‘विरोधासाठी विरोध’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 07:04 AM2018-08-29T07:04:00+5:302018-08-29T07:04:25+5:30
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि देशातील अनेक नेते त्या पदाचे इच्छुक असले तरी त्यापैकी राहुल गांधी वगळता दुसऱ्या कुणालाही राष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही
२०१९ च्या मे महिन्यात होणारी लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे देशाचे राजकारण तापत जाईल व त्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढत जातील. त्या अधिकाधिक धारदार व प्रसंगी विषारीही होतील. लोकसभेची निवडणूक ही आता प्रत्यक्षात पंतप्रधानांचीच निवडणूक झाली असल्याने त्या पदावर असलेले वा येऊ शकणारे नेते या आरोपांच्या फैरींचे लक्ष्यही असतील. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि देशातील अनेक नेते त्या पदाचे इच्छुक असले तरी त्यापैकी राहुल गांधी वगळता दुसऱ्या कुणालाही राष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही वा तशी प्रतिमा लाभलेली नाही. एका इंग्रजी नियतकालिकाने सर्वेक्षणात राहुल गांधी हे २७ टक्के जनतेच्या मान्यतेसह विरोधी नेत्यातील सर्वात आघाडीवर असलेले तरुण नेते असल्याचे म्हटले आहे. मोदींची मान्यता त्या नियतकालिकाने ४७ टक्के एवढी सांगितली आहे. त्यामुळे यापुढे काँग्रेसकडून मोदींवर आणि भाजपकडून राहुल गांधींवर टीकेचा भडिमार होईल हे अपेक्षित आहे. तो व्हावा आणि तसा तो होणे लोकशाहीत अपेक्षितही आहे. मात्र या टीकेत काही तारतम्य, विवेक किंवा निदान खरेपण असावे हेही त्याचवेळी अपेक्षित आहे. देशातली सगळी माध्यमे आणि प्रचाराच्या यंत्रणा त्यांच्या मालक व संचालकांसह सध्या मोदींच्या व भाजपच्या नियंत्रणात आहेत. त्यांचा पक्ष सत्तेवर आणि परिवार देशातील बहुसंख्यकांवर त्याचा हक्क सांगणारा आहे. एवढे मोठे पाठबळ मागे असताना त्यांच्याकडून राहुल गांधींवर होत असलेल्या टीकेचा सूर व त्यातले विखारीपण पाहिले की सत्ताधाºयांना त्यांच्या सत्ताकाळाची शाश्वती वाटते की नाही असा प्रश्न एखाद्याला पडावा. राहुल गांधी हे नको तशी बदनामी व टवाळी ऐकून आता राष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेले नेते झाले आहेत. मात्र अजूनही त्यांच्याविषयी केला जाणारा खोटा व दुटप्पी प्रचार पाहिला की उपरोक्त शंकाच अधिक बळावत जाते. या आठवड्यात राहुल गांधींनी इंग्लंड, जर्मनी व अन्य पाश्चात्त्य देशांचा दौरा करून तेथील भारतीयांसमोर भाषणे केली. त्यांचे एक भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटच्या सभासदांसमोरही झाले. त्या भाषणात बोलताना राहुल गांधींनी ‘भारतातील वाढते दारिद्र्य व विषमता येथील तरुणाईला आतंकवादाकडे आकर्षित करील, उपेक्षितांना गप्प राहू न देता रस्त्यावर आणील आणि सरकारचे याकडे होत असलेले दुर्लक्ष या विघटनाला जास्तीची गती देईल’ असे उद्गार काढले. त्यात खोटे वा विपर्यस्त असे काही नव्हते. शिवाय ते विदेशातील भारतीयांनाच देशाची स्थिती सांगत होते. ते देशाविषयी बोलले, राजकारण बोलले नाहीत. तरीही राहुल गांधींनी विदेशात जाऊन स्वदेशाची बदनामी केली असा कांगावा भाजपच्या प्रवक्त्यांनी आता चालविला आहे. त्या बिचाºयांना विस्मरणाचा आजार असावा. २०१४ ची निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील न्यूयॉर्क स्क्वेअरवर व चीनमधील शांघाय या शहरात जी भाषणे केली ती पूर्णपणे राजकारणी होती. त्यात काँग्रेसच्या जुन्या राजवटींवर टीका होती. डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या उत्तरकाळाचे वाभाडे होते. १९४७ नंतरची सगळी सरकारे अकार्यक्षम व भ्रष्ट होती हा प्रचार होता. राहुल गांधींच्या भाषणात देश होता, पक्ष नव्हते. द्वेषाचे राजकारण जगात दुही व विषाक्त वातावरण उभे करील याउलट गांधीजींचा विचार व प्रेमाचा संदेश जगात शांतता राखील असे ते म्हणाले. नरेंद्र मोदींवर अविश्वासाचा ठराव आणल्यानंतरही आपण त्यांना जी मिठी मारली ती याच स्नेहाची द्योतक होती असेही त्यांनी त्या भाषणात सांगितले. जगभरातील आजची अस्वस्थता भारतासह जगालाही चांगले जगू देणार नाही हा त्यांचा संदेश तर त्यांच्या विरोधकांनीही लक्षात घ्यावा असा आहे. दुर्दैव याचे की ‘विरोधासाठी विरोध आणि सत्तेसाठी वाट्टेल ते’ असे धोरण अंगिकारणाºयांकडून तशा समंजसपणाची अपेक्षा करण्यात फारसा अर्थ नसतो एवढेच.