दिवाकर देशपांडे, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
मंगळवारी, २२ एप्रिलला पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीरविषयक ३७० कलम रद्द झाल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला आहे. ३७० कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात आली, त्यामुळे स्थानिक काश्मिरी जनतेकडून होणारी दहशतवादी कृत्ये बंद झाली. शिवाय सीमेपलीकडून येणाऱ्या दहशतवाद्यांना मिळणारा स्थानिक आसरा व मदतही बंद झाली. त्यामुळे दहशतवाद्यांची घुसखोरी होत असली, तरी नागरी भागातील हल्ले बंद झाले. गेल्या काही वर्षांत काश्मीरच्या पहाडी व जंगल भागाचा आसरा घेऊन पाकिस्तानी दहशतवादी भारतीय काश्मीरमध्ये घुसखोरी करत होते. पण उघडपणे नागरी भागात येऊन त्यांना फार मोठे हल्ले करता आले नाहीत. बहुतेक वेळा त्यांची भारतीय सुरक्षा दलांशी चकमक होत असे. यात अनेकवेळा भारतीय सुरक्षा दलांचे जवान शहीद झाले, पण दहशतवादीही मोठ्या प्रमाणात मारले गेले.
३७० कलम रद्द केल्यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये मोठा असंतोष आहे, हे जगाला दाखवून देण्यासाठी ज्या दहशतवादी कारवाया करणे आवश्यक होते, त्या कारवाया पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना करता आल्या नाहीत. गेली पाच वर्षे काश्मीरमध्ये त्यामुळे पर्यटन बहरास आले आणि स्थानिक लोकांना नियमित रोजगारही मिळू लागला. ३७० कलम रद्द केल्यानंतर भारताने काश्मीर प्रश्नावर पाक सरकारशी अधूनमधून होणारी चर्चाही बंद केली. ‘सार्क’सारख्या जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानबरोबर बसणेही बंद केले. पाकिस्तान जागतिक घडामोडींमध्ये एकाकी पडला. हे एवढ्यावरच थांबले नाही. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात बलूची बंडखोर आणि तहरीक- ए- तालिबानी यांचे हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातही असंतोष वाढत आहे.
विशेषत: बलूचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेसवर बलूची बंडखोरांनी हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराची हताशा उघडकीस आली. पाक जनता तेथील लष्कराच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित करू लागली. देशांतर्गत राजकारणात लुडबुड करणारे, इम्रान खान यांना कैदेत टाकणारे, टीका करणाऱ्या पत्रकारांना बेपत्ता करणारे पाकिस्तानी लष्कर बंडखोरांसमोर मात्र गुडघे टेकत आहे, अशी प्रतिमा निर्माण झाली आणि लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांची विश्वासार्हताच धोक्यात आली. बलूची बंडखोरीला तसेच अफगाण तालिबानबरोबरच्या तणावाला तोंड देण्याचे जे आततायी लष्करी उपाय त्यांनी योजले, त्याला राजकीय वर्तुळातून पाठिंबा तर मिळालाच नाही, पण वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडूनही विरोध झाला.
लष्कराच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे सुचवले, अशीही बातमी होती. आसिफ यांच्यावरचे दुसरे संकट म्हणजे अमेरिकन काॅंग्रेसच्या काही सदस्यांनी तेथील सभागृहात ‘पाकिस्तान डेमोक्रॅटिक ॲक्ट’ नावाचे विधेयक मांडून आसिफ मुनीर यांच्यावर निर्बंध लादण्याची मागणी केली होती. पाकिस्तानचे सर्वेसर्वा मानल्या जाणाऱ्या लष्कर प्रमुखाविरुद्ध असे विधेयक येणे ही नामुष्कीची गोष्ट आहेच, पण त्यातून अमेरिकन प्रशासन मुनीर यांच्या देशांतर्गत धोरणाला सरळ विरोध दर्शवत आहे, हे स्पष्ट होते. अमेरिकेतल्या पाकिस्तानी जनसमुदायाच्या दबावामुळे हे विधेयक आले होते.
गेल्या काही दिवसांत पाक लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांची प्रतिमा पाकिस्तानात चांगलीच काळवंडली आहे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी परदेशस्थ पाकिस्तानी नागरिकांची बैठक बोलावून त्यात भाषण केले आणि आपण बलूच बंडखोरी सहज चिरडून टाकू, अशी वल्गना केली. काश्मीर ही पाकिस्तानची प्राणवाही नस आहे, असेही म्हटले. तेवढ्याने त्यांची प्रतिमा उजळणार नव्हती. काश्मीरमध्ये काही तरी धमाकेदार घटना घडवून आणणे आवश्यक असल्यानेच ही पहलगामची घटना घडली आहे. जवळपास २८ पर्यटक मारले गेल्यामुळे या घटनेला जगात मोठी प्रसिद्धी मिळाली, शिवाय पाक जनतेचे लक्ष अन्यत्र वळवणे शक्य झाले आहे.
आता दहशतवादी याच प्रकारचे हल्ले करण्याचा प्रयत्न करतील. परिणामी, काश्मीरमधील पर्यटन ठप्प होऊन पुन्हा बेरोजगारी आणि स्थानिक असंतोषाची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे दहशतवाद्यांविरुद्ध परिणामकारक उपाययोजनेबरोबरच देशांतर्गत क्षोभ शांत करणेही भारताला जरुरीचे आहे. त्याचा एक उपाय म्हणजे पाकिस्तानला ‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे! पण आता सर्जिकल स्ट्राइकसारखे मार्ग उपयोगाचे नाहीत, कारण पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणाही सुसज्ज असेल. भारतही लगेच, घाईने पाकला प्रत्युत्तर देण्याची शक्यता कमी आहे. भारताला आता वेगळा अनपेक्षित असा मार्ग या प्रत्युत्तरासाठी निवडावा लागेल. त्यासाठी भारताकडे अनेक साधने आहेत. पाकला जबर धक्का देताना भारतावर होणारे दुष्परिणाम किमान असतील, याची काळजी घ्यावी लागेल. सध्या तरी भारताला पाकशी सर्वंकष युद्ध नको आहे. त्याचा फार फायदाही होण्याची शक्यता नाही. त्यामुळे युद्धाकडे न जाणाऱ्या पण पाकिस्तानला हादरवून टाकणाऱ्या उपायावर भारताची सुरक्षा यंत्रणा सध्या विचार करत असणार. हा उपाय येत्या वर्षभराच्या कालावधीत पाक बेसावध असताना कधीही होऊ शकतो. तेवढा अवधी भारताच्या सुरक्षा यंत्रणांना देणे आवश्यक आहे.
diwakardeshpande@gmail.com