पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार श्रीनिवास वनगांच्या रूपाने घोषित करून व त्याचा अर्ज भरून आघाडी घेतली आहे. भाजपाने शिवसेनेचाच कित्ता गिरवून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना ‘हायजॅक’ करून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दामू शिंगडांना पुन्हा एकदा उमेदवारीचे बाशिंग बांधायचे ठरविले आहे, तर डाव्यांनी उमेदवारीची माळ गेहलांच्या गळ्यात घालायचे निश्चित केले आहे. एके काळी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे केडर बांधण्याला सर्वच राजकीय पक्ष महत्त्व आणि प्राधान्य द्यायचे. आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे हे अत्यंत हीन समजले जायचे. तर पक्षनिष्ठा ही सर्वोच्च होती, परंतु काळासोबत मूल्येही बदलतात. विशेषत: राजकारणातील मूल्ये झपाट्याने बदलतात, त्याचाच हा परिणाम असावा. संधीसाधूपणा हे आजच्या राजकारणातले सर्वांत मोठे मूल्य ठरले आहे. तुम्ही जेवढ्या जास्त पक्षांत फिरून आलात, तेवढी तुमची ज्येष्ठता मोठी असे समजण्याचा हा काळ आहे. त्यामुळेच अशी राजकीय दलदल बनते, परंतु याला केवळ उमेदवारीचे बाशिंग गुडघ्याला बांधणारे बाशिंगवीरच जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही. पक्षांतर्गत गटबाजी निर्माण होऊ देणारे व तिला गांधारी होऊन खतपाणी घालणारे राजकीय पक्षही तेवढेच जबाबदार आहेत. ज्या पक्षाने सत्ता आणि पदे दिली, त्याचा त्याग करावा, असे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना का वाटते? तर त्यांची पक्षात होणारी गळचेपी आणि उपेक्षा यामुळे. यातूनच असंतोष खदखदू लागतो आणि त्याची परिणती शेवटी होते, ती त्यांना प्रतिपक्षाने योग्य वेळी गळाला लावण्यात व त्यांनी स्वपक्षाचा त्याग करण्यात. त्यामुळे हे दुष्ट चक्र टाळायचे असेल, तर राजकीय पक्षांनी अधिक जागरूक होण्याची गरज आहे. शेवटी पक्ष म्हणजे काय? तर त्यातील नेते आणि कार्यकर्ते. तेच जर पक्षाचा त्याग करू लागले, तर पक्ष उरेल कसा? काँग्रेसने प्रादेशिक नेत्यांची उपेक्षा केली. त्यातून त्यांच्या ताब्यातून एकेक राज्य निसटून गेले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी, महाराष्टÑात शरद पवार अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. भाजपालाही अशीच लागण झाली आहे. त्यामुळेच श्रीनिवास वनगांना शिवसेनेच्या वळचणीस जावेसे वाटते, तर राजेंद्र गावितांना काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे भाजपाची साथ धरावीशी वाटते. असेच झटके व फटके सर्वच पक्षांना बसताहेत, परंतु त्यातून धडा शिकण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळेच आयाराम-गयाराम यांचे महत्त्व वाढते. पालघर मतदार संघात याचेच दर्शन झाले. मतदारराजाही हे सारे उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे, यासारखे दुर्दैव नाही.
पालघरमधील रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 4:32 AM