अमळनेरच नाही तर परिसराला संजिवनी देणारा आणि तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पाडळसरे धरणाच्या नावाने अनेक वर्षापासून केवळ राजकारण केले जात आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील राजकीय नेत्यांचे राजकारण सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा आणि त्यासाठी काही हालचाल तरी व्हावी, यासाठी आता गुरुवार ५ एप्रिल रोजी जल आंदोलन समितीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात अमळनेर तालुक्यातील अनेक संघटना सहभागी होणार आहेत. सर्व संघटना आणि सामान्य जनताच या मोर्चात येणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता कुणी किती निधी आणला आणि आणला जाणार आहे, याचा हिशोब मांडायला सुरुवात झाली आहे. पाडळसरे धरणामुळे एकूण ५४९३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ५१९३६ हेक्टर तर धुळे जिल्ह्यातील ३०३५ हेक्टर जमीन ओलीताखाली येईल. या प्रकल्पाचा अमळनेरसह चोपडा, धरणगाव, पारोळा, धुळे, शिंदखेडा या तालुक्यांंना लाभ होणार आहे. १९९७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेला हा प्रकल्प प्रत्यक्षात दोन वर्षानी म्हणजे १९९९ मध्ये सुरु झाला. तेव्हापासून या प्रकल्पाला निधीची कमतरता आणि राजकीय घरघर लागली ती अजूनही संपलेली नाही. धरणावरुन अमळनेरात विधानसभेच्या निवडणुका दरवेळी लढल्या गेल्या पण धरणाचे काम आहे तिथेच आहे. धरणाचा सन २०१३ पासून केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेचा प्रस्ताव दिल्ली दरबारी पडून आहे. मात्र गेल्या चार वर्षात कुठलीच हालचाल झाली नाही. राजकारण तेवढे तापत राहिले. जल आयोगाची मान्यता मिळाल्यास पाडळसरे धरणासाठी निधीचा मार्गही मोकळा होणार आहे. निधी मिळाल्यानंतर धरणाचे काम पूर्ण होण्यास कमीत कमी पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे. पण जोपर्यत जल आयोगाची मान्यता मिळणार नाही, तोपर्यत पंतप्रधान सिंचन योजनेत या प्रकल्पाचा समावेश होणार नाही. मध्यंतरी काही निधी आला तो वित्तीय कामासाठी आलेला आहे. दुसरीकडे प्रकल्पाच्या उपसा योजनांसाठी सव्वा सहाशे कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा निधी आल्यानंतर प्रस्तावित आराखडा तयार करण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागेल. धरणाच्या गेटची डिझाईनही बदलण्यात आली आहे. या गेटच्या संकल्प चित्रालासुद्धा मान्यता नाही. इतका हा प्रकल्प सध्या मागे पडला आहे. प्रकल्प मागे पडला असला तरी यावर राजकारण मात्र सुरु आहे. राजकीय नेते निधी आणल्याचा आव आणत धरण दोन वर्षात पूर्ण करु, अशी फुशारक्या मारीत आहेत. पण विरोधक त्यास अप्रत्यक्षपणे विरोध करीत आहेत. कारण पाडळसरे धरणाचे काम पूर्ण झाल्यास अमळनेरसाठी मग कुठलीही समस्या नसेल. त्यामुळे निवडणुकीसाठी कुठलाच मुद्दा नसेल. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांची इच्छाशक्ती आज तरी नाही कारण त्यांना पुढील वर्षी याच मुद्यावर निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे आता जनतेनेच पुढाकार घेतला आहे. जनतेचा हा आवाज दिल्लीपर्यंत नक्कीच पोहचेल... अशी आशा करू या...
पाडळसरेचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 7:50 PM