- राजीव तांबेबालसाहित्याचे किंवा साहित्याचे नेमके प्रयोजन काय? मुलांना शिकविणे, उपदेश करणे, तात्पर्य सांगणे, संस्कार करणे किंवा त्यांना घडविणे हे तर नव्हे आणि नव्हेच. बालसाहित्याचं प्रयोजन आहे, मुलांना दृष्टी देणं आणि मुलांना आनंद देत त्यांच्या विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणं. बालसाहित्य हे मुलांना शिकवत नाही, तर शिकण्याच्या अनेकानेक पद्धती, विविध पर्याय मुलांसमोर सहजी उलगडून ठेवत आणि मुलाला त्याच्यातील सूप्त शक्ती व सर्जनशीलता यांची जाणीव करून देतं. कारण बालसाहित्याचा पाया हा ‘मुलांना गृहित धरणे’ हा नसून ‘मुलांवरचा अपार विश्वास आणि मुलांवर निरपेक्ष प्रेम’ हा आहे.आज मुलं खरंच वाचतात का, याचं उत्तर हो आणि होच आहे, पण प्रश्न असा आहे की, मुले वाचताना पाहतात का? ऐकतात का? आणि वाचनानुभव सोबत घेऊन जगतात का? आज कुठलीही साहित्यकृती यशस्वी होत आहे, असे दिसू लागले की, तिच्यावर विविध माध्यमांतून बाजारू आक्र मण होते. उदाहरण घ्यायचे झाले, तर हॅरी पॉटरच्या पुस्तकांची तडाखेबंद विक्र ी होऊ लागली आणि काही काळातच हॅरी पॉटरचे सिनेमे जगातल्या सर्व भाषांत झळकू लागले. त्याला पूरक म्हणून मुलांच्या टी शर्टवर, पेनावर, चॉकलेटवर हॅरी पॉटर चमकू लागला आणि याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे सगळ्या वाचकांना वाचताना एकच एक हॅरी पॉटर दिसू लागला. वाचताना ‘आपला हॅरी पॉटर’ पाहण्याची क्षमताच दुबळी झाली. वाचताना मी काय पाहायचं हे आता इतरच ठरवू लागले. आपला हॅरी पॉटर ठरवताना जी कल्पनाशक्ती रमेनाशी झाली.मुलांना जसे वेगवेगळे साहित्य प्रकार वाचायला मिळायला हवेत, तसेच वेगवेगळे प्रकार लिहायलाही मिळायला हवेत. शाळेत मुलांना खूपच चाकोरीबद्ध लेखन करावं लागतं. ठरलेल्या पद्धतीनेच निबंध लिहिणे. विशिष्ट प्रकारेच कवितेचे रसग्रहण करणे किंवा टिपा लिहिणे. काही वेळा तो त्या सिस्टीमचा एक भागही असतो, पण सततची चाकोरी ही सर्जनशीलतेला कमालीची मारक ठरते. मग कोवळ्या वयातच मुलांची सर्जनशीलता कठोरपणे ठेचली जाते आणि त्यांचे शिस्तबद्ध सैनिकांत रूपांतर होते.प्रत्येक शाळेत महिन्यातून किमान दोन तासिका जरी ‘मुलांच्या सर्जनशील उपक्रमांसाठी’ राखून ठेवल्या तरी खूप फरक पडू शकेल. यावेळी मुलांना पुस्तकाबाहेरचं शिकणं निर्भयपणे अनुभवता आलं पाहिजे. ‘निर्भयपणे’ म्हणजे या तासिकांच्या वेळी मुलांना ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्यही असावे. या दोन तासिकांच्या वेळी मुले त्यांना जे पाहिजे ते लिहितील, वाचतील, चित्र काढतील किंवा त्यांना जे काही सांगायचं असेल, ते वर्गासमोर मोकळेपणाने मांडतील, पण या तासिकांचा अभ्यासक्र म मात्र तयार करायचा नाही.प्रत्येक वर्गाची भित्तीपत्रिका (वॉल पेपर) जरी सुरू केली, तरी त्यावर मुलांना त्यांच्या आवडीचं त्यांच्या पद्धतीने लिहिता येईल. जेव्हा मुले लेखनाच्या वेगवेगळ्या प्रकारातून स्वत:ला व्यक्त करू लागतील किंवा आपल्या मनातील विचार आपल्याच भाषेत मांडण्यासाठी अनेकानेक अभिनव प्रकार शोधू लगतील, तेव्हा साहजिकच मुले साहित्यातील विविध प्रकार वाचण्यासाठी उद्युक्त होतील.रवींद्रनाथांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या ‘सहज पाठ’ या तीन पुस्तिका लिहिल्या. त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगालमधील प्रत्येक मुलाच्या हे सहज पाठ, तोंडपाठ आहेत, ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे, तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून. हे सहज पाठ म्हणजे ‘शरीर शिक्षणाचे, पण आत्मा म्हणजे गाणी, गोष्टी, कविता, संगीत व गमती-जमती.’ मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं शरीराशी नाही, याची रवींद्रनाथांना जाणीव होती. मुले गोष्टी वाचत, गाणी म्हणत, गमती-जमती करत कधी शिकली हे त्यांना कळतंच नसे. केवळ मनोरंजन नाही, तर ‘करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे’ असा त्यांचा दृष्टिकोन होता.मला इथे एक कल्पना सुचवाविशी वाटते. ‘जगातले सर्वश्रेष्ठ बालसाहित्य त्या-त्या वयोगटाचा विचार करून एकत्रितपणे प्रकाशित करायला हवं.’ इतर भाषांत व वेगवेगळ्या देशात काय-काय मजा आहे, हे मुलांना समजायलाच हवं. निवडक बालसाहित्याचा १00 पुस्तकांचा एक संच करायला हवा. किंबहुना जागतिक बालसाहित्याची एक वेबसाइट तयार व्हायला हवी. त्याला निश्चितच उत्तम प्रतिसाद मिळेल. सांगा कधी करू या सुरुवात? म्हणजे मग खºया अर्थाने ‘वाचनातून शिक्षण आणि शिक्षणातून वाचन’ नक्की सुरू होईल.(बालसाहित्यिक)
पुस्तकाबाहेरचे शिक्षण मुलांना निर्भयपणे शिकता यावे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 4:45 AM