- जवाहर सरकारप्राचीन हिंदू धर्माचे ‘गुरू’ हे अविभाज्य अंग असले तरी गुरूंच्या स्मरणार्थ आषाढ महिन्यातील पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा बौद्ध आणि जैन धर्माकडून घेण्यात आली आहे. बालवयात आणि तरुणांच्या ब्रह्मचर्यकाळातसुद्धा गुरू आणि त्यांचे आश्रम किंवा पाठशाळा हे निवासी विद्यालयाचे कर्तव्य पार पाडीत असत. पण गुरुपौर्णिमा केव्हापासून अस्तित्वात आली याविषयी मात्र मतैक्य आढळत नाही. द्रोणाचार्यांसारखे गुरू कौरव, पांडवांना विशिष्ट कौशल्यात पारंगत करायचे, पण त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याची निश्चित तिथी नव्हती आणि शिक्षणाचा ठरावीक कालावधीसुद्धा नव्हता. अन्य आध्यात्मिक गुरूसुद्धा शिष्यांना त्यांच्याकडे प्रवेश देताना खुलेपणा बाळगत होते. पण बौद्ध गुरूंनी मात्र गुरुपौर्णिमेपासून ‘वर्ष’ किंवा पाली भाषेतील ‘वास’ पाळायला सुरुवात केली. त्या काळात तरुण आणि वयोवृद्ध भिक्खूंना मानवी वस्तीचा त्याग करून दूरवर गुहेत किंवा एखाद्या मठात राहावे लागायचे. पण काही अभ्यासक्रम सर्वांसाठी खुले असायचे. त्यात कुणी तप:साधना करीत तर कुणी निसर्गोपचाराचे शिक्षण घेत. गुरुपौर्णिमेला पावसाने सगळा देश व्यापलेला असायचा.बौद्ध धर्माच्या समकालीन असलेल्या जैन धर्माने चातुर्मासाची कल्पना स्वीकारली आणि ती आजतागायत कठोरपणे पाळली जाते. तीर्थंकर महावीरांनी आपले पहिले शिष्य गांधारचे गौतमस्वामी यांना दीक्षा दिली. बुद्ध परंपरेनुसार भगवान बुद्धांनी दिव्य ज्ञानाची प्राप्ती केल्यानंतर एका महिन्याने आपल्या पाच शिष्यांना उपदेश केला. ते धम्म चक्कपवत्तन सूत्त आषाढ पौर्णिमेला संपन्न झाले. ही घटना सारनाथ येथे घडली. त्यानंतर त्यांनी चातुर्मासाचा काळ मूल-गंध-कुटी येथे व्यतीत केला. तेव्हापासून बौद्ध आणि जैन धर्माचे अनुयायी चातुर्मासात मांसाहार व काही खाद्यपदार्थ वर्ज्य करतात. सिंहली लोक त्यांच्या येथील मान्सूनप्रमाणे हा काळ पाळतात. थाई जनता जुलै ते आॅक्टोबर या काळात ‘फान्सा’ पाळतात तर ब्रह्मदेश, व्हिएतनाम आणि कोरिया येथील बौद्ध या काळात स्वत:ला एका जागेत बंदिस्त करतात.या दोन धर्मांतील या परंपरा हिंदू धर्माने स्वीकारल्या, त्या धर्मांचे विचारवंत एकत्र येऊन धर्मचर्चा करीत. हे काम विद्यापीठे आणि मठात चालायचे. पूर्वी धर्माचे स्वरूप असंघटित होते. शंकराचार्यांसह अन्य आचार्यांनी धर्माला निश्चित स्वरूप दिले. ऋग्वेद आणि उपनिषदात गुरूंचा उल्लेख आदरपूर्वक करण्यात आला आहे. पण गुरुपूजा केव्हापासून सुरू झाली याचे स्पष्ट उल्लेख कुठेच आढळत नाहीत. व्यासमुनींची कथा खूप उशिरा अस्तित्वात आली. गुरुपौर्णिमेचे उदात्तीकरण वराह पुराणात आढळते. पण ते पुराणही खूप उशिरा अस्तित्वात आले. तथापि ख्रिस्तपूर्व काळात केव्हा तरी गुरुपौर्णिमा हा सण अस्तित्वात आला असावा याची ठोस कारणे सांगता येतात.
हिंदू धर्मात मठाचे अस्तित्व आढळत नाही. पण त्याने बौद्ध आणि जैन धर्मातून बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या आणि मठाची कल्पनासुद्धा मध्ययुगीन काळात स्वीकारली. चातुर्मासाचे चार महिने श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे ओळखले जात असले तरी पाऊस आणि स्थानिक गरजांचा विचार करून ते कधी-कधी तीन महिनेही असायचे. गुरूंना उपजीविकेसाठी अर्थसाहाय्याची गरज पडायची. त्यासाठी गुरुदक्षिणेची प्रथा उपयोगी पडायची. याशिवाय व्रते, जप, होम यासारख्या परंपरा तत्कालीन शिक्षण व्यवस्थेत होत्या आणि त्या आजही वेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. चौदाव्या आणि सोळाव्या शतकात भक्ती संप्रदाय आपल्या अत्युच्च स्थानावर होता. त्यामुळे हिंदू धर्माचा प्रसार सामान्य लोकांपर्यंत पोहोचला. त्या काळात सर्व जातीचे गुरू अस्तित्वात होते. त्यांच्यामुळे गुरुपौर्णिमेचे स्वरूप सर्वव्यापी होऊ शकले. आजही ते पाहावयास मिळते.गुरुकुल पद्धतीने संगीत आणि नृत्य परंपरांना बळकटी आणली. संगीत आणि नृत्य परंपरेत एकलव्याला स्थान मिळत होते की नाही यावर कधीच वाद झाले नाहीत. त्याचप्रमाणे देशात हजार वर्षे सुफी परंपराही त्याच मार्गाने सुरू राहिली. त्यांच्या खनकामध्ये शेख (मुर्शिद) हेच तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचे शिक्षण देत होते. भारतीय उपखंडात मुस्लीम समाज एवढ्या संख्येने का आहे याचे कारण सुफी परंपरेत दडलेले आढळते. संगीताच्या क्षेत्रात गुरूची जागा उस्तादांनी घेतली. पुढे पुढे गुरू-शिष्य परंपरेची जागा विसाव्या शतकात नवाब, महाराजे यांनी घेतली. त्यांचा अस्त झाल्यावर मात्र गुरू-शिष्य परंपरेस कुणी वाली उरला नाही.गुरूंच्या संदर्भात एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. राक्षसांनी आणि असुरांनी गुरूंच्या तपोवनांवर आणि गुरुकुलांवर हल्ले करून या परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आर्यपुत्रांना असुरांचा नाश करण्यासाठी हातात शस्त्र धारण करावे लागले. तसे करताना त्यांनी आपल्या साम्राज्याच्या कक्षासुद्धा विस्तारल्या. त्यासाठी त्यांना धोकासुद्धा पत्करावा लागला. पण तो वेगळा विषय आहे. पण या संघर्षामुळे स्थानिकांचा प्रभाव वाढत गेला. त्यात अखेर विजयी व्हायचे ते आर्यपुत्रच. गुरू-शिष्य परंपरा समाजात खोलवर रुजल्या. त्यामुळे वनाधारित शुद्ध भारतीय परंपरांची जागा सांस्कृतिक जीवनशैलीने घेतली. हे काम इतके निष्ठापूर्वक करण्यात आले की त्याचा प्रभाव नंतरची अनेक शतके आणि सहस्रकांतही टिकून राहिला.(आयएएस अधिकारी (सेवानिवृत्त), प्रसार भारतीचे माजी सीईओ)