शिर्डीत विमानाची ट्रायल लँडिंग यशस्वी झाली. नगर जिल्ह्यात पहिले विमान उतरले. १ आॅक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते या विमानतळाचे आता लोकार्पण होईल. एखाद्या राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले असा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्याअर्थाने राज्य सरकारचे कौतुक केले पाहिजे.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना या विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला. त्यांनी या विमानतळाचे स्वप्न पाहिले होते. नंतर अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात २०१० मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. सुरुवातीला दोनशे कोटींचा खर्च झाल्यानंतर मध्यंतरी निधीअभावी काम बंद पडले होते. निधीसाठी आंतरराष्टÑीय स्तरावरील भागीदाराचा शोध सुरू झाला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारने आणखी शंभर कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काम पूर्णत्वास गेले. या विमानतळासाठी साई संस्थाननेही पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून दिले.नगर हा मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणारा जिल्हा. पण, येथे विमान पोहोचायला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे लागली. कोल्हापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या शहरांत विमानतळ आहे. अर्थात तेथे विमाने किती उतरतात? हा भाग वेगळा. पण, निदान सुविधा निर्माण झालेली आहे. नगर जिल्ह्यात तीही सुविधा नव्हती. शिर्डीचे विमानतळ झाले त्याचे श्रेय जिल्ह्यातील राजकारण्यांपेक्षा साईबाबांना द्यावे लागेल. कारण शिर्डीला गर्दी जमते म्हणून विमानतळ करणे अपरिहार्य बनले. नगरपेक्षाही जिल्ह्याबाहेरच्या नागरिकांना या विमानतळाची जास्त आवश्यकता होती. शिर्डीत रेल्वे यापूर्वीच पोहोचलेली आहे. आता विमान उतरले. शिर्डीतून सुरुवातीला देशांतर्गत विमानसेवा सुरू होईल. भविष्यात आंतरराष्टÑीय उड्डाणे होणार आहेत. त्यादृष्टीने धावपट्टी तयार करण्याचे काम सुरू आहे. या विमानतळासाठी कार्गो टर्मिनलची मंजुरीही घेण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात शिर्डीसोबतच नगर जिल्ह्याच्या टेकआॅफसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.विमानतळ आले, पण शिर्डी व जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणखी काही सुविधा निर्माण कराव्या लागतील. खुद्द शिर्डीतील हॉटेल व्यवसाय सध्या अडचणीत आहे. शिर्डीत मंदिराव्यतिरिक्त पर्यटनाच्या सुविधा नसल्याने अनेक भाविक साईसमाधीचे दर्शन घेऊन लगेचच परततात. त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. ग्राहकच नसल्याने आमच्या हॉटेल्सच्या खोल्या संस्थानने भाडेतत्त्वावर चालवायला घ्याव्यात असा आग्रह त्यातूनच स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी शिर्डीत लेझर शोची निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी याबाबतच्या कल्पना मांडलेल्या आहेत. मात्र, त्यादृष्टीने अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. साईबाबांच्या समाधीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. हा शताब्दी महोत्सव १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वीच शिर्डीचा कायापालट अपेक्षित होता. पण तसे घडलेले नाही. विमानतळ आल्याने नगर जिल्हा विभाजनानंतर जिल्ह्याचे नवीन मुख्यालय कोणते राहणार? यादृष्टीनेही शिर्डीकडे लक्ष केंद्रित होऊ शकते.
शिर्डी विमानतळाच्या निमित्ताने नगर जिल्ह्याच्या विकासाच्या टेकआॅफला संधी
By सुधीर लंके | Published: September 28, 2017 3:16 AM