बॅडमिंटन खेळातील दुहेरी प्रकारातील विशेषज्ञ खेळाडू म्हणून ख्यात असलेल्या ज्वाला गुट्टाने पुन्हा एकदा पद्म पुरस्कारांच्या वादाचे मोहोळ उठवून दिले आहे. गत काही वर्षांपासून अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांनाही वादाची लागण झाली आहे. जवळपास दरवर्षीच एक तर एखाद्या पुरस्कारार्थीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते किंवा मग एखादी पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती पुरस्कार देण्याच्या प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. यावर्षी ज्वालाने पुरस्कारांसाठी निवड करण्याची प्रक्रिया पिंजऱ्यात उभी केली आहे. जे देशातील सर्वात प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार आहेत, त्या पुरस्कारांसाठी आवेदन करावे लागण्यावर ज्वालाला आक्षेप आहे, असे तिच्या ‘फेसबुक पोस्ट’वरून दिसते. यापूर्वी बॅडमिंटनमधील भारताची सर्वात वलयांकित खेळाडू असलेल्या सायना नेहवालनेदेखील पद्म पुरस्कारांवर टीकास्त्र डागले होते. भारत विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा देश आहे. त्यामुळे सायना नेहवाल असेल, ज्वाला गुट्टा असेल वा आणखी कुणी असेल, त्यांना पद्म पुरस्कारांच्या निवडप्रक्रियेवर टिप्पणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही. पण मुद्दा हा आहे, की यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आणि यादीत स्वत:चे नाव नाही हे बघितल्यानंतरच, पद्म पुरस्कारांची निवडप्रक्रिया योग्य वा पारदर्शी नसल्याचा साक्षात्कार का होतो? तो तत्पूर्वीच का होत नाही? आता ज्वाला गुट्टाचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास तिने पुरस्कारासाठी रीतसर आवेदन केले होते आणि पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या यादीत आपले नाव नाही, हे दिसल्यानंतर आवेदन मागविण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्वालाला जर या प्रक्रियेबद्दल एवढाच आक्षेप होता, तर तिने आवेदनच करायचे नव्हते आणि मग प्रक्रियेवर टीका करायची होती. तसे केले असते तर तिच्या प्रतिक्रियेला उद्देश चिकटवता आले नसते. ते न करता पुरस्कार जाहीर होईपर्यंत प्रतीक्षा केल्यामुळे, द्राक्ष आंबट असल्याची प्रतिक्रिया उमटत असेल, तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल. अर्थात अलीकडे पद्म पुरस्कार, विशेषत: पद्मश्री, त्यांची प्रतिष्ठा, चमक गमावू लागले आहेत, हे नाकारता येणार नाहीच! त्यासाठी कारणीभूत आहे ती पुरस्कारांसाठी झालेली काही विशिष्ट व्यक्तींची निवड आणि भविष्यकालीन राजकीय नफा-नुकसान विचारात घेऊन पुरस्कारार्थींची निवड करण्याची मानसिकता! ‘सिझरची बायको संशयातीतच असायला हवी’, अशी म्हण इंग्रजी भाषेत आहे. ती पद्म पुरस्कारांना तंतोतंत लागू पडते. जवळपास प्रत्येकच क्षेत्र भ्रष्टाचाराने लडबडले जात असताना, किमान काही क्षेत्र तरी त्यापासून अलिप्त राखली गेलीच पाहिजेत. देशातील सर्वोच्च बहुमानांमध्ये समावेश होणाऱ्या पद्म पुरस्कारांचा अशा क्षेत्रांच्या यादीमध्ये समावेश असायलाच हवा. त्यासाठी या पुरस्कारांची निवडप्रक्रिया अत्यंत पारदर्शी करणे अत्यावश्यक झाले आहे; अन्यथा दरवर्षी पद्मपुराण सुरूच राहील. देशाच्या प्रतिष्ठेसाठी ते योग्य नव्हे!
पद्मपुराण!
By admin | Published: January 29, 2017 11:14 PM