डॉ. राजेंद्र सिंह राजकीय पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी मग्न आहेत. कोणत्याच राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात पाणी, पर्यावरण किंवा जागतिक तापमान वाढीला गांभीर्याने घेण्यात आलेले नाही. राजकीय पक्ष मतांचा जोगवा मागण्यात गुंतले आहेत तर दुसरीकडे मत दान करणारेही संभ्रमावस्थेत आहेत. आजघडीला राज्यकर्ते समाजव्यवस्थेला संभ्रमित करू पाहत आहेत; आणि समाजव्यवस्थाही राज्यकर्त्यांना संभ्रमित करू पाहते आहे. महत्त्वाचे म्हणजे दोघेही एकमेकांचा घात करीत आहेत.
शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती करण्याऐवजी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे हा निवडणुकीचा मुद्दा बनू पाहत आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पर्यावरणाची हानी करणारे मत विकत घेणार आहेत. पाणी आणि हवा प्रदूषित करणारे मत विकत घेणाºयांचे काम करत आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे अवकाळी पावसाचा वेग वाढेल; आणि माती वाहत राहील. असेच होत राहिले तर पृथ्वीवरील दुष्काळ आणि महापुरांचे संकट वाढतच राहील. आणि महापूर, दुष्काळ व दिलासा देण्याच्या नावाखाली देशातला खजिना रिता होत राहील.जागतिक तापमान वाढीच्या नावाखाली नवनवीन योजना येतच राहतील आणि राज्यकर्त्यांचे खिसे भरतच जातील. राज्यकर्ते ‘नमामी गंगा’सारख्या भ्रष्टाचारी योजना आखतच राहतील. राजकीय पक्षांचे जाहीरनामे मतदारांना आकर्षित करत मतदान खेचण्याचे जाळे फेकतच जातील. जो राजकीय पक्ष अगदी सफाईने जेवढे खोटे बोलेल तेवढ्या वेगाने तो राजकीय पक्ष आपल्या मतांची कमाई करेल. आज भारतात ‘सत्यमेव जयते’चे रूपांतरण ‘झूठ मे जयते’मध्ये केले जात आहे. राजकीय पक्षच अशा प्रकारच्या कामात यशस्वी होतात; ही वस्तुस्थिती आहे.
कोणत्याच राजकीय पक्षाला भविष्यातील पर्यावरणाची चिंता नाही. संस्कृतीचे रक्षण करण्याच्या नावाखाली संघटनांनी तर मर्यादाच ओलांडली आहे. गंगेच्या संवर्धनासाठी ज्यांनी ज्यांनी आवाज उठविला; त्यांचा आवाज दाबण्यात आला आहे. त्यांचा आक्रोश ऐकला जात नाही. विरोधी पक्षही गंगेच्या शुद्धीकरणावर काहीच बोलत नाही. जे पर्यावरणाच्या नावाखाली निसर्ग जपण्याचा आव आणत आहेत; तेदेखील निवडणुकांत काही बोलण्यास तयार नाहीत. भ्रष्टाचार आणि कर्जमाफी या दोन मुद्द्यांवर आवाज उठविला म्हणजे आपले काम झाले, असा भ्रम त्यांनी करून घेतला आहे. चुकून चुकायचे आणि क्षमा मागायची; हे नेहमीचे झाले आहे. पण कर्ज काढून दिवाळी साजरी करणे हे आपल्याकडे शुभ मानत नाहीत हेच हे लोक विसरले आहेत. शेतकºयावर कर्जाचा डोंगर येणार नाही; अशी व्यवस्थाच आपल्याकडे नाही.दिल्लीसारखी राजकीय राजधानी आता प्रदूषणाने दूषित झाली आहे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातील मिठी, दहिसर, पोयसरसारख्या नद्यांचे नाले झाले आहेत. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या काशीने गंगेबाबत काहीच केले नाही. गंगेला आई म्हणतात खरे, पण त्यांनी तिचे रूपांतरण प्रदूषणात केले आहे. राज्यकर्त्यांनी गंगेला पैसा कमाविण्याचे साधन मानले आहे. पटना, पुणे, मुंबई आणि चेन्नईसारखी शहरे पुराच्या पाण्याखाली जात आहेत. राजकीय पक्षांनी असत्याचा आधार घेत आपले साध्य साध्य करण्याकडे लक्ष दिले आहे.
प्रत्येक दिवशी नव्या राजकीय पक्षाचा जन्म होत आहे. नव्या राज्यकर्त्याचा जन्म होत आहे. नवी मैदाने आणि नवे योद्धे तर आपण प्रत्येक दिवशी जन्माला घालत आहोत. मात्र जुन्या राजकीय पक्षांच्या कामावरून कोणीच धडा घेत नाही. कारण राजकारण म्हणजे आपल्या बापाची जहागिरी असल्याचे राजकीय पक्षांनी जणूकाही जाहीरच करून टाकले आहे. असत्याची कास धरून, हुजरेगिरी करून खालच्या पदावरचा नेता महान पदावर विराजमान होत आहे. आणि असत्याचा विजय होत आहे. हे सगळे सुरू असतानाच जेव्हा असत्याचा पडदा उघडा पडतो तोवर एखाद्या राजकीय पक्षाचा, राजकीय नेत्याचा कार्यकाळ संपलेला असतो.
परिणामी, पर्यावरणाची हानी दिवसागणिक वाढतच असून, आपण मात्र अशाच काहीशा बेजबाबदार लोकांवर देश चालविण्याची जबाबदारी सोपविली आहे. मात्र आता हे चित्र बदलले पाहिजे. ज्यांचे जीवन साधे आहे. जे पर्यावरणासाठी आयुष्य वेचत आहेत. अशा लोकांना, अशा पक्षांना आपण संधी दिली पाहिजे. ज्यांना खुर्चीचा मोह आहे. लालसा आहे. अशांना आपण सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. प्रदूषणाचा स्तर दिवसागणिक वाढत असून, सर्वच शहरांचा कोंडमारा होत आहे. आता राजकीय पक्षांची गरज नाही. जो कोणी पर्यावरणासाठी काम करीत आहे; त्यास मत दान करण्याची गरज आहे.
( लेखक सिंह यांना जलपुरुष संबोधले जाते )