पाचा मुखी परमेश्वर असे आपण म्हणतोच. पांडवांची संख्या पाचच. गावकी चालविणारे मुखंडही पंच म्हणजे पाचच आणि पोलिसाना सतत ज्यांची गरज भासत असते, तेही पंचच. पण एव्हढेच कशाला, ज्यांना प्रात:स्मरणीय म्हणून संबोधले जाते, त्या सतींची संख्याही पाचच. पाचच्या आकड्याचे महत्वच इतके की, बाकीच्या आकड्यांकडे लक्ष देण्याचे काही कारणच नाही. आता आलं लक्षात, सध्या उत्तरेत जमा झालेले किंवा होऊ पाहणारे राजकीय मुखंडांचे आखाडेदेखील पाचच का आहेत ते? मोजून पाहा ना, बिहारश्री लालूप्रसाद, बिहारश्रीच नितीशकुमार (सोबत शरद यादव फुकट) लखनौश्री मुलायमसिंह, हसनश्री देवेगौडा आणि हरयाणाश्री अभयसिंह चौताळा ! या पाचही श्रींची मनशा एकच, आपले सवते आखाडे विसर्जीत करून एकच एक आखाडा बनवायचा. तो कशासाठी, तर दोन्ही सामनेवाल्यांना एकाच वेळी त्यांची पाठ दाखविण्यासाठी. सामनेवाल्यातील एक पाती म्हणजे काँग्रेस तर दुसरी पाती म्हणजे भारतीय जनता पार्टी! ‘दोनो पार्टीयोंसे समान दूरी’ हे या पंच परमेश्वरांचे परवलीचे वाक्य आता साऱ्यांनाच पाठ झालेले. तरीही या पाचही जणांनी वेळोवेळी दोन्ही पक्षांशी आलटून पालटून नजदीकी साधली होतीच, हे त्यांच्या कदाचित लक्षात राहिले नसेल पण लोकांच्या ते चांगलेच लक्षात आहे. तरीही त्यातल्या त्यात एक बरे की, आपल्यापैकी कोणीही एकटा आत्मबळावर काँग्रेस वा भाजपाला चीत करु शकत नाही, याचे भान त्यांना आले आहे वा लोकसभेच्या निवडणुकीने ते आणून दिले आहे, हेही नसे थोडके. राजकारण करायचेच मुळी सत्ताकारणासाठी, हा सिद्धांत एकदा ध्यानी घेतला की, मग या पंच प्रधानमंडळाच्या प्रयत्नांमध्ये कोणाला काही वावगे वाटण्याचे कारण उरत नाही. यावेळी तर एका बाजूला दोन आणि दुसऱ्या बाजूला पाच आहेत. त्यावेळी तर एका बाजूला केवळ इंदिरा गांधी आणि दुसऱ्या बाजूला अमाप, असे चित्र होते. पण तेव्हां मोट बांधायला जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व होते. या नेतृत्वाचा धाक म्हणा, आब म्हणा वा सत्तेची लालसा म्हणा वा काँग्रेसला नेस्तनाबूत करण्याची उर्मी म्हणा, साऱ्यांच्या मनासारखं जमून आलं. अर्थात ते जमणं तेव्हढ्यापुरतंच होतं, याचा साक्षात्कार जमलेल्यांपैकी प्रत्येकाला चार सहा महिन्यातच येऊ लागला आणि जिला नेस्तनाबूत करायचं होतं, ती काँग्रेस आणि खरं तर इंदिरा गांधी प्रचंड मोठ्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. पण तरीदेखील काही दिवसांपुरते का होईना साऱ्यांनी आपापले दुराग्र्रह बाजूला सारले होते. आपसी मतभेद गुंडाळून ठेवले होते आणि राजकीय स्पृश्यास्पृश्यतेला तिलांजली दिली होती. या वेळच्या पंच प्रधानमंडळाच्या बाबतीत तशी फार तणातणी होण्याचं काही कारण नाही. सारेच राममनोहर लोहिया यांच्या शिष्यत्वावर दावा करणारे आणि जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी म्हणून जनता पार्टीत एकवटलेले. तरीही या जनता पार्टीची कालौघात अनेक शकले उडाली. काही नष्टही झाली. पण जी थोडीफार उरली, त्यांची मोट म्हणजेच आजचा हा जनता परिवार. नाही म्हटलं तरी, बिहार, उत्तर प्रदेश, त्यांचेच एकेकाळी भाग असलेले झारखंड, उत्तराखंड म्हणजे देशाच्या राजकारणावर पकड बसविण्याची ताकद असलेला भूप्रदेश. त्यातच लालूप्रसाद आणि मुलायमसिंह यांची तेथील मतदारांवर बऱ्यापैकी पकड. पण ती ढिली झाल्याचे लोकसभेच्या निकालांनी दाखवून दिले व त्यापायीच ही सारी पळापळ. परिणामी या साऱ्यांच्या एकत्र येण्याने काँग्रेस आणि भाजपाच्या उरात धडकी बसावयास हवी. पण तसे होताना काही दिसत नाही. कारण मुळात या पंच प्रधानांचे मनाने एकत्र येणेदेखील दिसत नाही. लालूप्रसाद त्यांचा कंदील त्यागण्यास तयार नाहीत तर मुलायम यांना त्यांची सायकल सोडवत नाही. याच वर्षी बिहार विधानसभेच्या निवडणुका असल्याने जनता परिवाराच्या एकत्रीकरणाबाबत नितीशकुमार घाई करीत आहेत, तर लालू म्हणतात, त्यांना कुठलीही घाई नाही. हडबडी मे फैसला किया तो गडबड हो सकती है. त्यामुळे ते निवांत. त्यातून त्यांचं आपलं एकच, मुलायमजीको सारा जिम्मा सौपा है. त्यामुळंच सारे आखाडे येतील तेव्हां येतील, पण तूर्तास तुमचा राजद आणि आमचा संजद हे दोन आखाडे तर एकत्र करुन टाकू, हा शरद यादवांचा देकार लालूंनी हेंगलून लावला. या पंच प्रधानांचे अग्रज मुलायम स्वत: काहीच बोलायला तयार नाहीत. त्यांचे प्रवक्ते मात्र रोजच्या रोज आणि जाहीरपणे एकत्रीकरणाच्या मार्गात किती आणि कोणते अडथळे आहेत, यावर प्रवचने देत फिरत असतात. पार्टी किस नामसे जानी जायेगी, उसकी निशानी क्या होगी और सबसे ज्यादा अहम बात, मुखिया कौन रहेगा, असाच या प्रवक्त्यांच्या प्रवचनांचा सार. काय सांगा, निघेलही त्यातून काही मार्ग. तेव्हांही निघालाच होता की. पण तेव्हां देशातील सारी जनता पाठीशी होती. विजय निश्चित होता आणि मतदान ही केवळ एक औपचारिकता होती. आता तसं आहे? त्यातून ज्यांनी आपापल्या स्वतंत्र सुभेदाऱ्या निर्माण केल्या आहेत, स्वत:ला आजवर किंगमेकर समजत समजत आता किंग होण्याचे मांडे खात आहेत, त्यांना कोणाचा तरी सुभेदार होणे कितपत मानवायचे? काँग्रेस-भाजपा का निवांत आणि निश्चिंत आहे, याचं सारं गमक इथंच तर आहे.
जनता परिवारातील पंच प्रधान मंडळ
By admin | Published: January 17, 2015 12:56 AM