनियर असलेल्या पुढाºयाच्या घरी दाखल झाले. मात्र दुपारी अडीच वाजता तेथे पोहचलेले राणे रात्री साडेनऊपर्यंत अमित शहा यांची वाट पाहत ताटकळत राहिले. दानवे आणि चंद्रकांत पाटील साथीला होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यांची काही मिनिटे दखल घेण्याचे अगत्य दाखविले. मात्र आश्वासनाचा शब्द नाही की पक्षाचा साधा निरोप नाही. राणे बसून राहिले. तिकडे शहा आमदार-खासदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत रममाण होते. त्या संपवून ते राण्यांकडे जाण्याऐवजी ते कोणाचे तरी गाणे ऐकायला सरळ रवाना झाले. राणे बसूनच राहिले. पाटील आणि दानवेही एव्हाना वैतागले असणार. सात तासांचा जीवघेणा वेळ नुसतीच वाट पाहिल्यानंतर शहा एकदाचे आले आणि त्यांनी प्रथम एक इन्सुलिनचे इंजेक्शन घेतले. मग काहीतरी खात त्यांनी राण्यांची विचारपूस केली. त्यांचे म्हणणे वा मागणे ऐकून घेण्याएवढा त्यांच्याकडे वेळ नव्हता. होता तो वेळ त्यांनी राण्यांना भाजपची शिस्त व संघाची विचारसरणी ऐकविली. पुढे विमान गाठायचे म्हणून ते निघूनही गेले. दारात जमलेल्या पत्रकारांना सांगण्यासारखे काही नव्हते म्हणून राणे भुयारी मार्गाने घराबाहेर पडले. माजी मुख्यमंत्री, सेनेचे नेते आणि कोकणचे सम्राट म्हणून ज्ञात असलेल्या राण्यांचा सात तास असा अपमान करणाºया शहा यांना महाराष्ट्र कधी क्षमा करणार नाही. तसाही दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राविषयीचा आकस आहे. दिल्लीला अटीवाचूनच्या संपूर्ण शरणागतीची सवय आहे. मागणे घेऊन येणाºयांची गणना तेथे वर्गणी मागायला येणाºया दयनीयात केली जाते. त्यातून राण्यांजवळ पद नाही, पक्ष नाही, माणसे नाहीत आणि कोकणचे साम्राज्यही त्यांनी गमावल्यागतच आहे. प. महाराष्ट्रात पवार त्यांना शिरू देत नाहीत. खान्देश व मराठवाड्यातही त्यांना येता येईल अशी फारशी स्थिती नाही आणि विदर्भ? ती तर फडणवीस आणि गडकºयांची संघभूमीच आहे. अशी तोकडी ओळख आणि तुटपुंजी कमाई असणाºया राण्यांना शाह यांनी इन्सुलिन घेत वीस मिनिटात कटवले असेल तर ते त्यांच्या मग्रुरीला साजेसे पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचविणारे आहे. त्या बिचाºयाने तुमच्यासाठी काँग्रेस सोडली, तुमच्याचसाठी त्यांनी सेनेचा त्याग करून बाळासाहेब ठाकºयांचे वैर पत्करले. त्यांच्या दोन मुलांखेरीज त्यांच्या पाठीशी आता फारसे कोणी नाही. कधीकाळी सारे राज्य गाजविणाºया पुढाºयाच्या वाट्याला आजचे मागायचे दिवस आले म्हणून त्याची अशी उपेक्षा करायची काय? थांबा, महाराष्ट्राला जमले नाही तरी कोकण आणि त्यातला सिंधूदुर्ग तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. मोदी व शहांना वेळ नव्हता तरी त्या पक्षात इतरही पुढारी होते. त्यांनीही राण्यांना भेटण्याचे सौजन्य दाखविले नाही. आता सेना विरोधात, पवार विरोधात, काँग्रेस नव्याने विरोधात आणि भाजप आतून बंद. एका महत्त्वाकांक्षी माणसाची राजकारणाने केलेली ही कोंडी आहे. पण राणे साधा माणूस नाही. त्याची राजकीय ताकद ओसरली असली तरी आर्थिक शक्ती मोठी आहे. शहा यांचा बुलडोझर राण्यांकडून एक दिवस मोडला जाईल. तसे झाले नाही तर महाराष्ट्राच्या वाट्याला त्याची परंपरागत नाचक्की पुन्हा येईल, एवढेच.
अरेरे, केवढा हा अपमान... रामशास्त्र्यांच्या भाषेत अखेरच्या प्रायश्चित्ताखेरीज दुसरी शिक्षा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 3:20 AM