मृतदेहांच्या किडन्या आणि हृदयही ‘जप्त’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 08:00 AM2023-12-29T08:00:27+5:302023-12-29T08:01:30+5:30
एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे इस्रायल-हमास युद्ध कुठल्या टोकाला जाणार आहे, याची काहीही शाश्वती नाही.
एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे इस्रायल-हमास युद्ध कुठल्या टोकाला जाणार आहे, याची काहीही शाश्वती नाही. त्याचवेळी संपूर्ण जगाला मात्र त्याची झळ सोसावी लागते आहे. इस्रायल-हमास युद्धाच्या बाबत आता एका नव्याच चर्चेला तोंड फुटलं आहे. सात ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर अचानक हल्ला केला, त्यात जवळपास १,२०० इस्रायली माणसं ठार झाली. या ‘धक्क्यानं’ इस्रायल चवताळून उठला आणि हमासला नष्ट करण्याचा विडा त्यांनी उचलला. इस्रायलच्या हल्ल्यात रोज अनेक पॅलेस्टिनी नागरिक मारले जाण्याच्या बातम्या येताहेत; पण त्याहून हादरवून सोडणारी बातमी म्हणजे या हल्ल्यात जे पॅलेस्टिनी नागरिक मारले जाताहेत, त्यांचे मृतदेह इस्रायली सैनिक लंपास करताहेत, या मृतदेहांच्या किडन्या, यकृत, हृदय आणि त्यांचे इतर अवयव काढून घेतले जाताहेत, असा आरोप आता केला जात आहे.
यूरो-मेडिटेरेनियन ह्यूमन राइट मॉनिटर के हवाले से अल मयादीन की रिपोर्ट में कहा गया- इजराइली सेनाने ८० फिलिस्तीनियों के शव चुराकर -४० डिग्री सेलसियस के तापमान में रखा, ताकी उनके अंग निकाले जा सकें।
युरो मेडिटेरेनियन ह्यूमन राइट मॉनिटरच्या हवाल्यानं ‘अल मयादीन’ या न्यूज चॅनेलनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, इस्रायलनं अलीकडेच ८० पॅलेस्टिनी नागरिकांचे मृतदेह चोरले आणि ते उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात ठेवले, जेणेकरून हे मृतदेह सुस्थितीत राहतील आणि त्यांचे अवयव काढून घेता येतील. इस्रायलनं खरंच असे अनेक मृतदेह गायब केले असून त्यांचे अवयव काढून घेतले आहेत, या दाव्याच्या पुष्ट्यर्थ्य एक व्हिडीओही त्यांनी जारी केला आहे.
ह्यूमन राइट मॉनिटरच्या दाव्यानुसार इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांचे मृतदेह जप्त करणं ही गोष्ट ‘कायदेशीर’ आहे आणि असं ते नेहमीच करत असतात. त्यांच्या दाव्यात त्यांनी पुढे म्हटलं आहे, इस्रायलनं यासंदर्भात थेट कायदाच केला आहे. त्यानुसार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृतदेह आपल्या ताब्यात घेण्याचा आणि त्यांची विल्हेवाट लावण्याचा इस्रायली सैनिकांना कायदेशीर अधिकार आहे. हे मृतदेह नंतर इस्रायलच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिले जातात.
याआधी इस्रायलवर आणखी एक आरोप करण्यात आला होता. इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात जे पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले त्यांच्या मृतदेहांचा इस्रायलनं बुलडोझरच्या साहाय्यानं अक्षरश: चुराडा केला गेल्याचा आरोप अगदीच ताजा आहे. या आरोपाची धूळ अजून खाली बसलेली नसतानाच या नव्या आरोपानं जग हादरलं आहे. इस्रायलनं या आरोपावर अजून तरी अधिकृत खुलासा केलेला नाही.
इस्रायली डिफेन्स फोर्सचे (आयडीएफ) प्रमुख लेफ्टनंट जनरल हेर्जी हालेवी यांनी या विषयावर चुप्पी साधताना म्हटलं आहे, हमासच्या विरोधात गाझा पट्टीत सुरू असलेली लढाई अजून काही महिने चालण्याची शक्यता आहे. शहरी भागात ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे, अशा ठिकाणी हमासचे अतिरेकी सामान्य नागरिकांच्या वेषात राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी आम्हाला हल्ला करण्यात किंवा या अतिरेक्यांना तातडीनं ताब्यात घेण्यात काही प्रमाणात अडचणी येतात, त्यामुळे हमासचे सगळेच अतिरेकी मारले गेले आहेत, असा दावा आम्ही करत नाही; पण हमासच्या प्रत्येक अतिरेक्याला आम्ही वेचून वेचून ठार मारू आणि हमासचं नामोनिशाण या पृथ्वीवरून कायमचं मिटवून टाकू, हा आमचा निश्चय आहे. एक गोष्ट मात्र अगदी नक्की, हमासनं इस्रायलवर ७ ऑक्टोबरला जसा भ्याड हल्ला केला होता, तसा हल्ला ते आता पुन्हा कधीच, ना आज, ना उद्या, कोणावरच करू शकणार नाहीत. एका रिपोर्टनुसार हमासच्या हल्ल्यावरून सध्या अमेरिका आणि इस्रायल यांच्यात मतभेद आहेत. वादाचा एक प्रमुख मुद्दा म्हणजे युद्ध संपल्यावर गाझावर कोणाचा ताबा असेल? युद्ध समाप्तीनंतर गाझा आम्ही आमच्या ताब्यात ठेवू, असंही इस्रायलनं म्हटलं आहे. या गोष्टीला अमेरिकेचा सक्त विरोध आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाशीही पंगा
दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रायल आता पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा ‘ऑटोमॅटिक व्हिसा’ सिस्टीम रद्द करून प्राथमिकतेनुसार आणि गरजेनुसार ‘केस बाय केस’ व्हिसा देणार आहे. त्यावरूनही इस्रायल आणि संयुक्त राष्ट्रसंघात नवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्रायलचं म्हणणं आहे, ७ ऑक्टोबरला ज्यावेळी हमासनं हल्ला केला आणि आमचे १,२०० निरपराध नागरिक मारले गेले, त्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघ कुठे होता? त्यावेळी त्यांनी का चुप्पी साधली?