सगळ्यांनाच २०१९ चे वेध लागले. त्यामुळे मराठवाड्याच्या फडावर गणगवळणीला सुरुवात झाली. चाळ बांधून सगळेच तयारीत होते. जुळवा-जुळव, फेरबदल, नाराजांची मोट, मनधरणी अशा एक ना अनेक वगांची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी कडक लावणीचा फेर झाला पाहिजे म्हणून यात्रा, हल्लाबोल, तिरंगा यात्रा, संविधान बचाव, अशा बतावणीला सुरुवात झाली. याचा अर्थच ढोलकीवर थाप पडताच गणगवळणीने रंग धरला म्हणजे लावणीचा कडका असेल आणि वगाचा उत्तररंग किती उत्सुकता वाढवणार, असे अपेक्षेचे मजले उंचावत आहेत. कुणाच्या इशाºयावर कोण शिटी मारतो, कोण टोपी उडवतो आणि दौलतजादा किती होते, याचीच अटकळ बांधण्यास सुरुवात झाली.शिवसेनेने औरंगाबाद, परभणी आणि नांदेडचे पालकमंत्री बदलले. सेनेसाठी औरंगाबादचा गड महत्त्वाचा आणि येथूनच मराठवाड्याची सूत्रे हलतात; पण औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांना नांदेडला पाठवले, तर नांदेडचे डॉ. दीपक सावंत यांना औरंगाबादला आणले. दिवाकर रावतेंना उस्मानाबादला पाठविले. नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला केवळ एक जागा मिळाली, शिवाय त्यांचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उघड उघड भाजपचे काम करतात. एक जागा जिंकणे ही सेनेसाठी नामुश्की होती, तर औरंगाबादेत खा. चंद्रकांत खैरे आणि रामदास कदमांमधून विस्तवही जात नव्हता.प्रारंभी अडीच वर्षे त्यांनी खैरेंची जागोजागी कोंडी केली; पण वेळ येताच खैरेंनी सगळा हिशेब चुकता करीत कदमांना नांदेडला पाठविण्यास भाग पाडले. शिवाय त्यांची नेतेपदी निवड करून उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिला. परभणीत आमदार राहुल पाटील आणि खासदार बंडू जाधव यांच्यातील उघड बेबनावामुळे दिवाकर रावतेंना बदलले. येथे रावते या दोघांमध्ये समेट घडवू शकले नाहीत. राहुल नवघरे हे आदित्य ठाकरेंच्या वर्तुळातील ओळखले जातात आणि सेनेच्या आमदार आणि खासदारांमध्येच एवढी गटबाजी आहे की, विरोधी पक्षांना येथे काही कामच नाही.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेने तुळजापुरातून सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे बीडमध्ये पक्षामधील विसंवाद उघड झाला. ‘हल्लाबोल’च्या नियोजन बैठकीत मुंबईला आणि तुळजापूरला उपस्थित असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये गैरहजर होते. येथे या यात्रेचे सगळे नियोजन संदीप क्षीरसागर या पुतण्याकडे. अजित पवारांनी या धाकट्या पातीलाच समर्थन दिले असल्याने क्षीरसागर घराण्यातील काका-पुतण्याच्या राजकारणाने रंगत आणली. आपलेच घर फोडले म्हणून जयदत्त अण्णांची नाराजी आजची नाही आणि ती उघड आहे.आज मोदी सरकार आपला पाचवा आणि या कार्यकाळाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. निवडणुका कधी, याचे उत्तर या अर्थसंकल्पातूनच मिळणार, असा अनेकांचा होरा आहे, म्हणून ढोलकीवर थाप पडली.मतदारांची मनधरणी करण्यासाठी तरी प्रारंभी सगळ्याच तंबूत ‘या रावजी, बसा भाऊजी’ ही लावणी पेश करणे सुरू झाले. पुढे सवाल-जवाब झडतील आणि धुळवड सुरू होईल.
- या रावजी, बसा भाऊजी!
By सुधीर महाजन | Published: January 31, 2018 12:42 AM