मंत्रालयाचा दरवाजा हे आत्महत्या करण्याचे नवे ठिकाण झाले आहे की काय, असा संशय यावा, या गतीने राज्याच्या कानाकोपऱ्यांतून येणारी अडलीनडली जनता येथे आत्महत्येचा प्रयत्न करू लागली आहे. जमिनीचा नाममात्र मोबदला मिळाला, म्हणून जानेवारीत धर्मा पाटील या धुळ्यातील ८४ वर्षीय शेतकºयाने विष पिऊन आत्महत्या केली. हे प्रकरण तापल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची तयारी सरकारने दाखवली. त्यामागे त्यांच्या कुटुंबाला न्याय देणे, हा हेतू होता. अन्य लोकांनी त्यापासून प्रेरणा घेणे, हा हेतू निश्चितच नव्हता. परंतु, त्यानंतर लासलगावचे शेतकरी गुलाब शिंगारी, कृषी अधिकारीपदाच्या परीक्षेचा निकाल लागत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेले अविनाश शेटे, सावकारी कर्जाला कंटाळलेल्या उस्मानाबादच्या अलका करंडे आणि बुधवारी जमिनीच्या वादाचा ५० वर्षांनंतर लागलेला निकाल विरोधात गेल्याने बीडच्या ७० वर्षीय राधाबाई साळुंखे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्याकडे आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. तरीही परीक्षेचा निकाल लागत नाही, येथपासून कोर्टाचा निकाल विरोधात गेला येथपर्यंत, अनेक किरकोळ कारणांकरिता जर लोकांना मृत्यूला कवटाळावे किंवा निदान तसा देखावा करावा, असे वाटत असेल तर सत्ताधारी, विरोधक आणि नोकरशहा यांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. दररोज मंत्रालयात हजारो लोक कामाकरिता येतात. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या पातळीवर जनतादरबारासारखे उपक्रम राबवूनही जर प्रश्न सुटत नसतील आणि सर्व समस्यांची उत्तरे मंत्रालयात मिळतील, अशी लोकांची भावना असेल, तर हे सरकारचे मोठे अपयश आहे. सध्या विरोधात बसलेल्यांनी लागलीच याचे राजकारण करण्याचा उतावळेपणा दाखवू नये. सध्याचे विरोधक सत्ताधारी असताना त्यांनीही अनेक प्रश्नांची सोडवणूक न केल्याने ही परिस्थिती चिघळली, हेही तेवढेच खरे आहे. सावकारीविरोधी कायदा करूनही करंडे यांना आत्मदहनाकरिता मंत्रालयापर्यंत धाव का घ्यावी लागली आणि कृषी अधिकारीपदाचा निकाल दीर्घकाळ न लागल्याने शेटे यांच्यावर तीच वेळ का आली, अशा प्रश्नांची उत्तरे सत्ताधारी भाजपाला द्यावीच लागतील. ‘अच्छे दिन’चे पिटले जाणारे ढोल ऐकून आता जनतेचे कान किटले असून आता लोकांचे छोटे प्रश्न का सुटत नाहीत? तलाठी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत खाबूगिरी का सुरू आहे? मंत्री निर्ढावलेले आणि नोकरशहा निर्धास्त, हे चित्र का आहे? या व अशा सवालांचे जबाब देण्याची वेळ सरकारवर आली आहे. मंत्रालयाच्या दरवाजात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºयांवर वेगवेगळ््या मार्गाने कोणत्याही स्वरूपाचा दबाव तर नाही ना, हेही पोलिसांनी तपासण्याची गरज आहे. एकूणच मंत्रालयात प्रवेश करण्याचे दार हे स्वर्गात जाण्याकरिता उघडणारे द्वार न ठरो, हीच अपेक्षा.
उघडले स्वर्गाचे दार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 1:21 AM