- रवी टाले(कार्यकारी संपादक, लोकमत, जळगाव)
पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान इम्रान खान यांची बेगम बुशरा बिबीचे ‘तोटके’ही अखेर कामी आले नाहीत आणि त्यांना पायउतार व्हावेच लागले. पद सोडण्यापूर्वी इम्रान खान यांना उपरती झाली की काय माहीत नाही; पण त्यांनी अखेरच्या काही दिवसांत भारताचे बरेच गुणगान केले. भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र आहे, भारतीय पारपत्राचा जगात आदर केला जातो, अशा आशयाची वक्तव्ये त्यांनी केली; त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले. पाकिस्तानची खरी समस्या हीच आहे.भारताची प्रत्येक बाबतीत खिल्ली उडविण्यातच पाकिस्तानी नेत्यांना मोठेपण, शौर्य वाटते. पाकिस्तान शस्त्रास्त्रांसाठी कधी अमेरिकेपुढे, तर कधी चीनपुढे तोंड वेंगाडतो अन् भारताने स्वबळावर विकसित केलेल्या तेजस लढाऊ विमानाला समोसा म्हणून हिणवतो! स्वत: साधे रॉकेट बनवू शकत नाही; पण भारताची चंद्रयान-२ मोहीम अंशतः अपयशी ठरली की, पाकिस्तानला जणू काही स्वत: मंगळावर अवकाशवीर धाडल्यागत आनंद होतो! प्रत्येक पाकिस्तानी नेत्याने भारतद्वेषाच्या निखाऱ्यांवर फुंकर घालण्याचेच काम केले. तसे करून त्यांनी भारताच्या प्रगतीमध्ये अवश्य थोडाफार खोडा घातला; पण भारतापेक्षा किती तरी अधिक नुकसान पाकिस्तानचेच झाले! आज भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे यशस्वी वाटचाल करीत आहे अन् पाकिस्तान हातात कटोरा घेऊन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे.जगात असे बरेच देश आहेत, ज्यांना ‘रोग कंट्री’ किंवा ‘बनाना रिपब्लिक’ म्हणून ओळखले जाते. अशा देशांमध्ये कशाही अंतर्गत घडामोडी सुरू असल्या तरी जग त्याची फार चिंता करीत नाही. पाकिस्तानची आजची अवस्था तशीच आहे; पण दोन गोष्टींमुळे पाकिस्तानात काय सुरू आहे, याची दखल उर्वरित जगाला घ्यावीच लागते. त्यापैकी एक म्हणजे पाकिस्तानचे वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान आणि दुसरी म्हणजे पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रे! पश्चिमेला तेलसंपन्न इराण व त्यापलीकडे इतर तेलसंपन्न अरब देश, वायव्येला अफगाणिस्तान व त्यापलीकडे सोविएत रशियातून फुटून निघालेले मध्य आशियाई देश, ईशान्येला अमेरिकेला आव्हान देत असलेला चीन, पूर्वेला अण्वस्त्रसज्ज भारत आणि दक्षिणेला अरबी समुद्र! या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे जगातील कोणताही प्रमुख देश पाकिस्तानातील घडामोडींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानने चोरट्या तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेली अण्वस्त्रे! पाकिस्तान गत काही वर्षांत दहशतवाद्यांचे नंदनवन बनला आहे. त्यामुळे पाकिस्तानी अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा मोठाच धोका जगाला भेडसावत आहे. त्यामुळेही भारत, अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, युरोपियन महासंघ वा इतर कोणताही मोठा देश पाकिस्तानातील घडामोडींकडे कानाडोळा करू शकत नाही. स्व. अटलबिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते, की तुम्ही तुमचे मित्र निवडू शकता, शेजारी नाही! त्यांनी वस्तुस्थितीवर नेमके बोट ठेवले होते. भारताने पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे वेळोवेळी प्रयत्न केले; पण प्रत्येक वेळी थोडीफार प्रगती झाली, की त्याला पाकिस्तानातून सुरुंग लागतो. गत काही वर्षांपासून तर संबंध अगदी गोठले आहेत. त्याला इम्रान खान यांची कट्टर मोदीविरोधी भूमिकाही बव्हंशी जबाबदार होती. विद्यमान पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे त्यांच्या पूर्वसुरींच्या तुलनेत भारतासंदर्भात थोडी मवाळ भूमिका बाळगतात. त्यामुळे इम्रान खान यांच्या उत्तराधिकाऱ्याने पुढाकार घेतल्यास आगामी काळात उभयपक्षी संबंधांमध्ये निर्माण झालेला बर्फ वितळण्याची अपेक्षा करता येईल. त्यासाठी भारताच्या विरोधात दहशतवादाचा वापर करण्याची भूमिका मात्र पाकिस्तानला त्यागावी लागेल. शिवाय पाकिस्तानशी संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नांवर भारतातील विद्यमान राजवटीचा कट्टर पाठीराखा मतदार कशी प्रतिक्रिया देतो, यावरही बरेच काही अवलंबून असेल.कधीकाळी लाडके बाळ असलेल्या पाकिस्तानला अमेरिकेने कधीच वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यालाही काही प्रमाणात इम्रान खान जबाबदार आहेत. पाकिस्तानलाही स्वतंत्र परराष्ट्र धोरण असावे म्हणून की काय कोण जाणे, पण इम्रान खान यांनी अमेरिकेकडे कानाडोळा करून चीनसोबतच्या संबंधांना जास्त महत्त्व दिले. मध्यंतरी तर त्यांनी रशियालाही साद घालून बघितली. वस्तुतः ही स्वतंत्र परराष्ट्र धोरणापेक्षा भारताच्या क्रियेवरील प्रतिक्रिया जास्त होती. भारत-अमेरिका संबंध वृद्धिंगत होत आहेत, म्हणून आपण चीन व रशियाकडे झुकावे अशी! जोपर्यंत रशियाला अफगाणिस्तानात रस होता, तोपर्यंत रशियाच्या विरोधात एका मोहरा म्हणून अमेरिकेला पाकिस्तानची गरज होती. आता रशियाचा अफगाणिस्तानातील रस संपला आहे आणि त्या देशाने युक्रेनशी युद्ध छेडले आहे. स्वाभाविकच अमेरिकेनेही तूर्त युक्रेनकडे लक्ष वळवले आहे. मात्र, चीनमुळे अमेरिका पाकिस्तानकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष कधीच करू शकणार नाही. पाकिस्तान आज जणू काही चीनचा मांडलिक बनला आहे. दोघेही अण्वस्त्रसज्ज आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका म्हणजेच `सीपेक’च्या माध्यमातून चीन थेट अरबी समुद्रात बस्तान मांडू बघत आहे. ही वस्तुस्थिती अमेरिकेला पाकिस्तानकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष कधीच करू देणार नाही.इम्रान खान यांच्या राजवटीत चीन-पाकिस्तान संबंधही ताणले गेले होते. `सीपेक’ प्रकल्पास हवी तशी गती मिळत नसल्याने, पाकिस्तानात कार्यरत चिनी मनुष्यबळावर होत असलेल्या प्राणघातक हल्ल्यांमुळे आणि पुरेशी सुरक्षा पुरविण्यात इम्रान खान प्रशासन अपयशी ठरल्याने चीन अस्वस्थ झाला होता. त्यामुळे इम्रान खान यांची गच्छंती एक प्रकारे चीनच्या पथ्यावरच पडेल.भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तान अमेरिकेसाठी जेवढा महत्त्वपूर्ण होता, त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने चीनसाठी महत्त्वाचा आहे. युद्धाच्या स्थितीत भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया हे `क्वाड’चे सदस्य देश प्रशांत व हिंद महासागरात कोंडी करून चीनचा इंधन पुरवठा खंडित करू शकतात. `सीपेक’च्या माध्यमातून चीनने त्यावरील पर्याय शोधला आहे. त्यामुळे चीन पाकिस्तानवरील पकड सैल होऊ देणार नाही, हे निश्चित आहे. उर्वरित जगासाठी पाकिस्तानी अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा धोका हा सर्वांत गंभीर आहे. त्यामुळे पाकिस्तानात काय घडत आहे, यावर उर्वरित जगाचीही बारीक नजर सदैव असेल. पाकिस्तान हे अशा रीतीने संपूर्ण जगासाठीच अवघड जागेवरचे दुखणे होऊन बसले आहे! ravi.tale@lokmat.com