पकोडा आणि राजकारण यांचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. पकोडा हा खायचा पदार्थ आणि राजकारण हे सत्तेचे साधन. काही लोक राजकारणात ‘खाय’साठीच येत असले तरी त्यांनी पकोडाच खायला हवा असाही काही संकेत नाही. तरीही पकोेड्याला राजकारणात अचानक महत्त्चाचे स्थान प्राप्त झाले आहे. पकोडा बनवायला लागणारे जिन्नस आणि त्याची चव देशभरात एकसारखी असली तरी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्याही दृष्टीने पकोड्याची व्याख्या मात्र वेगवेगळी आहे. सत्ताधाºयांच्या नजरेत पकोडा हा प्रगतीचे प्रतीक आहे तर विरोधकांना मात्र तो अधोगतीचे लक्षण वाटतो. यावरूनच मागच्या काही दिवसांपासून दिल्ली ते गल्ली तापलेल्या राजकारणाच्या कढईत डावपेचाचे पकोडे जोरात तळले जात आहेत. वरून खरमरीत दिसणाºया व पावसाळा सोेडला तर एरवी उपेक्षित असलेल्या या पदार्थाला रात्रभरात ‘स्टारडम’ प्रदान करण्याचे श्रेय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. देशातील बेरोजगार तरुणांनी आता 'पकोडे' तळून रोजगार मिळवावा आणि स्वाभिमानाने जगावे असा दिव्य संदेश मोदी यांनी देशाला दिला आणि त्यांच्या अनुयायांना पकोड्यांच्या कोट्यवधींच्या वार्षिक उलाढालीतून देश प्रगतिपथावर झेप घेत असल्याचे मोहक स्वप्न पडायला लागले. तेव्हापासून हा पकोडा टेशभरात ‘ट्रेडिंग’ करतोय. हा तापलेला पकोडा आता सत्ताधाºयांइतकाच विरोधकांच्याही स्वप्नात यायला लागला आहे. नोकºया-रोजगार नसल्याने बेरोजगार युवक आधीच पकोडे विकत आहेत. मग पंतप्रधानांनी नवीन ते काय सांगितले? स्टार्टअप इंडियाचा प्रवास पकोड्यावर येऊनच थांबतो का, असा या विरोधकांचा सवाल आहे. आपल्या या सवालाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विरोधक आता जागोजागी पकोडे तळत सुटले आहेत. परवा नागपुरातही विरोधकांच्या महिला सेलने पकोड्याचा ‘लाईव्ह डेमो’ दिला. प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅड. चारुलता टोकस यांच्या नेतृत्वात मपनाच्या टाऊन हॉल परिसरात विरोधाचे गरम पकोडे तळण्यात आले. एलएलबीचा फलक गळ्यात लटकवून या महिलांनी बेसनभरल्या हाताने तापलेल्या तेलात पकोडे सोडले. मनपा सभागृहाबाहेर असे पकोडे पुराण गाजत असताना तिकडे मनपाच्या आतही विरोेधकांच्या अजेंड्यावर पकोडाच होता. खुद्द पंतप्रधानांनीच पकोड्यातून प्रगतीचा मार्ग शोधण्याचा कानमंत्र दिल्याने त्यांच्या पक्षाच्या नागपुरातील वारसांनी बेरोजगारांना पकोडे तळण्यासाठी अविलंब जागा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे संदीप सहारे यांनी सर्वसाधारण सभेत दिला. अर्थात सत्ताधाºयांनी तांत्रिक कारण देत तो प्रस्ताव चर्चेला येऊ दिला नाही. पण, म्हणून पकोड्याची चर्चा काही थांबली नाही. ती दिवसागणिक वाढतेच आहे. शहराचे ‘अच्छे दिन’ येतील तेव्हा येतील पकोड्याचे ‘अच्छे दिन’ मात्र सुरू झाले आहेत.
विरोधकांचा ‘गरम पकोडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 5:26 AM