शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

अन्यथा ती गांधी खून खटल्याची पुनरावृत्ती ठरेल

By admin | Published: September 13, 2016 12:34 AM

खुनी माणसाचा हातच तेवढा अपराधी असतो काय? तसे असेल तर त्याचा दोष निर्जीव पिस्तुलावर ढकलून खुनी माणसाचा हातही मोकळा करता येईल.

खुनी माणसाचा हातच तेवढा अपराधी असतो काय? तसे असेल तर त्याचा दोष निर्जीव पिस्तुलावर ढकलून खुनी माणसाचा हातही मोकळा करता येईल. खून पिस्तूल करीत नाही, हातही करीत नाही, पिस्तुल चालविणारे डोके व ते धारण करणारा माणूस तो करीत असतो. शिवाय त्या खुनाचे कारण व्यक्तीगत नसेल आणि वैचारिक असेल तर तो खुनाचा विचार करणारे व त्याचा प्रचार-प्रसार करणारेही त्या अपराधाचे भागीदार होत असतात. नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या गेल्या तीन वर्षांत झालेल्या हत्या व्यक्तीगत कारणांखातर वा कौटुंबिक वैरासाठी झाल्या नाहीत. सरकार चालविणाऱ्यांना ती कळत नसेल तर त्यांनी डोळ््याएवढेच डोक्यावरही कातडे ओढून घेतले आहे असे म्हटले पाहिजे. दाभोलकरांच्या खुनाचा खटला तब्बल तीन वर्षांनी पुण्याच्या न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात आता दाखल झाला आहे. सनातन संस्थेचा गेली दीड तपे कार्यकर्ता असलेला वीरेंद्र तावडे हा त्या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे सीबीआय या तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. त्याचे दोन सहकारी अद्याप फरार असून ते यथाकाळ सापडावे अशी अपेक्षा आहे. हीच माणसे गोविंदराव पानसरे यांच्या खुनाशीही संबंधित आहेत आणि कलबुर्गी यांच्या खुनाशीही त्यांचा संबंध असल्याचा तपास यंत्रणेचा वहीम आहे. या आरोपींनी ज्यांचे खून केले त्या तिघांशीही त्यांचे खाजगी भांडण नव्हते. त्यांच्यातील वैराचे कारण वैचारिक व श्रद्धाविषयक आहे. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी हे विज्ञानवादी, पुरोगामी, सत्यशोधनाचे पुरस्कर्ते आहेत तर त्यांचा खून करणाऱ्यांचा संबंध सनातनी म्हणविणाऱ्या एका गूढ संघटनेशी आहे. ही संघटना जी वृत्तपत्रे चालविते ती कमालीची प्रचारकी, एकांगी, प्रतिगामी, धर्मविद्वेष पसरविणारी आणि सगळ््या जुनाट श्रद्धा-संकल्पनांचे पुनरुज्जीवन करणारी आहे. तिच्या कार्यकर्त्यांनी दाभोलकरांना त्यांच्या प्रत्यक्ष खुनाआधीही अनेकदा धमक्या दिल्या आहेत. त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले आहेत. शिवाय या तीनही खुनांच्या प्रकरणात वापरले गेलेले पिस्तूलही एकाच बनावटीचे असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. सनातन या संस्थेने या आरोपींशी असलेला आपला संबंध कधी नाकारला नाही. उलट ते आमचे साधक असल्याचे तिने सांगितले आहे. जी माणसे एखाद्या संस्थेच्या विचारांशी, भूमिकांशी, श्रद्धांशी व कार्याशी वर्षानुवर्षे जुळली असतात ती जेव्हा अशी पिस्तुले चालवितात तेव्हा त्यांची डोकी रिकामी असतात आणि त्यातून त्यांच्या श्रद्धा निघून गेल्या असतात असे २१ व्या शतकातील सरकारने व त्याच्या पोलीस यंत्रणेने मानायचे असते काय? आणि त्यांना यातले खरे कारण कळत असेल तर त्यांनी आपल्या तपासाची दिशा सनातनच्या मार्गाकडे वळवायची असते की नाही? ती तशी वळत नसेल तर आताची सरकारे व त्यांच्या तपासयंत्रणा पिस्तुलांना व ती चालविणाऱ्या हातांनाच तेवढी दोषी ठरवितात व प्रत्यक्ष खुनाची कृती आयोजित करणारी डोकी व ती अंमलात आणणारी माणसे यांना निरपराध मानतात असेच म्हटले पाहिजे. कोणत्याही खुनाच्या वा खूनसत्राच्या तपासाचा याहून बावळट प्रकार दुसरा असणार नाही. हे खून ही साधी व्यक्तीगत बाब नसून तो एका वैचारिक व्यूहरचनेचा भाग आहे. त्यामागे अनेकांची डोकी, काहींचे नियोजन आणि काहींची प्रत्यक्ष कृती राहिली आहे. या सगळ््यांना जोवर या तपासाच्या कक्षेत घेतले जात नाही तोवर तो तपास पूर्ण होणार नाही आणि प्रत्यक्ष खून करणारे अडकले तरी त्या खुनामागचे खरे सूत्रधार व आयोजक त्यापासून दूर व सुरक्षितच राहतील. सध्या सुरू आहे तो तपासाचा व न्यायाचाही निव्वळ देखावा आहे. तपास यंत्रणा आणि सरकार या खुनांच्या मुळापर्यंत जोवर जात नाहीत आणि खून करणाऱ्या आरोपींच्या श्रद्धास्थानांपर्यंत म्हणजे सनातन संघटनेपर्यंत जोवर पोहचत नाहीत तोवर हा सारा जनतेच्या डोळ््यात धूळ फेकणारा, पुरोगामी विचारांचा खून पाडणारा आणि सनातन्यांच्या पुनरुज्जीवनवादाला खतपाणी घालत राहण्याचा प्रकार आहे असेच समजले जाईल. विचारांची लढाई विचारांनी करायची असते. ती जेव्हा बंदुकांनी आणि हिंसेने केली जाते तेव्हा पहिला खून पडतो तो लोकशाहीचा व कायद्याचा. धर्माचे नाव घेतले की लोकशाही व कायद्याचा खून पचविता येतो असा समज करून घेतलेल्या ज्या संघटना देशात आहेत त्यांचा बंदोबस्त करणे व असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेणे हे सरकारचे काम आहे. या कामात कुचराई करणाऱ्या सरकारांच्या अपयशामुळेच आजचा मध्य आशिया जळत असलेला आपण पाहत आहोत हे येथे लक्षात घ्यायचे. हिंसा केवळ इसीसवालेच अंगिकारतात असे नाही. त्या मार्गाने जाणाऱ्या इतर धर्मांच्याही कडव्या संघटना आहेत. त्याचे नमुने आपण आपल्या देशात याआधी पाहिले आहेत. त्यात महात्म्यांचे बळी गेलेलेही आपल्याला दिसले आहेत. सबब हा तपास गोळी झाडणाऱ्यांपाशी न थांबता त्यांना तो करायला लावणाऱ्यांपर्यंत गेलेला व त्यातली खरी आयोजकशक्ती न्यायासनासमोर हजर करण्यासाठी होत आहे हे जनतेला दिसले पाहिजे. अन्यथा ती पुन्हा गांधीजींच्या खून खटल्याचीच पुनरावृत्ती ठरेल.